आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Kavita Karkare Saves Three Lives Even After Death

मृत्यूनंतरही कविता करकरे यांनी वाचवले तीन जीव, दोन अंधांना दिली दृष्टी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- दहशतवादी विरोधी पथकाचे माजी प्रमुख हेमंत करकरे यांची पत्नी कविता करकरे यांचे नुकतेच निधन झाले. मृत्यूनंतरही देहदानाच्या माध्यमातून त्यांनी तीन व्यक्तींचा जीव वाचवला असून अंधांना दृष्टी दिली आहे. विशेष म्हणजे त्यांच्या तीन मुलांनी प्रचंड धैर्य दाखवत हा निर्णय घेतला. त्यांच्या पुढाकाराने करकरे कुटुंबीयांनी एक आदर्श घालून दिला आहे.
हेमंत आणि कविता करकरे यांना आकाश, सायली आणि जुई अशी तीन मुले आहेत. मुलगी अमेरिकेतून परत येईपर्यंत कविता यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. त्यानंतर त्यांना मृत घोषित करण्यात आले. यावेळी बसलेला धक्का सहन करीत मुलांनी आईचा मृतदेह दान करण्याचा निर्णय घेतला.
कविता यांची एक किडनी 48 वर्षिय रुग्णाला दान करण्यात आली आहे. दशकभरापासून हा रुग्ण डायलिसिसवर होता. गेल्या मार्च महिन्यात या रुग्णाने किडनीसाठी मागणी नोंदवली होती.
दुसरी किडनी जसलोक रुग्णालयातील 59 वर्षिय रुग्णाला दान करण्यात आली आहे. गेल्या सात वर्षांपासून तो ट्रान्सप्लॉंटची वाट बघत होता.
गेल्या काही वर्षांपासून 49 वर्षिय रुग्ण लिव्हर खराब झाल्याने त्रस्त होता. त्याला कविता यांचे लिव्हर दान करण्यात आले आहे. गेल्या डिसेंबर महिन्यात कोकिळाबेन अंबानी रुग्णालयात या रुग्णाने लिव्हरसाठी नोंदणी केली होती.
परेल येथील हाजी बचोली आय बॅंकेला कविता यांचे डोळे दान करण्यात आले आहेत. यातून दोन अंधांना दृष्टी मिळणार आहे.
हेमंत करकरे यांच्या मृत्यूनंतर कविता करकरे शहिद पोलिसांच्या पत्नीच्या न्याय्य हक्कांसाठी लढत होत्या. हेमंत आणि कविता यांची पहिली भेट नॅशनल प्रोडक्टिव्हिटी काऊंसिलने आयोजित केलेल्या पीडी कार्यक्रमात झाली होती. हेमंत या कार्यक्रमात वक्ते होते. आयपीएस ऑफिसर होण्यापूर्वी हेमंत प्रोफेसर होते.