आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कल्याण-डोंबिवली: सत्तेसाठी शिवसेना-भाजपची आज रात्री पुन्हा एकदा बोलणी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत सत्ता स्थापन करण्यासाठी शिवसेनेपाठोपाठ आता भाजपही उत्सुक झाला आहे. भाजपला स्वबळावर सत्ता स्थापन करण्यात येत अडचणी पाहता त्यांनी शिवसेनेसोबत पुन्हा घरोबा करण्याची तयारी दाखवली आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी कल्याण-डोंबिवलीत भाजप सत्ता स्थापन करेल व आमचाच महापौर होईल असे म्हटले होते. मात्र, बहुमताचा आकडा गाठता येत नसल्याने भाजपने माघार घेतली आहे. तसेच शिवसेनेसोबत जाण्याची भाषा सुरु केली आहे. शिवसेनेने भाजपला सोबत घेण्याबाबत तयारी दाखवली आहे. त्याचाच भाग म्हणून भाजप व शिवसेना नेत्यांची आज रात्री एक बैठक होणार आहे त्यात सत्ता वाटपाबाबत चर्चा होणार आहे. शिवसेनेकडून पालकमंत्री एकनाथ शिंदे तर भाजपकडून अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना अंतिम निर्णय घेण्याचे अधिकार दिले आहेत.
कल्याण-डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचे 52 तर भाजपचे 42 नगरसेवक निवडून आले आहेत. मनसेचे 9, काँग्रेस-राष्ट्रवादीचे 6 तर 27 गाव संघर्ष समितीचे 6 नगरसेवक निवडून आले आहेत. येथे शिवसेना व भाजपने आपलाच महापौर होईल असे म्हटले आहे. त्यानुसार भाजपने सत्ता मिळविण्यासाठी प्रयत्न केले. मात्र त्यांना बहुमताचा आकडा गाठणे अशक्य आहे. भाजपने संघर्ष समितीला सोबत घेतले तरी त्यांचा आकडा 50 च्या आतच राहत आहे. मनसेला सोबत घ्यावे तर त्यांच्या अटी पूर्ण करणे अशक्य असल्याचे भाजप नेत्यांचे म्हणणे आहे. दुसरीकडे, राज ठाकरेंचा स्वभाव पाहता व मोदी-शहांपासून फडणवीसांसारख्या नेत्यांवर हल्लाबोल केल्यानंतर त्यांच्याशी बोलणी कोणी करायची यावरूनही भाजपात गोंधळ आहे. दुसरीकडे, शिवसेनेने मनसेच्या नेत्यांशी संपर्क ठेवल्याने विरोधी पक्षात बसायची वेळ येईल या भीतीने भाजपने सेनेशी संपर्क साधला व चर्चेची तयारी दाखवली. कल्याण-डोंबिवलीतील मराठी लोकांना शिवसेनाव मनसेने एकत्र यावे असे वाटत आहे. ठाकरे बंधूंचे मामा चंदूमामा वैद्य यांनीही उद्धव-राज यांनी एकत्र यावे यासाठी मातोश्री व कृष्णकूंजवर फे-या घातल्या. मात्र, मनसेने शिवसेनेपुढे अपेक्षेपेक्षा जास्त मागण्या ठेवल्या.
पाच वर्षे उपमहापौरपद व दोन वर्षे स्थायी समितीचे अध्यक्षपद मागितले आहे. याचबरोबर विविध तीन समित्यांचे अध्यक्षपदही मनसेला हवे आहे. केवळ 9 नगरसेवक असताना इतकी पदे दिली जाऊ शकत नाहीत असे सेनेचे म्हणणे आहे. त्यापेक्षा भाजपला सोबत घेणे सोईस्कर आहे असे सेनेच्या काही नेत्यांचे म्हणणे आहे. भाजप-शिवसेना राज्यासह केंद्रात सत्तेत आहे. त्यामुळे भाजपसोबत कल्याणमध्ये सत्ता स्थापन केल्यास विविध निधी आणण्यास मदत होईल असे सेनेच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंना पटवून दिले आहे. त्यामुळे भाजपसोबत बोलणी करण्यास उद्धव ठाकरेंनी परवानगी दिली आहे. तसेच सत्ता वाटपाचे सूत्र ठरविण्याची अंतिम जबाबदारी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर सोपवली आहे. भाजपने सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे अंतिम बोलणीचे अधिकार दिले आहेत. त्यानुसार आज रात्री दोन्ही पक्षांच्या नेत्यांत चर्चा होणार आहे.
बातम्या आणखी आहेत...