मुंबई - ‘एकनाथ खडसेंचा अपवाद वगळता देवेंद्र फडणवीस यांच्या नव्या सरकारमधील एकही मंत्री प्रभावी नाही. अनुभव नसलेल्या व कमजोर मंत्र्यांमुळे राज्यातील जनतेचा अपेक्षाभंग होणार हे निश्चित आहे’, असे भाकीत काँग्रेसचे नेते नारायण राणे यांनी मंगळवारी वर्तवले.
राज्य टोलमुक्त करण्याचे वचन भाजपने दिले होते. सत्तेवर येताच ते घूमजाव करीत आहेत.
मिहान प्रकल्पातील उद्योगांना थेट वीज जोडणी देण्याचा फडणवीसांचा निर्णय चुकीचा आहे. वीज कंपन्या तोट्यात आल्या तर शेतक-यांना वीज सबसिडी कशी देणार, असा सवाल करत नवे सरकार कॉर्पोरेट्सचे हित जोपासते आहे, असा आरोप राणे यांनी केला.
शिवसेना लाचार : शिवसेनेचे नेते सत्तेसाठी दिल्लीला वा-यावर वा-या करत असून शिवसेना कधी नव्हे इतकी लाचार झाली आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब असते तर सत्तेवर लाथ मारून विरोधात बसले असते. बाळासाहेबांनी स्वाभिमान शिकवला. उद्धव मात्र लाचारीचे धडे देत आहेत, अशी टीकाही राणे यांनी केली.