आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘सेटलमेंट’चा आरोप इष्टापत्ती?

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आगामी निवडणुकीत उमेदवार देताना प्रदेशाध्यक्षाचा नको तो हस्तक्षेप होऊ नये, उलट आपल्या सोयीचे उमेदवार निवडणे, त्यांना निवडून आणणे आणि पुढे मुख्यमंत्री होण्यासाठी आवश्यकता भासली तर आपल्या पाठीशी ठामपणे त्यांना उभे करणे हे काम प्रदेशाध्यक्षाने प्रामाणिकपणे करावे यासाठी मुंडेंना सर्वाधिक विश्वासाची व्यक्ती कोण वाटत असेल तर ते खडसे हेच आहेत. त्यामुळे इच्छा नसतानाही खडसे यांना प्रदेशाध्यक्ष बनावे लागणार आहे असे दिसते. राज ठाकरे यांच्या आरोपांमुळे कदाचित हा बदल लांबण्याचीही शक्यता आहे. तसे झाले तर नाथाभाऊंसाठी राज ठाकरे यांचे आरोप ‘इष्टापत्ती’च ठरू शकतील.

सेटलमेंट’च्या मुद्द्यावरून विधानसभेतील विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांच्यावर जाहीर आरोप करून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आणि विशेषत: राज ठाकरे यांनी प्रदेश भाजपची मोठीच गोची केली आहे. कारण ज्या वेळी राज यांनी हे आरोप केले त्या वेळी खडसे यांच्याकडील विरोधी पक्षनेतेपद काढून त्यांना प्रदेशाध्यक्ष करण्याच्या हालचाली पक्षांतर्गत वेगात होत्या. राज यांच्या या आरोपांमुळे त्या हालचालींना काही काळासाठी ब्रेक लावणे पक्षाला भाग पडले आहे. कारण अशा आरोपांपाठोपाठ विरोधी पक्षनेतेपदावरून दूर करून खडसेंना प्रदेशाध्यक्ष केले तर राज ठाकरे हेच त्याचं ‘क्रेडिट’ घेऊन जातील, अशी भीती भाजपला वाटणे स्वाभाविक आहे. तसे झाले तर राज यांच्या आरोपांपेक्षा हा खांदेपालट पक्षासाठी अधिक बदनामीकारक ठरू शकतो हे ते जाणून आहेत.


खरे तर भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षांची निवड होण्यापूर्वीच प्रदेशाध्यक्षांची निवड होणे अपेक्षित होते. तशी परंपरा आणि नियमही पक्ष संघटनेत आहे; पण शिस्त आणि नियम यांच्या व्याख्या जेव्हा व्यक्तिसापेक्ष बनतात, त्या वेळी तेच घडते जे सध्या सुरू आहे. थेट राष्टीय अध्यक्ष पदावर विशिष्ट व्यक्ती असावी म्हणून पक्षाच्या घटनेतच दुरुस्ती केली गेली तेव्हाच पक्षांतर्गत शिस्त आणि परंपरेचे इमले ढासळायला लागले होते. पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदाच्या निवडीच्या निमित्ताने त्याचे प्रत्यंतर आले आहे.


महारातला एक मराठी माणूस एका राष्ट्रीय पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी पोहोचला याचा सार्थ आनंद त्या वेळी बहुतांश मराठी जनांना झाला होता. केवळ या मराठी माणसासाठी, अर्थात नितीन गडकरींसाठी या राष्ट्रीय पक्षाने आपली घटना बदलवली, याचेही अप्रूप काही प्रमाणात होतेच. पण घटना बदलूनही गडकरींची अपेक्षा‘पूर्ती’ झाली नाही आणि ऐनवेळी त्यांचा कडेलोट झाला. त्यामुळे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा दुहेरी हिरमोड झाला असणार. एक तर एवढे करूनही गडकरी अध्यक्ष होऊ शकले नाहीत आणि त्यांच्यासाठी तयार केलेल्या मार्गावरून इतरांचेच रथ जाण्याची शक्यता वाढली आहे.


गडकरींचा आणि पर्यायाने संघाचा कितीही हिरमोड झाला असला तरी गोपीनाथ मुंडे मात्र सध्या खुश आहेत. एक तर गडकरी पुन्हा अध्यक्ष झाले नाहीत ही बाब त्यांच्या पथ्यावर पडली आहे आणि महाराष्ट्र त्यांना पुन्हा आंदण मिळाला आहे. महारात पक्षाला विजय मिळवून देण्याची मोठ्ठी जबाबदारी खांद्यावर घेतल्यामुळे स्वाभाविकच ती पार पाडण्यासाठी त्यांच्या काही अटी आहेत आणि त्या अटींमुळेच प्रदेशाध्यक्षपदाच्या निवडीचे घोडे अडले आहे, असे सांगितले जात आहे. केंद्रात गडकरींना दुसºयांदा अध्यक्षपद मिळाल्यावर त्याच मार्गावरून चालत महारातही सुधीर मुनगंटीवार यांनाच ‘रिपीट’ करायचं, असं गडकरी समर्थकांचं ठरलं होतं. विशेषत: विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते विनोद तावडे त्यासाठी विशेष आग्रही होते. तावडेंच्या या मताशी सहमत असणाºयांचीही संख्या पक्षात बरीच मोठी आहे, असंही सांगितलं जातंय. तसं असेल तर मुनगंटीवारांच्या नावावर नव्याने शिक्कामोर्तब एव्हाना होऊन जायला हवं होतं. ते होत नाहीये, याचं कारण मुंडेंना मुनगंटीवार प्रदेशाध्यक्ष पदावर नको आहेत. कोणत्याही परिस्थितीत आपल्याला मुनगंटीवार चालणार नाहीत, अशी ठाम भूमिकाच मुंडेंनी घेतली आहे, असं म्हणतात. अर्थात, महाराचा गड जिंकायचा तर गडकरींना जवळची असलेली माणसं दूर ठेवणं हेच मुंडेंकडून घडण्याची शक्यता असणार.

मुनगंटीवारांच्या ऐवजी आपल्या मर्जीतील माणूस प्रदेशाध्यक्षपदावर असावा, असा गोपीनाथरावांचा प्रयत्न असला तरी त्यांच्या मर्जीतली माणसं त्या खुर्चीवर बसायला तयार नाहीत. दीड वर्षावर येऊन ठेपलेल्या विधानसभा निवडणुकीत आपले गड वाचवायची चिंता असताना कोण कशाला ही जबाबदारी खांद्यावर वाढवून घेईल? त्यामुळेच राज्यात मुंडेंच्या सर्वात मर्जीतले आणि विश्वासातले असूनही एकनाथ खडसे यांनीही ही खुर्ची घ्यायला साफ नकार दिला होता आणि देवेंद्र फडणवीस यांनीही नकारघंटाच कायम वाजवत ठेवली. त्यामुळे प्रदेशाध्यक्षपदाचं घोंगडं भिजतच राहिलं आहे. गोपीनाथ मुंडे आणि एकनाथ खडसे या दोन नेत्यांमधील परस्पर संबंध साºया महाराला माहिती आहेत. आगामी निवडणुकीत उमेदवार देताना प्रदेशाध्यक्षाचा नको तो हस्तक्षेप होऊ नये, उलट आपल्या सोयीचे उमेदवार निवडणे, त्यांना निवडून आणणे आणि पुढे मुख्यमंत्री होण्यासाठी आवश्यकता भासली तर आपल्या पाठीशी ठामपणे त्यांना उभे करणे हे काम प्रदेशाध्यक्षाने प्रामाणिकपणे करावे यासाठी मुंडेंना सर्वाधिक विश्वासाची व्यक्ती कोण वाटत असेल तर ते खडसे हेच आहेत. म्हणूनच खडसेंनी ही जबाबदारी स्वीकारावी यासाठी त्यांनी खूप प्रयत्न केले. एकदा मुंबईत आणि एकदा दिल्लीतही त्यासाठी बैठक झाली; पण नाथाभाऊ ऐकायला तयार नव्हते. त्यामुळे मुंडे यांनी आपला मोर्चा नागपूरच्या दिशेने वळवला.

आमदार आणि पक्षाचे विद्यमान सरचिटणीस देवेंद्र फडणवीस यांनी ही जबाबदारी स्वीकारावी, यासाठी मुंडेंचे प्रयत्न सुरू झाले. पण फडणवीस त्यांच्या ताकाला तूर लागू देत नाहीयेत. त्यामुळे त्यांनी थेट दिल्लीतल्याच नेत्यांना गळ घातली. त्यामुळे विनोद तावडे, एकनाथ खडसे आणि पांडुरंग फुंडकर यांना दिल्लीत बोलावून घेण्यात आले होते. त्या बैठकीत तावडे यांनीही खडसे यांच्या नावाला पसंती दिल्यामुळे दिल्लीश्वरांनीही आता खडसे यांनाच ही जबाबदारी घेण्याची गळ घातली आहे, अशी माहिती आहे. त्यामुळे कदाचित विधानसभेच्या अधिवेशनानंतर हा खांदेपालट होणे अपेक्षित होते. राज ठाकरे यांच्या आरोपांमुळे कदाचित हा बदल लांबण्याचीही शक्यता आहे. तसे झाले तर नाथाभाऊंसाठी राज ठाकरे यांचे आरोप ‘इष्टापत्ती’च ठरू शकतील.