मुंबई - महसूलमंत्री एकनाथ खडसे यांचे मंत्रिमंडळात दुसऱ्या क्रमांकाचे स्थान असले तरी त्यांच्या प्रस्तावांना मुख्यमंत्र्यांसह भाजपमधीलच इतर ज्येष्ठ मंत्री फारसे महत्त्व देत नसल्याचे दिसून येत आहे. खडसेंनी सांगितलेल्या अधिकाऱ्यांच्या बदल्याही केल्या जात नसल्याने ते नाराज असल्याचे यापूर्वीच उघड झाले हाेते. अाता अबकारी विभागाचा महसूल वाढवण्यासाठी त्यांनी दिलेला एक प्रस्तावही सुधीर मुनगंटीवार यांच्याकडील अर्थ खात्याने सहा महिन्यांपासून अडवून ठेवला आहे. ‘मी महसूलवाढीचा प्रयत्न करीत आहे; पण वित्त विभाग माझी योजना मार्गी लागू देत नाही,’ असा आरोप खडसे यांनी ‘दिव्य मराठी’शी बोलताना केला.
‘महसूलमंत्री या नात्याने राज्याच्या तिजोरीत जास्तीत जास्त भर टाकावी असा माझा प्रयत्न असतो. त्या दृष्टीने मी योजनाही आखत असतो. परंतु मला वित्त विभागाकडून योग्य समर्थन मिळत नाही. अबकारी विभागाचा महसूल वाढावा यासाठी काय करावे याची माहिती घेण्यासाठी एक सल्लागार नेमावा, अशी योजना मी मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर लगेचच काही दिवसांनी तयार केली. सल्लागारांकडे अनेक योजना असल्याने त्याचा वापर करून महसूल वाढवता येईल या उद्देशाने सल्लागार नेमण्यास परवानगी द्यावी म्हणून मी वित्त खात्याकडे फाइल पाठवली. परंतु आज सहा महिने झाले तरी माझी फाइल वित्त विभागाने मंजूर केलेली नाही. ही योजना मी माझ्या फायद्यासाठी नव्हे तर सरकारच्या तिजोरीत भर पडावी म्हणून आखली होती. परंतु वित्त खात्यालाच जर याची आवश्यकता वाटत नसेल तर मी तरी काय करू?’ अशी खंतही खडसेंनी व्यक्त केली.
प्रस्ताव माझ्याकडे आलाच नाही : मुनगंटीवार
वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मात्र खडसेंच्या अाराेपाचे खंडन केले अाहे. ‘माझ्याकडे खडसे साहेबांचा असा एकही प्रस्ताव आलेला नाही. कदाचित वित्त विभागाने त्यांच्या स्तरावरच त्या योजनेबाबत निर्णय घेतला असेल. मला यातील काहीही ठाऊक नाही आणि सहा महिन्यांपासून जर फाइल माझ्या विभागाकडे असेल तर खडसे यांनी माझ्याशी फोनवरून चर्चा केली असती तरी चालले असते. ते मंत्रिमंडळात वरिष्ठ मंत्री आहेत. त्यांची दोन कोटींचीच काय, दहा कोटींचीही योजना आम्ही मंजूर करू. अशी काही फाइल आली आहे का याची मी माहिती घेतो,’ असेही त्यांनी सांगितले.