आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोल्हापूर, इचलकरंजी पालिकेच्या विरोधात गुन्हा; काविळीच्या साथीने 15 जणांचे मृत्यू

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोल्हापूर, मुंबई- इचलकरंजी आणि हातकणंगले इथे पसरलेल्या काविळीच्या साथीप्रकरणी कोल्हापूरचे महापौर, आयुक्त तसेच इचलकरंजीचे नगराध्यक्ष आणि मुख्याधिकारी यांच्यावर गु्न्हे दाखल केल्याची माहिती आरोग्यमंत्री सुरेश शेट्टी यांनी मंगळवारी विधानसभेत दिली. तसेच खासगी रुग्णालयात दाखल असलेल्या रुग्णांचा उपचार खर्चही सरकारच्या वतीने केला जाईल, असेही शेट्टी यांनी सांगितले.
या प्रकरणी आमदार उत्तमराव ढिकले यांनी लक्षवेधीच्या माध्यमातून प्रश्न उपस्थित केला होता. दरम्यान, दूषित पाणीप्रकरणी कोल्हापूर, सांगलीच्या आमदारांची बैठक घेण्याची सूचना विधानसभाध्यक्षांनी शेट्टी यांना केली. इचलकरंजी शहरातील काविळीच्या प्रश्नावरून श्रेयवादाच्या राजकारणानेही जोर धरला असून हा प्रश्न सोडवण्यासाठी मुंबईत बैठकांचा धडाका सुरू आहे. या साथरोगाने आजवर 15 जणांचे बळी गेले आहेत.
गेले दोन महिने इचलकरंजीत काविळीने उच्छाद मांडला आहे. नगरपालिकेचा सांडपाण्यावर प्रक्रिया करणारा प्रकल्प गेले चार महिने बंद आहे. त्यामुळे हे सांडपाणी तसेच प्रोसेसमधील औद्योगिक पाणीही विनाप्रक्रिया पंचगंगेत मिसळत आहे. यामुळे हातकणंगले आणि शिरोळ तालुक्यात दूषित पाणीपुरवठा झाला व काविळीची साथ पसरली आहे.
इचलकरंजी नगरपालिकेत दोन्ही काँग्रेसची आघाडी सत्तेवर आल्यानंतर हा प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही किती सक्रिय आहोत हे दाखवण्यासाठी माजी राज्यमंत्री प्रकाश आवाडे यांनी कंबर कसली असून त्यांनी मुंबईत या प्रकरणी तीन बैठका लावल्या आहेत. दुसरीकडे भाजपचे आमदार सुरेश हाळवणकर यांनी याप्रश्नी सरकारला धारेवर धरण्याचा निर्णय घेतला आहे.