मुंबई - ड्यूटीवर नसतानाही ठाणे वाहतूक पाेलिसाने दाखवलेल्या कर्तव्यतत्परतेमुळे एका मुलीला पळवण्याच्या तयारीत असलेल्या अाराेपीला पकडण्यात यश अाले अाहे. या अपहरणकर्त्याला बेड्या ठाेकण्यात या पाेलिसाला व्हाॅट्सअपचाही बराच उपयाेग झाला.
२७ मे राेजी रात्री साडेसात वाजता घाटकाेपर परिसरातील कामराजनगर भागातून रिया गुप्ता नामक एका मुलीचे अपहरण झाले हाेते. याबाबत पंतनगर पाेलिस ठाण्यात तक्रारही दाखल झाली. याचदरम्यान ठाणे रेल्वेस्थानकावर खासगी कामानिमित्त अालेले वाहतूक पाेलिस जुबेर तांबाेळी यांना एक मुलगी एका अज्ञात व्यक्तीच्या तावडीतून सुटण्यासाठी धडपड करत असल्याचे दृश्य दिसले. त्यांना संशय अाला. त्यांनी या दाेघांचाही पाठलाग सुरू केला.
याचदरम्यान तांबाेळी यांना पंतनगर पाेलिस ठाण्यात मुलीच्या अपहरणाबद्दल दाखल झालेल्या तक्रारीबाबत मेसेज मिळाला. तांबाेळी यांनी तातडीने अाराेपीला ताब्यात घेतले व पंतनगर पाेलिसांना याबाबत माहिती दिली. पाेलिसांच्या पथकाने तातडीने घटनास्थळ गाठून अाराेपीला अटक केली व त्याच्या तावडीतून मुलीची सुखरूप सुटकाही केली. पाेलिसांच्या कर्तव्यतत्परतेबद्दल मुलीच्या पालकांनी अभिनंदन केले अाहे. तसेच तंत्रज्ञानाच्या मदतीने अाराेपीला पकडल्याबद्दलही पाेलिसांचे काैतुक हाेत अाहे.