आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मुत्रपिंड दात्याची माहिती आधार कार्डला जाेडणार, आराेग्यमंत्र्यांची माहिती

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - हिरानंदानी रुग्णालयात झालेल्या मुत्रपिंड प्रत्यारोपण रॅकेटच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने आता मुत्रपिंड दाता आणि मुत्रपिंड स्वीकारणाऱ्या रुग्णाची माहिती आधार कार्डशी संलग्न करून ऑनलाइन उपलब्ध करून देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मंगळवारी याबाबत चर्चा झाली असून प्रत्यारोपणाची प्रक्रिया कायद्याच्या चौकटीत आणि पारदर्शक होण्यासाठी तज्ज्ञांची समिती गठित करण्याचा निर्णय घेणार असल्याचे आराेग्यमंत्री डाॅ. दीपक सावंत यांनी सांगितले.

किडनी प्रत्यारोपण रॅकेटच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील युरोलॉजिस्ट आणि नेफ्रॉलॉजिस्ट संघटनांच्या सदस्यांनी डाॅ. सावंत यांची भेट घेऊन व्यथा मांडली होती. त्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांकडे बैठक झाली. ‘या वेळी मुख्यमंत्र्यांनी मुत्रपिंड प्रत्यारोपण अधिक सुलभ होण्यासाठी नियमावली करण्यासाठी तज्ज्ञांची समिती गठित करण्याचे निर्देश दिले. त्यानुसार आरोग्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली वैद्यकीय शिक्षण, विधी व न्याय, न्युरोलॉजिस्ट, नेफ्रॉलॉजिस्ट आदी क्षेत्रातील तज्ज्ञांची समिती आठवडाभरात गठित करून १५ दिवसांत नियमावली तयार करण्यात येईल. तसेच मुत्रपिंड प्रत्यारोपण आणि एकूणच अवयवदान प्रक्रिया अधिक सुलभ, सुटसुटीत होण्यासाठी आरोग्य विभागातर्फे रुग्णांमध्ये आणि अवयव दात्यांमध्ये अधिक जागरूकता आणण्यासाठी प्रयत्न केले जातील,’ असेही आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.

ज्या रुग्णालयात मुत्रपिंड प्रत्यारोपण शस्त्रक्रिया केली जाणार आहे तेथे एक विशेष कक्ष तयार करून मुत्रपिंड दाता आणि ते स्वीकारणाऱ्या रुग्णाला त्याच्या नातेवाइकांना मुत्रपिंड शस्त्रक्रियेची माहिती, परिणामाविषयी ध्वनिचित्रफीत दाखविण्यात येईल. तसेच किडनी दाता आणि स्वीकारणारा रुग्ण यांच्याकडून संमतीपत्र तयार करून घेण्यात येईल. ही सर्व प्रक्रिया इनकॅमेरा केली जाईल. यामुळे नंतर कोणी फसवणूक झाली असा आरोप करू शकणार नाही, असेही आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.

७५ रुग्णालयांना प्रत्यारोपण शस्त्रक्रियेचे परवाने
राज्यात मुत्रपिंड प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया करण्यासाठी ७५ रुग्णालयांना परवाने देण्यात आले असून यकृत प्रत्यारोपणासाठी २१, हृदय प्रत्यारोपणासाठी ७ आणि फुप्फुसाच्या प्रत्यारोपणासाठी ५ रुग्णालयांना परवाने देण्यात आल्याची माहितीही आरोग्यमंत्र्यांनी दिली.

सॉफ्टवेअरने पटणार ओळख
मुत्रपिंड दात्याची ओळख पटविण्यासाठी सॉफ्टवेअर तयार करण्यात येत असून त्या माध्यमातून दात्याची माहिती आधार कार्डशी संलग्न करण्यात येणार आहे. अवयवदान प्रक्रिया ऑनलाइन करून त्याद्वारे मुत्रपिंड दात्याची माहिती, मुत्रपिंड स्वीकारणाऱ्या रुग्णाची माहिती, शस्त्रक्रिया झाल्याची माहिती या सॉफ्टवेअरमध्ये संकलित होईल व ही माहिती ऑनलाइन केली जाणार आहे. मुत्रपिंड प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करणाऱ्या डॉक्टरांसाठी सातत्याने कार्यशाळा घेऊन प्रत्यारोपण कायदा त्यातील बदल आदींबाबत मार्गदर्शन करणाऱ्यांसाठी समन्वयकांची मदत घेण्याच्या सूचना संबंधित रुग्णालयाला करण्यात येणार आहेत.
बातम्या आणखी आहेत...