आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Kirtikar And Kamat News In Marathi, North Western Mumbai, Divya Marathi

चौरंगी लढतीमुळे कीर्तिकर- कामत हैराण, महायुती- आघाडीला मनसे- आपचा धोका

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - केवळ दिग्गज नेतेच नव्हे तर अभिनेत्यांच्याही एन्ट्रीने मुंबईतील उत्तर पश्चिम मतदारसंघाची निवडणूक यंदा लक्षवेधी ठरली आहे. शिवसेनेच्या गजानन कीर्तिकर यांना धक्का देण्यासाठी मनसेने प्रसिद्ध अभिनेते, दिग्दर्शक महेश मांजरेकर यांना रिंगणात उतरविले आहे, तर ‘आप’चे मयांक गांधी व समाजवादी पक्षाचे उमेदवार, अभिनेता कमाल खान यांच्यामुळे कॉँग्रेसचे विद्यमान खासदार गुरुदास कामत यांची डोकेदुखी वाढली आहे. त्यातच आयटम गर्ल राखी सावंतनेही स्वतंत्र पक्ष स्थापन करून येथूनच निवडणूक लढविण्याची घोषणा केल्याने मतदारांच्या करमणुकीत वाढच झाली आहे.


उमेदवारी मिळण्याची खात्री असल्याने कॉँग्रेसची यादी जाहीर होण्यापूर्वीच गुरुदास कामत यांनी आपली एक प्रचारफेरी पूर्ण केली होती. सहाव्यांदा खासदार होण्यासाठी त्यांनी यंदा जोरदार फील्डिंग लावली आहे. केवळ मतदारसंघातच नव्हे तर त्यांच्या जाहिराती बेस्ट बसेसवर मुंबईभर झळकत आहेत. हा भाग कॉँग्रेसचा बालेकिल्ला मानला जात असला तरी गेल्या काही वर्षात या पक्षाची मक्तेदारी हळूहळू घटत असल्याचे दिसते. दिंडोशी, गोरेगाव, वर्सोवा, जोगेश्वरी पश्चिम, अंधेरी पूर्व आणि अंधेरी पश्चिम या विधानसभा क्षेत्राने तयार झालेला उत्तर-पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघ सर्वभाषिक श्रीमंत, गरिबांसह हिंदू, मुस्लिम, शीख, ख्रिश्चन असा सर्वधर्मीयांत विभागला गेलेला आहे. येथे मराठी मतदार 35.62 टक्के असून 21.14 टक्के मुस्लिमांची संख्या आहे. उत्तर भारतीयांचा टक्काही 22.52 वर आहे. त्यामुळे मराठी जणांसह उत्तर भारतीय मतांवरही सर्वच राजकीय पक्षांचा डोळा आहे.


राहुलच्या रोडशोने काँग्रेसचा धडाका
कामत यांनी राहुल गांधी यांचा रोडशो कोळीवाड्यात आयोजित करून या समाजाला जवळ करण्याचा प्रयत्न केला, तर ‘आप’च्या मयांक गांधी यांनी भ्रष्टाचार विरोधाचा नारा देत मध्यमवर्गीयांना आपलेसे करण्याचा प्रयत्न केला आहे. गजानन कीर्तिकर यांनी उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत मेळावा घेतला आहे. दुसरीकडे महेश मांजरेकरांच्या गोटात मात्र अजूनही शांतता आहे. गेल्या वेळी 84 हजार मते घेतलेल्या समाजवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष अबू आझमी यांनी आता वादग्रस्त अभिनेता कमाल खानला रिंगणात उतरविले आहे. त्यांचा उत्तर भारतीय मतांवर डोळा आहे.


गुजरातींचा कौल सेनेकडे
अंधेरी पूर्व, पश्चिम व जोगेश्वरी या भागात कामतांचा प्रभाव दिसून येतो. तर वर्सोवा, दिंडोशी, गोरेगाव या भाग कीर्तिकरांना अनुकूल वाटतो. गेल्या पाच वर्षात या कामतांनी तोंडही न दाखविल्यामुळे तेथील मतदारांना बदल अपेक्षित आहे. तर दुसरीकडे शिवसेना आमदारांच्या नियमित संपर्क व विकासकामांमुळे काही भागात शिवसेनेचे पारडे जड असल्याचे दिसते. मराठींबरोबरच गुजराती मतदारही शिवसेनेला कौल देताना दिसतो.


राज करिष्म्यावर मनसेची भिस्त
प्रसिद्ध अभिनेते म्हणून महेश मांजरेकरांना लोक ओळखतात, मात्र त्याचे मतांत परिवर्तन होण्याची शक्यता कमीच असल्याचे स्थानिक नागरिकांचे मत आहे. गेल्या वेळी या मतदारसंघात मनसेने सव्वा लाख मते घेतली होती, मात्र मागील पाच वर्षात या पक्षाची लोकप्रियता कमालीची घटली आहे. पक्षप्रमुख राज ठाकरेंच्या सभेवरच मांजरेकरांची सर्व मदार असेल.


गुरुदास कामत यांची बलस्थाने
विकासकामांचे भांडवल, राहुल गांधींचे निकटवर्तीय, व्यापक संपर्क मोहीम, प्रचंड पैसा, आरोग्यमंत्री सुरेश शेट्टी यांचा प्रभाव असलेला अंधेरी पूर्व मतदारसंघ, उच्चभ्रूंमध्ये चांगले संबंध.
उणिवा : पाच वर्षात मतदारसंघाकडे दुर्लक्ष केल्याच्या तक्रारी, एकही उल्लेखनीय काम नाही. मतदारांमध्ये नाराजी.


गजानन कीर्तिकरांची बलस्थाने
गेल्या वेळच्या पराभवाचा बदला घेण्याची जिद्द, पराभवानंतर मतदारसंघ बांधण्याचा प्रयत्न, दिंडोशी, गोरेगावमधील बिल्डर लॉबीचे पाठबळ, गोरेगाव, दिंडोशी, वर्सोवा, अंधेरी पूर्वमध्ये शिवसैनिकांचे प्राबल्य.
उणिवा : संघटन कौशल्याचा अभाव, मतदारसंघात आजवर भरीव काम नाही, मनसेमुळे मतांमध्ये फूट पडण्याची शक्यता.