मुंबई- देशातील शेतकऱ्यांची कर्जमाफी अाणि शेतमालास योग्य हमी भाव या दोन मागण्यांसाठी देशातील दोनशे शेतकरी संघटनांनी काढलेली किसान मुक्ती यात्रा १२ दिवसांच्या प्रवासानंतर मंगळवारी (दि. १८) दिल्लीतील जंतरमंतर येथे धडकणार आहे. मध्य प्रदेशातील मंदसौर येथील आंदोलनात सहा शेतकरी पोलिस गोळीबारात मृत्युमुखी पडले आहेत.
उद्यापासून संसदेचे पावसाळी अधिवेशन चालू होत आहे. त्यामुळे मंदसौरच्या शहीद शेतकऱ्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी खासदारांनी संसदेत जाण्यापूर्वी जंतरमंतर येथे यावे, असे आवाहन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष व खासदार राजू शेट्टी यांनी केले आहे. सहा राज्यांचा दौरा करून यात्रा रविवारी उत्तर प्रदेशात पोहोचली. सोमवारी हरियाणामध्ये यात्रेचा अकरावा दिवस होता. यात्रेने प्रत्येक दिवस दिवंगत शेतकरी नेत्यास अर्पण केला असल्याचे सांगण्यात आले.