मुंबई/वाशीम - स्वत:चे मंगळसूत्र विकून घरात शौचालय बांधणा-या सायखेडा (ता. मंगरूळपीर) येथील संगीता नारायण आव्हाळे हिच्या कर्तबगारीचा राज्य सरकारने विशेष गौरव केला.
घराचे बांधकाम सुरू असताना संगीताने पतीकडे शौचालय उभारणीची मागणी केली. मात्र, सासरच्यांनी पैसे नसल्याचे सांगत दुर्लक्ष केले. पण हतबल न होता संगीताने गळ्यातील मंगळसूत्र विकून शौचालय उभारण्यास पतीला पैसे दिले. तिने हे पाऊल उचलल्यामुळे मग सासरच्यांनाही शौचालयाचे महत्त्व पटले व त्यांनीही तिची मागणी पूर्ण केली.
शौचालयासाठी मंगळसूत्र विकण्याच्या निर्णयातून सामाजिक संदेश देतोय हे माहीत नव्हते. कधी मुंबईला जाऊ व मंत्र्यांच्या हस्ते गौरव होईल, असे स्वप्नातही वाटले नव्हते.
-संगीता आव्हाळे
अशा संगीता गावोगावी घडाव्यात. शौचालय बांधकामापूर्वीच अनुदान दिले जावे यासाठी
आपण पुढाकार घेऊ. आई प्रज्ञा मुंडे यांनी संगीताला मंगळसूत्र भेट देण्याचा सल्ला दिला. - पंकजा मुंडे, ग्रामविकासमंत्री
‘दिव्य मराठी’ इफेक्ट : ३ नोव्हेंबर रोजी ‘दिव्य मराठी’त प्रसिद्ध झालेल्या वृत्ताची दखल घेऊन ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी संगीता व तिच्या पतीला मुंबईत बोलावून गौरव केला. स्वत:च्या पैशाने संगीताला तिचे सौभाग्यलेणे बहाल केले.