आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विधान परिषद निवडणूक: कोल्हापूरात सतेज पाटलांनाच उमेदवारी, महाडिकांचा पत्ता कट

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी कोल्हापूर स्थानिक स्वराज संस्थेतून माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांना अखेर काँग्रेसने उमेदवारी जाहीर केली आहे. काँग्रेस पक्षाने विद्यमान आमदार महादेवराव महाडिक यांचा पत्ता कट करीत निष्ठावान अशा सतेज पाटलांच्या गळ्यात माळ टाकली आहे.
महादेवराव महाडिक यांनी कोल्हापूर महापालिकेत भाजपशी संधान साधून काँग्रेसविरोधात निवडणूक लढवली होती. त्यामुळे महाडिक यांचा पत्ता कट होणार हे जवळपास निश्चित मानले जात होते. मात्र, महाडिक यांच्यामागे काही मते असल्याने त्यांनी शिफारस केलेल्या जिल्हाध्यक्ष पी एन पाटलांना उमेदवारी मिळणार की सतेज पाटलांना हा संभ्रम कायम होता. अखेर प्रदेश महाराष्ट्रने सतेज पाटलांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब केले. विधान परिषदेसाठी अर्ज दाखल करण्याची आज शेवटचा दिवस आहे. आज दुपारी 1 वाजता सतेज पाटील कोल्हापूरात उमेदवारी अर्ज दाखल करतील.
काँग्रेस नेते महादेवराव महाडिक यांचा धाकटा मुलगा अमल महाडिक भाजपचा आमदार आहे, तर पुतण्या धनंजय महाडिक हा राष्ट्रवादीचा खासदार आहे. तर कोल्हापूर महापालिकेत थोरला मुलगा स्वराज महाडिक याच्या ताराराणी आघाडीने सतेज पाटलांना शह देण्यासाठी भाजपसोबत संधान साधले. महादेवराव महाडिक स्वत: काँग्रेस आमदार असतानाही त्यांनी सतेज पाटलांना शह देण्यासाठी सर्व पक्षीयांशी संधान साधून काँग्रेसला अडचणीत आणले. तरीही कोल्हापूरकरांनी सतेज पाटलांच्या नेतृत्त्वावर विश्वास टाकत काँग्रेसला घवघवीत यश दिले.
कोल्हापूर महापालिकेत अखेर राष्ट्रवादीच्या मदतीने काँग्रेसचा महापौर झाला व महाडिकांच्या संस्थानिक राजकारणाला ब्रेक लावला गेला. सतेज पाटलांनी पक्षश्रेष्ठींना महादेवराव महाडिकांच्या पक्षविरोधातील कारवाईबाबत अहवाल दिला. प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण आणि पक्षाचे उपाध्यक्ष राहुल गांधींनी सतेज पाटलांच्या नावावर शिक्कामोर्तब केले.
बातम्या आणखी आहेत...