आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
मुंबई/पुणे- नारळी-पोफळीच्या बागा, हापूसच्या आमराया, समुद्रकिनारा असा समृद्ध निसर्ग लाभलेल्या कोकणात आजवर अनेक मराठी चित्रपटांचे चित्रीकरण करण्यात आले आहे. हे लक्षात घेऊन नीतेश राणे यांच्या महाराष्ट्र कलानिधी यांच्या संस्थेने कोकणामध्ये फिल्मसिटी उभारण्याचे ठरवले आहे. मराठी चित्रपटसृष्टीसाठी एक हक्काची फिल्मसिटी या निमित्ताने उभी राहणार आहे. मुंबईत झालेल्या एका पत्रकार परिषदेत नीतेश राणे यांनी ही घोषणा केली.
सर्व सोयींनी सुसज्ज अशी चित्रनगरी नीतेश राणे यांच्या संकल्पनेतून साकारण्यात येणार आहे. मालवणमध्ये 10 एकरच्या निसर्गरम्य परिसरात या चित्रनगरीच्या पहिल्या टप्प्याची सुरुवात होणार आहे. मराठी मनोरंजन विश्वाचा आवाका दिवसेंदिवस वाढत आहे. अनेक चित्रपट, मालिका यांची निर्मिती करताना तंत्रसामग्रीचीही गरज वाढत आहे. त्यात कोकणात चित्रीत होणार्या चित्रपटांची संख्या अधिक आहे. नुकताच येऊन गेलेल्या आदित्य सरपोतदार दिग्दर्शित ‘नारबाची वाडी’ या चित्रपटाचाही काही भाग कोकणात चित्रीत झाला होता. हे लक्षात घेऊन मालवणमध्ये हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प उभा राहत आहे. विविध लोकेशन्स, इनडोअर स्टुडिओज, कॅमेरा, लाइट, साउंडशी निगडित इक्विपमेंट्स तसेच निर्मिती पश्चात तांत्रिक सोपस्कार करणार्या अद्ययावत यंत्रणा असलेले स्टुडिओ, कलाकार-तंत्रज्ञ यांच्या निवासाची सोय अशा सर्व गोष्टींचा सहभाग यात असणार आहे.
देशमुखांची वास्तुरचना
बॉलीवूडमधील प्रसिद्ध वास्तुरचनाकार जयंत देशमुख या चित्रनगरीची रचना करणार आहेत. चांगल्या लोकेशन्सच्या शोधात दूरवर जाणार्या निर्माता-दिग्दर्शकांना त्यानिमित्ताने उत्तम पर्याय उपलब्ध होणार आहेत. तसेच मुंबईतील फिल्मसिटीलाही हा एक चांगला पर्याय ठरू शकतो. या प्रकल्पासाठी अभिनेता सुशांत शेलार आणि महाराष्ट्र कलानिधीची टीम कार्यरत आहे.
कलाकारांसाठी सोय
मराठी इंडस्ट्रीसाठी एक हक्काची फिल्मसिटी कोकणात उभी राहणार आहे. मालवण, सिंधुदुर्गची सुंदर चित्रीकरण स्थळे आणि खाद्यसंस्कृती एकत्र जोडली जातील व मराठी कलाकारांसाठी ही फिल्मसिटी एक चांगली सुविधा देऊ शकेल, असे मला अभिनेता व कलानिधीचा सचिव म्हणून वाटते.
-सुशांत शेलार, अभिनेता व सचिव, महाराष्ट्र कलानिधी
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.