आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कोपर्डीचा न्‍याय: ‘7 तासांच्या’ पहिल्या आंदोलनाची न्याय मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- कोपर्डी बलात्कार व हत्या प्रकरणात मिळालेल्या निकालाने पीडित कुटुंबीयांना न्याय मिळाल्याची भावना सर्वत्र व्यक्त होत आहे. मात्र सुरुवातीला स्थानिक प्रशासनाने दुर्लक्षित केलेल्या या प्रकरणाला फास्ट ट्रॅकवर आणण्यासाठी शांतीपूर्ण मार्गाने कर्जत (जि. नगर) येथे केलेले ‘सात तासांचे’बिगर राजकीय आंदोलन कारणीभूत ठरले होते. कर्जत येथे १६ जुलै २०१६ रोजी झालेल्या त्या सात तासांच्या रास्ता रोको आंदोलनाने जशी कोपर्डी प्रकरणात महत्त्वाची भूमिका बजावली, तशीच मराठा मूक मोर्चाची ठिणगी पडून मराठा समाज संघटित व्हायला हाच सात तासांचा रास्ता रोको कारणीभूत ठरला. कोपर्डी प्रकरणात महत्त्वाची भूमिका बजावलेल्या आंदोलनाचा हा फ्लॅशबॅक...   


१३ जुलै २०१६च्या संध्याकाळी कोपर्डीत ती दुर्दैवी घटना घडली. सुरुवातीला स्थानिक प्रशासनाने त्याकडे दुर्लक्षच केले. त्याचा निषेध करत १४ जुलै रोजी ग्रामस्थ आणि मराठा संघटनांच्या कार्यकर्त्यांनी कर्जत येथे रास्ता रोको केला. त्यावर काहीतरी कारवाई केल्याचे दाखवत पोलिसांनी एका व्यक्तीला अटक केल्याचा दावा करत प्रकरण दडपण्याचा प्रयत्न चालवला होता.

 

स्थानिक प्रशासनाच्या म्हणण्यावर विश्वास ठेवत काही राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन थांबवले व १४ जुलैच्या मध्यरात्रीपर्यंत संपूर्ण प्रकरणच थंडावले. मात्र पीडित मुलीच्या अंत्यसंस्कारावेळी पुन्हा असंतोष उफाळला.  १५ जुलै रोजी सकाळी कर्जतला शिवप्रहार संघटना, संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते आणि ग्रामस्थ असा पोलिस ठाण्यासमोर पाच-सातशे  लोकांचा जमाव जमला. एका स्थानिक वर्तमानपत्राने दिलेल्या खोडसाळ वृत्ताबद्दल या वर्तमानपत्राची होळीदेखील करण्यात आली. तसेच पोलिस उपअधीक्षकांना धिम्या पोलिस कारवाईबद्दल जाब विचारत या जमावाने १६ जुलै रोजी रास्ता रोको आंदोलनाचा तोंडी इशारा दिला.  मात्र फक्त इशारा देऊन हे प्रकरण थंड बस्त्यात जाऊ द्यायचे नाही या इराद्याने मग कोपर्डी ग्रामस्थ आणि अनेक समविचारी मराठा संघटनांना साथीला घेत या आंदोलनाचे नियोजन करण्यात आले.

 

शांततापूर्ण मार्गाने कोणतेही निवेदन न देता फक्त न्यायाग्रहासाठी आणि बिगर राजकीय स्वरूपाचे हे आंदोलन असेल, अशी भूमिका निश्चित करण्यात आली. मोर्चाचे आवाहन करण्यासाठी समाजमाध्यमांच्या वापरामुळे स्थानिक प्रशासनावरील दबाव वाढू लागला. परिणामी आंदोलन मागे घेण्याची विनंती आंदोलकांना करण्यात आली. मात्र मागण्या पूर्ण होईपर्यंत आंदोलन होणारच असे सांगत १६ जुलै रोजी सकाळ दहा वाजेपासून आंदोलनाला सुरुवात झाली. सात तास चाललेल्या आंदोलनाची दखल घेत अखेर जिल्हाधिकारी आणि पोलिस अधीक्षकांना आंदोलनकर्त्यांपुढे येत शासनाची भूमिका मांडावी लागली. प्रकरण जलदगती न्यायालयात नेणे, अॅड. उज्ज्वल निकम यांची नियुक्ती, पीडित कुटुंबास मदत यासारख्या घोषणा सरकारला कराव्या लागल्या. पुढे १९ जुलै रोजी शिवप्रहार संघटनेने न्यायालयाच्या आवारात आरोपींवर केलेले अंडी फेको आंदोलन असो किंवा २३ जुलै रोजी सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवलेंच्या कोपर्डी भेटीला मराठा संघटनांनी केलेला विरोध असो, यातून आंदोलनाची ठिणगी पेटत गेली आणि राज्यभर मराठा मूकमोर्चाच्या माध्यमातून मराठा समाज रस्त्यावर उतरला.  

बातम्या आणखी आहेत...