आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कोपर्डी हत्याकांड: आज निकालाकडे लक्ष; फाशी नको जन्मठेप द्या; दोषींची न्यायालयाकडे याचना

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर- कोपर्डी (ता. कर्जत) येथील अल्पवयीन मुलीवर बलात्कार व खूनप्रकरणात दोषी ठरवण्यात आलेल्या तिन्ही दोषींना द्यावयाच्या शिक्षेवर मंगळवारी सत्र न्यायालयात युक्तिवाद सुरू झाला. यात तिसऱ्या क्रमांकाचा दोषी नितीन भैलुमे व मुख्य आरोपी जितेंद्र ऊर्फ पप्पू शिंदे यांनी स्वत:ला निर्दोष असल्याचे सांगत कमीत कमी शिक्षा द्यावी, अशी विनंती केली. बुधवारी दुसऱ्या क्रमांकाचा दोषी संतोष भवाळच्या वतीने युक्तिवाद होईल. नंतर विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम युक्तिवाद करणार आहेत. या घटनेनंतर राज्यभर जनाक्रोश पेटला होता. या खटल्याची सुनावणी होऊन जिल्हा व सत्र न्यायाधीश सुवर्णा केवले यांनी तिन्ही आरोपींना दाेषी ठरवले. त्यांना द्यावयाच्या शिक्षेबाबत मंगळवारी दोन युक्तिवाद पूर्ण झाले.


दोषी नितीन भैलुमे विद्यार्थी असल्याचा युक्तिवाद
नितीन भैलुमे विद्यार्थी आहे. त्याचे पदवीचे शिक्षण अर्धवट आहे. त्याचा भाऊ वेगळा राहतो, तर आई-वडील मजुरी करतात. आई आजारी असल्याने काळजी घेणारा कुणीच नाही. त्याला कमीत कमी शिक्षा द्यावी, असा युक्तिवाद त्याच्या वकिलांनी केला.


पप्पू शिंदेला फाशीऐवजी जन्मठेप देण्याची मागणी
पप्पू शिंदे या मुख्य आरोपीतर्फे विधी सेवा प्राधिकरणाने नियुक्त केलेले अॅड. योहान मकासरे यांनी युक्तिवाद केला. ते म्हणाले, पप्पूला कोणतीही गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही. त्याला जन्मठेप द्यावी. न्यायालय जो निकाल देईल, तो मान्य असेल.


...होय, आम्ही निर्दोष आहोत
वकिलांच्या युक्तिवादानंतर न्यायालयाने दोषी नितीन भैलुमे व जितेंद्र शिंदे यांना काही म्हणणे आहे का, अशी विचारणा केली. नितीन भैलुमेने निर्दाेष असल्याचे सांगत कमीत कमी शिक्षा द्यावी, अशी विनंती केली. तर, पीडितेला मी नव्हे, तर दुसऱ्याच कोणीतरी मारले असा दावा करत पप्पू शिंदेने कठोर शिक्षा देऊ नये, अशी मागणी केली.


आज निकालाकडे लक्ष
दोन्ही पक्षांचा युक्तिवाद बुधवारी संपेल. तो संपताच शिक्षा सुनावली जाते. मात्र, दोन्ही पक्षांच्या वतीने दाखले सादर केले गेले तर शिक्षा सुनावण्यासाठी कोर्ट वेळ घेऊ शकते.

 

आरोपींना दोषी कसे धरले?

 

रक्तगट व दातांचे ठसे ठरले महत्त्वाचा पुरावा-

आरोपीच्या कपड्यांवर ‘अ’ रक्तगटाचे नमुना (मुलीचा रक्तगट) अाढळले. मात्र अारोपी ‘ओ’ रक्तगटाचा होता. तिन्ही आरोपींच्या दातांच्या ठशांचे नमुने घेतले. मुख्य आरोपीच्या नमुने पीडितेच्या अंगावरील जखमांशी जुळले. हे पुरावे आरोपींना दोषी ठरवायला सबळ अाहेत, असे कोर्टाने नमूद केले.

 

महिनाभरात सुनावणी पूर्ण-

२० ऑक्टोबरला दोषारोपपत्र दाखल झाले. २६ अाॅक्टाेबरला अंतिम युक्तिवाद सुरू, तर ८ नाेव्हेंबरला पूर्ण झाला. ५ महिन्यांत सरकार पक्षाने ३१ साक्षीदार तपासले. पीडितेची मैत्रीण, तिची बहीण, आई, फिर्यादी, वैद्यकीय अधिकारी, रक्ताचे नमुने, दंतवैद्यकीय व इतर शास्त्रीय पुरावे ग्राह्य धरण्यात आले.

 

अॅड. निकम म्हणाले....

अॅड. उज्ज्वल निकम म्हणाले, फाशीची शिक्षा मागायची की जन्मठेपेची, याचा निर्णय आपण तुलनात्मक अभ्यास आणि पोलिस अधिकाऱ्यांशी बोलून करणार आहोत. आरोपींच्या वकिलांनी वेगवेगळे साक्षीदार मागून आणि त्यासाठी थेट सुप्रीम कोर्टापर्यंत जाऊन वेळ घालवला.

 

कोर्टाने जास्तीत जास्त शिक्षा करावी : मुख्यमंत्री

न्यायालयाने या प्रकरणात जास्तीत जास्त शिक्षा द्यावी अशी अपेक्षा व्यक्त करतो. न्यायालयाच्या निर्णयाने एका प्रकारे त्या भगिनीला आज न्याय मिळाला आहे. या नराधमांना कठोर शिक्षा मिळाल्यानंतर कोणीही अशा अत्याचाराला धजावणार नाही. त्यामुळे कायद्याचे भय आणि कायद्याचे राज्य स्थापित होईल.

 

पुढे स्लाईडद्वारे पाहा,  कोपर्डी घटनेतील माहिती...

बातम्या आणखी आहेत...