मुंबई - अभिनेत्री क्रांती रेडकरचा आयपीएल स्पॉट फिक्सिंगमध्ये सहभाग असल्याची चुकीची बातमी देणाऱ्या न्यूज नेशन वृत्तवाहिनीचे पत्रकार सुभाष शिर्के यांना न्यायालयाने शुक्रवारी दोषी ठरवले. मात्र, लगेचच त्यांना १५ हजार रुपयांचा जामीन मंजूर केला. क्रांतीने याबाबत खटला दाखल केला होता.
या प्रकरणातील इतर आरोपी न्यूज नेशन वृत्तवाहिनीचे चेअरमन अभय ओस्वाल भारताबाहेर असल्याने सुनावणीला उपस्थित राहू शकले नाहीत. या प्रकरणाची पुढील सुनावणी १७ सप्टेंबर रोजी होणार असून या वेळी मात्र त्यांना उपस्थित राहणे बंधनकारक असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे. या प्रकरणी पाठिंबा मिळावा म्हणून क्रांतीने गुरुवारी
फेसबुकवर जाहीर आवाहन केले होते. पहिल्या सुनावणीत क्रांतीला यश आले असून आता दुसऱ्या सुनावणीत काय होते याकडे लक्ष असल्याचे क्रांतीने सांगितले.