आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

क्रांतिदिन कार्यक्रमात सत्ताधारी गैरहजर, टीकेनंतर सारवासारव

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- अॉगस्टक्रांतिदिनी स्वातंत्र्य लढ्यात आपल्या प्राणांची आहुती दिलेल्या हुतात्म्यांना आदरांजली वाहण्याच्या मुंबईतील गोवालिया टँक येथील कार्यक्रमाला सत्ताधाऱ्यांनी चक्क दांडी मारली. सकाळी पार पडलेल्या या कार्यक्रमाला मुख्यमंत्री सोडा, पण शिवसेना किंवा भाजपचा एक मंत्रीही फिरकला नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांच्या समवेत नागपूर येथील ऑगस्ट क्रांतिदिनाच्या कार्यक्रमात सहभागी झाले होते.
देशाच्या स्वातंत्र्य चळवळीच्या निर्णायक लढ्याची सुरुवात ऑगस्ट १९४२ रोजी महात्मा गांधींनी ज्या ऑगस्ट क्रांती मैदानातून केली, त्या मैदानावर दरवर्षी स्वातंत्र्य लढ्यात आपल्या प्राणांची आहुती दिलेल्या हुतात्म्यांना अभिवादन केले जाते. दरवर्षी मुख्यमंत्री या ठिकाणी येऊन हुतात्म्यांना आदरांजली वाहतात. मात्र, या वर्षी या संकेताची पायमल्ली करत सत्ताधाऱ्यांनी या कार्यक्रमाला चक्क दांडी मारली. त्यानंतर सत्ताधाऱ्यांच्या या कृतीवर विरोधकांनी जोरदार टीका केली. विरोधक आणि माध्यमांच्या टीकेमुळे सत्ताधाऱ्यांच्या गोटात धावपळ झाली. अखेर दुपारी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी घाईघाईने ऑगस्ट क्रांती मैदानावरील क्रांती स्तंभावर हजेरी लावत पुष्पांजली वाहिली. मात्र, यावरून दिवसभर सत्ताधारी आणि विरोधक यांच्यादरम्यान चांगलेच वाकयुद्ध रंगले होते.

आधी गेले, म्हणजे बहादुरी नाही
राजकारण डोळ्यासमोर ठेवून काँग्रेस राष्ट्रवादीचे नेते टीका करत आहेत. ऑगस्ट क्रांती दिनाचे महत्व काँग्रेसने आम्हाला शिकवू नये. एखाद्या कार्यक्रमाला आमच्या आधी गेले, म्हणजे फार बहादूरी दाखवली असे होत नाही. रावसाहेबदानवे, प्रदेशाध्यक्ष भाजप

आम्हाला जाणीव आहे
काँग्रेसने आम्हाला क्रांती दिनाचे महत्व सांगण्याची गरज नाही. आम्हाला जबाबदारीची जाणीव आहे. एकनाथशिंदे, सार्वजनिक बांधकाम मंत्री
स्वातंत्र्यासाठी प्राणाची आहुती देणाऱ्या हुतात्म्यांचा सरकारला पूर्णपणे विसर पडला असून सेना भाजपचा एकही मंत्री वा नेता हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी ऑगस्ट क्रांती स्तंभाकडे फिरकला नाही. कार्यक्रमाकडे पाठ फिरवून सरकारने भारतीय स्वातंत्र्य चळवळीत बलिदान दिलेल्या हुतात्म्यांचा एक प्रकारे अपमान केला आहे. नवाबमलिक, नेते, राष्ट्रवादी काँग्रेस

सत्ताधारी आणि संघाचे स्वातंत्र्य चळवळीत काहीही योगदान नव्हते. परंतु, स्वातंत्र्य चळवळीत आपल्या प्राणांचे बलिदान देणाऱ्यांबद्दल त्यांनी किमान श्रद्धा बाळगायला हवी होती. मुख्यमंत्री किंवा एखाद्या वरिष्ठ मंत्र्यांने स्वातंत्र्य सैनिकांना अभिवादन करायला हवे होते. हुतात्म्यांप्रती एवढे साधे सौजन्य सत्ताधाऱ्यांमध्ये नसावे, हे दुर्दैवी आहे. अशोकचव्हाण, काँग्रस प्रदेशाध्यक्ष