आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Kripashankar Singh Escaping From Congress Corruption Fight

काँग्रेसच्या भ्रष्टाचारविरोधी लढाईतून कृपाशंकर सिंह यांचा पळ!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - काँग्रेसजनांना भ्रष्‍टाचाराविरोधी लढाईत उतरण्याचे राहुल गांधी यांनी आवाहन केले खरे, पण अजूनही या लढाईचे महत्त्व त्यांच्याच पक्षाच्या आमदारांच्या गळी उतरण्याचे नाव घेत नाही. मुंबईत झालेल्या एका कार्यक्रमात कोट्यवधी रुपयांच्या भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या आमदार कृपाशंकर सिंह यांनी या लढाईतून अक्षरश: पळ काढला. मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष जनार्दन चांदूरकर यांनी भ्रष्टाचारविरोधी लढाईचा प्रस्ताव मांडला आणि त्याला सर्वांनी हात वरून अनुमोदन दिले. मात्र, एकच हात वर गेला नाही आणि तो होता कृपाशंकर सिंह यांचा!
ऑगस्ट क्रांती मैदानाजवळील तेजपाल हॉलमध्ये काँग्रेस स्थापना दिवस शनिवारी साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला अखिल भारतीय काँग्रेसचे सचिव बाला बच्चन यांच्यासह प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, मंत्री सुरेश शेट्टी, नसीम खान, खासदार हुसेन दलवाई यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी उपस्थित होते. 1885 मध्ये याच ठिकाणी काँग्रेस कार्यकारिणीची पहिली बैठक झाली होती. आपला 128 वा वर्धापनदिन साजरा करणा-या काँग्रेसने भ्रष्टाचारमुक्तीचा नारा लगावला खरा, पण त्यात भ्रष्टाचाराचा ठपका असलेले कृपाशंकर सहभागी न झाल्याने कार्यक्रमाला गालबोट लागले.
काँग्रेसचे सरकार असलेल्या मुख्यमंत्र्यांची बैठक घेऊन राहुल गांधींनी भ्रष्टाचाराविरोधीच्या लढाईत सक्रियपणे उतरण्याचे आवाहन केले होते. याच वेळी त्यांनी आदर्शप्रकरणी महाराष्‍ट्र सरकारने घेतलेल्या भूमिकेवरही टीका केली होती. या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या नेत्यांचे अद्याप बौद्धिक झाले नसले तरी कार्यकर्त्यांना मात्र स्फूर्ती मिळाली आहे आणि तेच याच कार्यक्रमात बघायला मिळाले. बाला बच्चन, माणिकराव ठाकरे, जनार्दन चांदूरकर यांची भाषणे झाल्यानंतर काँग्रेसच्या चार कार्यकर्त्यांनी उभे राहून राहुल गांधींच्या भ्रष्टाचाराविरोधी लढाईत सहभागी होण्याचा ठराव मांडावा, असा जोरदार आग्रह धरला. अचानक कार्यकर्त्यांकडून झालेल्या मागणीमुळे नेते गडबडून गेले. पण लगेचच त्यांनी स्वत:ला सावरले आणि चांदूरकर यांनी तसा प्रस्ताव मांडत समर्थन देण्याचे आवाहन केले. मात्र, कृपाशंकर सिंह सोडून सर्वांचे हात वर गेल्याने नेत्यांसह कार्यकर्त्यांना मोठा धक्का बसला.
कृपांमुळे मुंबई काँग्रेस बदनाम झाली
मुंबई महापालिकेच्या तोंडावर कृपाशंकर यांच्या भ्रष्टाचाराची प्रकरणे बाहेर आली. यात कोकणातील कोट्यवधी रुपये किमतीच्या जमिनींचा समावेश होता. त्याशिवाय त्याच्याजवळ असलेली बेहिशेबी मालमत्ताही उघड झाली. तसेच अनधिकृरीत्या रिव्हॉल्व्हर तसेच गोळ्याही त्याच्या घरी सापडल्या होत्या. विशेष म्हणजे कृपाशंकर त्या वेळी मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष होते. विरोधकांनी कृपांच्या भ्रष्टाचारी प्रकरणावर हल्लाबोल करत मुंबई महापालिकेत काँग्रेसला पुरते बदनाम केले. परिणामी युतीला सत्ता राखण्यासाठी मोठी मदत मिळाली. हीच चर्चा पुन्हा एकदा काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये सुरू असलेली दिसली.
सक्रिय होण्याचा प्रयत्न
बेहिशेबी मालमत्ताप्रकरणी न्यायालयाने फटकाल्यानंतर कृपाशंकर सिंह यांनी मुंबई काँग्रेस अध्यक्षपपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर ते पक्षात सतत सक्रिय होण्यासाठी धडपडत आहेत. गेल्या काही महिन्यांत ते काँग्रेसच्या अनेक कार्यक्रमांतून हजेरी लावताना दिसत आहेत. मात्र, पक्षश्रेष्ठी व राज्यातील नेत्यांनी त्यांना म्हणावा तसा प्रतिसाद दिला नाही.