आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कुजबुज : वाणींच्या ‘वाणी’ला साहेबांकडून चाप

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पूर्वाश्रमीचे संघातील वसंत वाणींनी बारा-तेरा वर्षांपूर्र्वी हातात घड्याळ बांधले. ‘राष्ट्रवादी’त आल्यानंतर त्यांनी संघाप्रमाणेच चिंतन बैठका, बौद्धिके, आढावा बैठका वगैरेचा सपाटा लावला. अजितदादांच्या जवळ जाऊन ‘राष्ट्रवादी’चे प्रदेश उपाध्यक्षपदही मिळवले. धाकल्या पवारांची एवढी मर्र्जी मिळवली की मुंबईत नव्याने बांधलेल्या राष्ट्रवादी भवनात वाणींसाठी स्वतंत्र केबिन ठेवली गेली. मंत्र्यांना-पदाधिका-यांना झापणे, आदेश सोडणे, दौ- यावर असताना पक्षासाठी खर्च करायला लावणे अशी ‘कार्यक्षमता’ वारंवार दाखवू लागल्याने ‘कानामागून आले अन् तिखट झाले’ असा प्रकार वाणींच्या बाबतीत झाला. पण दादांच्या पाठिंब्यामुळे वाणींना आवरायची काही सोय नव्हती. दबक्या आवाजात तक्रारी ‘साहेबां’पर्यंत गेल्या. अखेरीस संधी मिळ- ताच त्यांनी वाणींच्या वाणीला चाप लावला. शिवाय मुंबईला बोलावून खासगीत हजामत केली ती वेगळीच. वरमलेले वाणी आता साहेबांनी नुसती नाराजी व्यक्त केल्याचे सांगत सुटलेत.

दबंग गृहमंत्री- कायदा-सुव्यवस्थेच्या नावाने गळा काढणा-यांना गृहमंत्री बदलल्यानंतर अभूतपूर्व अनुभव येत आहेत. गृहमंत्रिपदावर सुशीलकुमार आले अन् गुन्हेगारांचे ग्रह फिरले की काय अशी शंका येण्याइतपत परिस्थिती झपाट्याने बदलली आहे. गंभीर गुन्ह्यात अडकलेल्या गुन्हेगारांना तर स्वप्नातही गृहमंत्रीच दिसत असावेत. प्रलंबित फाशीचा गुन्हेगार कसाबला सुशीलकुमारांनी तडकाफडकी लटकवले, पाठोपाठ अफझल गुरूलाही यमसदनी धाडले. या दोन धाडसी निर्णयांमुळे सुशीलकुमारांनी खरा दबंग असल्याची जणू झलकच दाखवली आहे. एवढे कमी होते की काय म्हणून दिल्ली गँगरेपचा मुख्य आरोपी रामसिंग याने स्वत:लाच फासावर लटकवून घेतले. कायद्याचा धाक असल्याची स्थिती कितीतरी वर्षांनी मायबाप जनतेला अनुभवायला मिळाली. मात्र एवढी झपाट्याने परिस्थितीत सुधारणा होत राहिली तर लवकरच रामराज्य येते की कायअशी शंका व्यक्त केली जात आहे. मात्र नेहमीच महागाईच्या नावाने शंख करणा-या खिसाप्रेमी जनतेला निवडणुकांच्या तोंडावर देशप्रेमाची झलक दाखवून सत्ताधा-यांना आपला कार्यभाग तर साधायचा नाही ना, अशीही कुजबुज आहे.

मनसे की ‘पृथ्वी’राजसेना- उन्हाळी अधिवेशनाच्या आदल्या दिवशीच विरोधी पक्षनेत्यांवर तोडबाजीचा आरोप करून राज ठाकरे यांनी विरोधी पक्षांना पुरते बेजार केले. नाथाभाऊंनी अवसान गोळा करून ठाकरेंना प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केला. पण त्यांचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष नितीनभौ स्वत:च कृष्णकुंजवर रात्रीच्या जेवणाला गेले. प्रत्यक्ष अधिवेशनाच्या पहिल्या दिवशीच विधिमंडळाच्या दारात ‘प्रचंड’ आंदोलनाची तयारी सेना-भाजपने केली. रिकामे हंडे, चारा, फ्लेक्स वगैरे साहित्यही गोळा केले. येथेही मनसेनेच बाजी मारली. थेट राज्यपालांचीच गाडी अडवली. चर्चेत पुन्हा मनसेच. राज्यपालांची गाडी अडवल्यानंतर खरे तर मनसेच्या आमदारांवर कारवाई व्हायला हवी होती. तशा ती काही झाली नाही. उलट आक्रमक विरोधी पक्ष म्हणून मनसेचीच प्रतिमा मोठी झाली. सरकारला अडचणीत आणण्याचे अनेक मुद्दे असूनही विरोधी पक्ष न लढताच घायाळ झाला. धोरणी मुख्यमंत्र्यांबरोबर राज ठाकरे यांचे मधुर संबंध असल्याची चर्चा यामुळे रंगते आहे. कधीकाळी वसंतराव नाईक आणि बाळासाहेब ठाकरे यांच्यातही जवळीक होती तेव्हा शिवसेनेलाही ‘वसंतसेना’ म्हटले गेले. मनसेला अजून कोणी ‘पृथ्वी’राजसेना म्हटलेले नाही इतकेच.

दाग अच्छे होते हैं- दाग अच्छे होते हैं, असा नवीनच सुविचार देणारी डिटर्जंटची एक जाहिरात अधूनमधून झळकत असते. मुलाने कपडे खराब केले म्हणून खुश होणारी आई जशी जाहिरातीतून बघावयास मिळते तसे भीषण दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विरोधकांची एकजूट न झाल्यामुळे सत्ताधारीसुद्धा अधिवेशन एन्जॉय करताना दिसत आहेत. विरोधकांतच बेबनाव असल्यामुळे व मनसे-खडसे वादामुळे सत्ताधारी मात्र भलतेच खुशीत आहेत. या वादामुळे टीकेचे मूळ विषयच बाजूला राहिले, अन्यथा सिंचन घोटाळा, अधिकार नसलेली एसआयटी, प्राध्यापकांच्या मागण्या, कृषी कर्जमाफी घोटाळा एवढी अस्त्रे हाती असताना विरोधक असे हतबल झालेले प्रथमच बघावयास मिळत आहेत. अधिवेशनाचा काळ खरं तर सत्ताधाºयांसाठी घामाघूम होण्याचा, पण राज-खडसे वाक्युद्धातच एवढे घामाघूम झालेत की सत्ताधाºयांवर वार करण्यास त्यांना वेळच नाही. मात्र या सर्व घडामोडी बघून बाबा व दादा गालातल्या गालात हसून ‘दाग अच्छे होते हैं’ याप्रमाणे ‘दुष्काळ अच्छा होता है’ असे मनातल्या मनात म्हणत असावेत.

उंच यांचा झोका- दुर्दैवी अशा दिल्ली गँगरेपच्या पार्श्वभूमीवर महिलांवर होणारे अत्याचार कमी व्हावेत म्हणून सरकारने एक विधेयक आणायचे ठरवले खरे; पण लैंगिक सहमतीचे वय 16 असावे की 18 या मुद्द्यावर विषय भरकटला. अखेरीस लैंगिक सहमतीचे वय कमी करण्यात आले व सरकारलाही निर्णय घेण्याचे समाधान मिळाले. मात्र आता सुजाण नागरिकांत चर्चा सुरू झाली आहे की एवढे करूनही पुढे असेच काहीसे घडले तर पुन्हा वय 16 वरून 14 करणार का? म्हणजे आपण हळूहळू पुन्हा दीडशे- दोनशे वर्षे पाठीमागे चाललो आहोत का, जेव्हा बालविवाह होत असत. ‘उंच माझा झोका’ ही मालिका याच विषयावर आहे. ज्यामध्ये रमाबाई रानडे बालविवाह थांबवण्यासाठी आटोकाट प्रयत्न करताना दाखवल्या आहेत. मात्र आता लैंगिक सहमतीचे वय 16 करून सरकारने त्यांचा झोका उंच गेल्याचे दाखवले की झोक गेल्याचे दाखवले हे लवकरच कळेल. पण मॅच्युरिटीचा निर्णय असा इम्मॅच्युअर पद्धतीने घेतल्याने भविष्यात काय धोके वाढून ठेवले आहेत, हे सरकारने ओळखायला हवे. कारण लैंगिकता समाजात नेहमीसाठी राहणारी बाब असली तरी रमाबाई व माधव रानडे यासारखी वंदनीय व्यक्तिमत्त्वे समाजसुधारणेसाठी पुन्हा पुन्हा जन्मास येत नाहीत, हेही तितकेच खरे!