आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कुंभमेळ्यासाठी हजारो कोटी, शेतकऱ्याला मात्र काहीच नाही

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अपक्ष आमदार बच्चू कडू - Divya Marathi
अपक्ष आमदार बच्चू कडू
मुंबई- नाशिकमधील कुंभमेळ्यासाठी अडीच हजार कोटी रुपये देताना कुणी चर्चेची वाट बघत नाही. पण शेतकऱ्यांच्या मदतीसाठी मात्र तासन््तास चर्चा केल्या जातात’, अशा कठोर शब्दांत अपक्ष आमदार बच्चू कडू यांनी गुरुवारी विधानसभेत फडणवीस सरकारच्या कृषीविषयक धोरणाचा निषेध केला. तर ‘शेतकऱ्यांनी आता आपली जबाबदारी आपणच घ्यावी. कारण सरकार आता फक्त उद्योगपतींची काळजी घेणार आहे,’ अशी टीका विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला. शेतकऱ्यांच्या आत्महत्यांवर विरोधी पक्षांनी उपस्थित केलेल्या चर्चेदरम्यान ते बोलत होते.
‘शेतकऱ्यांना कर्जमाफी देता येणार नाही असे आपण म्हणालोच नाही’, असा खुलासा मुख्यमंत्र्यांनी केल्यानंतर गेले तीन दिवस कर्जमाफीच्या मुद्द्यावरून निर्माण झालेला तिढा सुटला अाणि विरोधकांनी अधिवेशनाच्या कामकाजात भाग घेण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे सरकारला दिलासा मिळाला असला तरी विराेधकांनी मात्र सरकारला चांगलेच धारेवर धरले.
चर्चेची सुरुवात करताना ‘अजून किती शेतकऱ्यांच्या आत्महत्यांची वाट हे सरकार पाहणार आहे’, असा सवाल करत विरोधी पक्षनेत्यांनी सगळीकडून संकटात सापडलेल्या शेतकऱ्याला या संकटातून बाहेर काढण्यासाठी राजकीय इच्छाशक्तीची गरज असल्याचे स्पष्ट केले. आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांना दत्तक घ्या, त्यांच्या शिक्षणाची जबाबदारी घ्या. आतापर्यंत फक्त विदर्भात आत्महत्या होत असत, मात्र आता मराठवाडा आणि नाशिकसारख्या भागातही आत्महत्यांचा आकडा वाढू लागला आहे, हे गंभीर असल्याचा उल्लेख विखे पाटील यांनी केला.

लवकरच उपाययाेजना : कुटे
भाजपचे आमदार संजय कुटे यांनी सध्याच्या परिस्थितीला विरोधी पक्षच जबाबदार असल्याचा आरोप केला. ‘आमच्या मित्र पक्षाचे प्रमुख नेते उद्धव ठाकरेंनी कर्जमुक्तीची मागणी केली. त्यामागे त्यांना अभिप्रेत असलेला जो अर्थ आहे त्याला आमचे नेतेही अनुकूल असून लवकरच मुख्यमंत्री नेमक्या काय उपाययोजना करत आहोत ते स्पष्ट करतील. आम्ही गेल्या १५ वर्षांत जे बोललो ते येत्या पाच वर्षांत पूर्ण करू,’ असे सांगत त्यांनी शिवसेनेचे गुलाबराव पाटील आणि अर्जुन खोतकर यांना निश्चिंत राहण्याचा सल्ला दिला.

कलेक्टरला सांगा जाेडधंदा करायला: कडू
अचलपूरचे अपक्ष आमदार बच्चू कडंूनी सरकारचे अक्षरश: वाभाडे काढले. भाजप किंवा शिवसेनावाले देव मानणारे लोक आहेत, तरी निसर्ग कोपला आहे. सरकार कुठलेही असू द्या, पण शेतकरीच मरतो. इथे शेतकऱ्यांची पोरे आमदार झालीत, तरी पण मरतोय शेतकरीच. आम्ही शेतकऱ्याची पोरे म्हणून नाही तर विविध पक्षांचे गुलाम म्हणून इथे येतो. त्यामुळे आपल्याकडून न्यायाची अपेक्षा हा शेतकरी करत नाही. इथे कुंभमेळ्यासाठी अडीच हजार कोटी देताना कुणी चर्चेची वाट पाहत नाही; पण शेतकऱ्यांच्या मदतीवर मात्र तासन््तास चर्चा केल्या जातात,’ असे सांगत कडू यांनी सरकारवर प्रहार केला. या त्यांच्या वक्तव्यावर भाजपच्या आमदारांनी हरकत घेतली. यावर अध्यक्षांनी ‘कुठल्याही धर्माबद्दल बोलू नका’ असे सांगत कडूंना भाषण सुरू ठेवण्यास सांगितले. ‘११ कोटी जनतेला मदतीसाठी ५४ कोटी आणि १६ लाख सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी १.६४ कोटी रुपये. हिंमत असेल तर कर्मचाऱ्यांचा पगार कापा ना. आम्हाला सांगता जोडधंदा करा, कलेक्टरला सांगा ना जोडधंदा करायला. द्या त्याच्या खुट्याला तीन-चार म्हशी बांधून, शेतकऱ्याचे प्रबोधन करायला पाहिजे म्हणता, प्रबोधनासाठी काय विठ्ठल उभा करणार का?’अशा शब्दांत कडू यांनी ठणकावले.

शेतकऱ्यांना जाेडधंदा द्या : देशमुख
संकटात सापडलेल्या शेतकऱ्याला दुग्ध व्यवसाय आणि कुक्कुटपालनाचा जोडधंदा दिल्यास आत्महत्या कमी होतील, असा सल्ला देत शेकापचे ज्येष्ठ आमदार गणपतराव देशमुख यांनी कर्जमाफीशिवाय सध्या पर्याय नसल्याचे सांगितले. त्यामुळे सरकारने लवकरात लवकर घोषणा करावी, अशी मागणी केली. काँग्रेसचे नेते पतंगराव कदम यांनी ‘तुम्ही काय केले, आम्ही काय केले असले लुटूपुटूचे खेळ आता थांबवा’, असा सल्ला सत्ताधाऱ्यांना दिला. शेतकरी अडचणीत आलेला असताना असे कधी तरी निर्णय घेऊन चालत नाहीत, सातत्याने निर्णय घ्यावे लागतात,’ असा टाेलाही त्यांनी लगावला.

फडणवीस सरकारवर खुनाचा गुन्हा नाेंदवा
धनंजय मुंडे यांनी काढले सरकारचे वाभाडे
मुंबई - शेतकऱ्यांच्या मतांवर सत्तेवर आलेल्या भाजपने आपल्याच जाहीरनाम्याला हरताळ फासला आहे. सत्तेवर येण्यापूर्वी भाजपने कृषी मालाला हमी भाव, कर्जमुक्ती आणि शेतकरी आत्महत्या थांबवण्यासाठी नवे धोरण अशी वचने िदली होती. त्यातल्या एकाचीही पूर्तता झाली नसून गेल्या सात महिन्यांत १८०० शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या अाहेत. त्यामुळे फडणवीस सरकारवर ३०२ चा गुन्हा का दाखल करू नये? असा सवाल करत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी विधान परिषदेत गुरुवारी सरकारला धारेवर धरले. नैसर्गिक संकटामुळे शेतकरी पिचला असताना मुख्यमंत्री मात्र कर्जमाफी देता येणार नाही, असे म्हणतात. तीन दिवसांपासून सरकार कर्जमाफीच्या प्रश्नावर चर्चेस तयार नाही. मग हे सरकार नक्की शेतकऱ्यांच्या बाजूचेच आहे का, असा सवाल मुंडे यांनी उपस्थित केला. मुंडे म्हणाले, ग्रामीण संस्कृतीत पायगुणाला मोठे महत्त्व आहे. पंतप्रधानपदावर नरेंद्र मोदी आरूढ झाल्यामुळे देशात अनुकूल बदल झाल्याचे सांगितले होते. हे भाजपला मान्य असेल तर मग राज्यात ओढवलेल्या संकटाची जबाबदारीदेखील फडणवीस सरकारने घ्यायला हवी. शेतमालास उत्पादन खर्चाव्यतिरिक्त ५० टक्के नफा िमळेल असा दर देण्याचे भाजपने जाहीरनाम्यात सांगितले गेले, आज शेतमालास पाच टक्केसुद्धा नफा मिळत नाही,’ अशी खंत व्यक्त करताना धनंजय मुंडे यांनी सरकारच्या कारभारावर ताशेरे अाेढले.

नेपाळ, भूतानला मदत, शेतकरी मात्र वाऱ्यावर
अजित पवारांचा फडणवीसांवर हल्लाबोल
मुंबई - पंतप्रधान मोदी भूतान किंवा नेपाळसारख्या देशांना हजारो कोटींची आर्थिक मदत देतात; पण देशातल्या शेतकऱ्यांना मदत देण्यात अडचण कसली अाहे, असा सवाल करत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी सरकारवर टीकास्त्र साेडले. राज्यासमोरच्या बिकट आर्थिक परिस्थितीचे कारण न देता शेतकऱ्यांना मदतीची भूमिका सरकारने घ्यावी, अशी आग्रही मागणीही त्यांनी केली.
‘विरोधकांसह शिवसेनेलाही कर्जमाफी द्यावी असे वाटते. पण फक्त भाजपचा नकार आहे ही भूमिका योग्य नाही. पीक कर्ज न देणाऱ्या बँकांवर गुन्हे दाखल करणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री करतात, तर दुसरीकडे गुन्हे दाखल करता येणार नाहीत असे पत्रक रिझर्व्ह बँक काढते. त्यामुळे सरकारची नेमकी भूमिका काय आहे? अशा प्रश्न पडताे. पुरवणी मागण्यांमध्ये एलबीटी, टोलसाठी मोठी तरतूद होते. पण शेतकऱ्यांसाठी तुटपुंजी तरतूद केली जाते हे योग्य नाही. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी तेलंगणाने १७ हजार कोटींची तर आंध्र प्रदेशनेही पाच हजार कोटींची तरतूद केली, मग आपल्याला कर्जमाफी देण्यात काय अडचण आहे?’ विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकऱ्यांचा आधार असलेल्या साेयाबीनच्या हमी भावात एका पैशाचीही वाढ केली नाही. मंत्रालयातील मंत्र्यांच्या मिनरल वॉटरच्या बाटल्यांची लाखोंची बिले देण्यासाठी सरकारकडे पैसा आहे. पण शेतकऱ्याला मात्र दुधासाठी रुपया वाढवला जात नाही,’ असे पवार म्हणाले.
बातम्या आणखी आहेत...