आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कुंभमेळ्यात साध्वींसाठी करणार स्वतंत्र व्यवस्था

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- साध्वींसाठी कुंभमेळ्यात स्वतंत्र व्यवस्था दोन ते तीन दिवसांत केली जाईल, अशी घोषणा नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी शुक्रवारी विधान परिषदेत केली. तसेच महिला आणि पुरुष साधूंमधील वादावर पडदा पडल्याचेही त्यांनी सांगितले. साेहळ्यासाठी नाशिक मनपा व राज्याने पुरेसा निधी दिला असून केंद्राकडून ६८९ कोटी निधी मिळवण्यासाठी पाठपुरावा केला जात असल्याचे ते म्हणाले.
कुंभमेळा सुरू होऊनही पायाभूत सुविधांची कामे अपूर्ण असल्याबद्दलची लक्षवेधी सूचना जयंतराव जाधव यांनी मांडली. त्याला उत्तर देताना महाजन म्हणाले की, ‘तपोवन आणि साधुग्राममधील पायाभूत सुविधांची कामे पूर्ण झाली आहेत. या कुंभमेळ्यासाठी २३७८ कोटींचा अाराखडा तयार केला आहे. २५ टक्के निधी महापालिका देणार आहे, तर उर्वरित निधी राज्य आणि केंद्र सरकार देणार आहे. मात्र, केंद्र सरकारकडून ६८९ कोटी रुपयांचा निधी अजूनही प्राप्त न झाल्यामुळे नाशिक महापालिकेला कर्ज काढावे लागल्याचे सांगत केंद्राचा हिस्सा मिळवण्यासाठी राज्य सरकारतर्फे पाठपुरावा केला जात आहे,’ असेही महाजन म्हणाले.

कंत्राटी डाॅक्टरांची नियुक्ती
कुंभमेळ्यातील अपुऱ्या आरोग्य सुविधांचा मुद्दा उपस्थित केला असता, प्रशासनाकडे डॉक्टरांची कमतरता असल्याने कंत्राटी पद्धतीने डॉक्टरांची नियुक्ती करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच साधुग्राम येथील संत, महंत यांच्यासाठी पुरेसा धान्यपुरवठा होत नसल्याची बाबही शासनाने गंभीरपणे घेतली असून त्याची सखोल चौकशी करण्याचे आदेशही देण्यात आल्याचे महाजन यांनी सांगितले.

जंतुनाशके खरेदीची चौकशी करणार
कुंभमेळ्याकरिता साडेचार कोटी रुपयांची जंतुनाशके खरेदी करून ती परस्पर नाशिकला पाठवण्यात आली. मात्र, महापालिकेने तशी मागणी केलीच नव्हती. मग या जंतुनाशकांची परस्पर खरेदी का केली, याची चौकशी करण्याचे आदेशही दिल्याचे महाजन म्हणाले.

विमानसेवेसाठी पाठपुरावा करणार
नाशिक-पुणे विमानसेवेचे भाडे ५ हजार आणि हॉल्टिंग चार्ज ३५ हजार रुपये हा खर्च खासगी कंपनीला परवडत नसल्याने कंपनीने ही सेवा बंद केली. त्यामुळे भाडे कमी करण्यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करणार असल्याचे महाजन यांनी सांगितले.
बातम्या आणखी आहेत...