आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Lacking Clarity On Large Number Of Issues Including Radioactivity And Land Acquisition In Jaitapur

जैतापूर प्रकल्पाच्या पर्यावरणीय मान्यतेचा पुनर्विचार करावा- माकप

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- गुजरातमधील मिठी विर्दी येथील प्रस्तावित अणुवीज प्रकल्पाच्या पर्यावरणीय मूल्यांकन अहवालात किरणोत्सार, भूसंपादन आणि इतर महत्त्वाच्या मुद्यांबाबतीत गंभीर त्रुटी असल्याचे नोंदवून पर्यावरण मंत्रालयाच्या तज्ञ समितीने न्यूक्लिअर पॉवर कॉर्पोरेशनच्या पर्यावरणीय मान्यतेचा अर्ज परत पाठवून दिल्याने महाराष्ट्र मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष या तज्ञ समितीच्या निर्णयाचे स्वागत करत आहे असे माकपचे राज्य सरचिटणीस डॉ. अशोक ढवळे यांनी म्हटले आहे. कोकणात होऊ घातलेल्या जैतापूर प्रकल्पाच्या अहवालाच्या बाबतही याच अटी तंतोतंत लागू होत असल्याने या प्रकल्पाच्या पर्यावरणीय मान्यतेचा पुनर्विचार करावा असे म्हटले आहे.
माकपचे राज्य सरचिटणीस अशोक ढवळे यांनी पत्रक काढून याबाबत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. ढवळेंनी आपल्या निवेदनात म्हटले आहे की, ज्या त्रुटी मिठी विर्दी अणुवीज प्रकल्पाच्या पर्यावरणीय मूल्यांकन अहवालात पर्यावरण मंत्रालयाच्या तज्ञ समितीने नोंदवल्या आहेत त्या सर्व त्रुटी जैतापूर अणुवीज प्रकल्पाच्या अहवालाच्या बाबतीतही तंतोतंत लागू आहेत. अणुउर्जा नियामक मंडळाकडून मिठी विर्दी प्रकल्पाच्या जागेला मान्यता नाही हे एक
प्रमुख कारण तज्ञ समितीने नोंदवले आहे. 2010 मध्येच पर्यावरणीय मान्यता दिलेल्या जैतापूर प्रकल्पाच्या जागेला आजही अणुउर्जा नियामक मंडळाने मान्यता दिलेली नाही. तज्ञ समितीने नोंदवलेले दुसरे प्रमुख कारण म्हणजे अणु कचर्‍याची विल्हेवाट लावण्यासाठी भूपृष्ठाजवळ असणार्‍या रचनेची जागा निश्चित नाही. हे जैतापूर प्रकल्पाच्या बाबतीतही खरे आहे. या कोणत्याच प्रकल्पांमध्ये जळीत इंधनाचा साठा करण्यासाठीची “अवेफ्रॉम रिअ‍ॅक्टर” (Away from Reactor) रचना कोठे असणार हे ठरलेले नाही.
पर्यावरण मंत्रालयाच्या तज्ञ समितीने मिठी विर्दी प्रकल्पाच्या अहवाला बाबतीत नोंदवलेले गंभीर आक्षेपांच्या पार्श्वभूमीवर लक्षात घेता पर्यावरणीय मूल्यांकन अहवालात तशाच गंभीर त्रुटी असलेल्या जैतापूर प्रकल्पाच्या पर्यावरणीय मान्यतेचा पुनर्विचार करायला हवा. पंतप्रधानांच्या अखत्यारीत असलेल्या अणुऊर्जा विभागाने जैतापूर प्रकल्पाला दिलेल्या पर्यावरणीय मान्यतेचे पुनरावलोकन करण्याचे आदेश ताबडतोब द्यावेत अशी मागणी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाची महाराष्ट्र राज्य समिती करत आहे.
जैतापूर अणुवीज प्रकल्प पुढे रेटण्याचा सरकारचा निर्धार नरेंद्र मोदींनी स्थानिक जनतेच्या विरोधाकडे पूर्णपणे दुर्लक्ष करून जूनमध्ये जाहीर केला. पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी जैतापूर प्रकल्पाचा पुनर्विचार नाही असे जाहीर केले. पण मिठी विर्दी प्रकल्पाच्या बाबतीत पर्यावरण मंत्रालयाच्या तज्ञ समितीने घेतलेल्या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान आणि पर्यावरण मंत्र्यांनी त्यांची जाहीर केलेली भूमिका मागे घेऊन घ्यायला हवी. सुरक्षिततेच्या बाबतीत दूरगामी व अत्यंत घातक परिणाम असणार्‍या अणुवीजेच्या बाबतीत गुजरात आणि महाराष्ट्राला वेगवेगळे नियामक आणि पर्यावरणीय नियम लावता येणार नाहीत, असे ढवळेंनी म्हटले आहे.