आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गूढ उकलले : लैलाच्या बंगल्यात सापडले सहा मानवी सांगाडे

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

उंटदरी (इगतपुरी)- मुसळधार पावसात 500 पोलिसांनी उंटदरीभोवती उभी केलेली तटबंदी, पोलिस दलाच्या गाड्यांची युद्धपातळीवर सुरू असलेली ये-जा, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय वृत्तवाहिन्यांच्या ओबी व्हॅनची वृत्तांकनासाठी झालेली गर्दी, काही हौशी तरुणांकडून धोकेदायक दरीतून लैलाच्या रहस्यमयी फार्महाउसपर्यंत पोहचण्यासाठी सुरू असलेली धडपड अशा वातावरणात मुंबईच्या क्राइम ब्रॅँच व इगतपुरी पोलिसांनी लैलाच्या परिवाराचे मृतदेह शोधण्यासाठी मंगळवारी मोहीम सुरू केली. फार्महाउसमागील भागात तब्बल अकरा तास खोदकाम केल्यानंतर सहा मानवी सांगाडे पोलिसांच्या हाती लागल्याचे वृत्त आहे. याबरोबरच काही मोबाइल फोन, कपड्यांची बॅग सापडल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.
पाक अभिनेत्री लैला खानसह कुटुंबीयांची हत्या केल्याचा गौप्यस्फोट करणार्‍या सावत्र पिता परवेझ टाक याला मुंबई क्राइम ब्रॅँच तसेच एटीएसच्या पथकाने दुपारी 12 च्या सुमारास इगतपुरीत विशेष बंदोबस्तात उंटदरीतील बंगल्यात आणले. तिकडे जाणारा एकमेव कच्चा मार्गही पोलिसांनी बॅरिकेड्स टाकून ताब्यात घेतला होता. एवढेच नव्हे तर धोकेदायक दरीतून बंगल्याकडे येणार्‍या सर्व वाटांवर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त होता. फॉरेन्सीक लॅब व श्वानपथकालाही पाचारण करण्यात आले होते. उंटदरीत मुसळधार पाऊस असल्यामुळे पोलिसांना बंदोबस्तात प्रचंड अडचणी येत होत्या. परवेझ टाक आल्यानंतर बंगल्याच्या मागील भागातील सेफ्टी टॅँक आणि परिसरात खोदकाम सुरू करण्यात आले. याठिकाणी बेपत्ता असलेल्या लैला खानसह आई सेलिना पटेल, भाऊ इमरान, बहीण आफ्रिन, झारा व त्यांची नातेवाईक रशिदा खान यांचा शोध सुरू होता.
दुपारनंतर वाढवले मजूर : दुपारी 4 वाजता आणखी चार ते पाच मजुरांना आणण्यासाठी इगतपुरी पोलिसांचे पथक घोटीकडे रवाना झाले. त्यानंतर रात्रीच्या काळोखात जनरेटर व अन्य प्रकाश व्यवस्था करण्यात आली. साधारण 5.45 वाजेच्या सुमारास पहिल्यांदा काही अस्थि आढळून आल्यानंतर पोलिसांचा हुरूप वाढला. त्यानंतर रात्री 8 वाजता हाती आलेल्या माहितीनुसार तीन मानवी सांगाडे आढळून आल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली. याच वेळी पाच मानवी सांगाडे आढळले, अशीही जोरदार चर्चा होती. मात्र, त्यात तथ्य नसल्याचे पोलिसांनी सांगितले.
अफवांचा महापूर : इगतपुरीत एकीकडे मुसळधार पाऊस सुरू असताना दुसरीकडे अफवांचा महापूर आला होता. पोलिसांनी घटनास्थळापासून माध्यमांना दूर ठेवल्यामुळे पोलिस सूत्रांकडून मिळणार्‍या माहितीच्या आधारावरच सर्व ब्रेकिंग न्यूज दिल्या जात होत्या. काहींनी लैला हिचे मृत्यूपूर्वीचे मोबाइल लोकेशन इगतपुरीत नव्हतेच. त्यामुळे तिचा मृत्यू येथे झाला नसावा असा अंदाज व्यक्त केला तर काही वेळातच परवेझने लैला हिचा मृतदेह कसारा घाटात फेकून दिला, अशी कबुली दिल्याची अफवा जोरात पसरली. सूत्रांच्या माहितीनुसार, अफवांमुळे पोलिस अधिकारीही प्रचंड बेजार झाले होते. या प्रकरणाकडे केंद्रापासून तर राज्यातील अनेक व्ही.आय.पीं.चे लक्ष असल्यामुळे प्रत्येकाला 'अपडेट' देण्यात पोलिस अधिकार्‍यांची कसरत सुरू होती.
नाशिक पोलिसांना ठेवले बाहेर : नाशिकचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक सी. एस. देवराज व इगतपुरीच्या पोलिसांना उंटदरीतील बंगल्याबाहेर ठेवण्यात आले होते. मुंबई क्राइम ब्रॅँचच्या पथकाने गोपनीयतेच्या दृष्टीने नाशिक पोलिसांना प्रवेश दिला नसल्याचे खुद्द देवराज यांनीच 'दिव्य मराठी'शी बोलताना सांगितले. सायंकाळी पहिल्या व्यक्तीच्या अस्थि सापडल्याची बातमी आल्याबाबतही नाशिक पोलिसांना माहिती नव्हती. मजूर, विद्युत व्यवस्था व मुंबई पोलिसांना आवश्यक साधनसामग्री पुरवण्याचे काम नाशिक व इगतपुरी पोलिसांना करावे लागत होते.
महामार्गावरही गर्दी : इलेक्ट्रॉनिक माध्यमांच्या ओबी व्हॅनचा ताफा व गर्दी बघून मुंबई-नाशिक महामार्गावरून जाणार्‍या प्रवाशांच्या वाहनांनाही आपोआपच ब्रेक लागत होते. याठिकाणी नेमके काय घडले हे जाणून घेण्यासाठी पावसात भिजत प्रवासी उंटदरीतील चिखल वाट तुडवताना दिसले. मुंबई -आग्रा महामार्गावरील एका स्थळावरून उंटदरीत दडलेला लैलाचा निळ्या रंगाचा बंगला स्पष्ट दिसत होता. या बंगल्यातील हालचाली क्षणोक्षणी उत्कंठा वाढवत होत्या.
आदिवासींनी घेतली धास्ती : वैतागवाडी अर्थातच आशाकिरणवाडीच्या भेटीसाठी तत्कालीन राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांनी भेट दिल्यानंतर इगतपुरीत प्रचंड बंदोबस्तामुळे वर्दळ झाली होती. आताही पोलिस फौजफाटा, मीडिया व बघ्यांच्या गर्दीमुळे परिसर फुलून गेला होता. कोलाहलापासून दूर असलेल्या कातोरेवाडी व लंगड्याची वाडी, आंबेवाडी परिसरातील भात उपसा करणारे स्थानिक आदिवासी या प्रकारामुळे धास्तावले होते.

तीन सांगाडे महिलांचे असण्याची शक्यता- सापडलेल्या सहा मानवी सांगाड्यांमध्ये तीन सांगाडे हे बंगल्यामागील सेफ्टी टँकमध्ये, तर तीन फार्महाउसच्या परिसरात सापडल्याची माहिती आहे. तीन कवट्यांना मोठे केस असल्याने हे सांगाडे महिलांचे असण्याची शक्यता आहे. परंतु, आता प्रयोगशाळेच्या अहवालानंतरच याबाबत स्पष्ट माहिती समोर येईल. रात्री 11 वाजेनंतर मुंबई गुन्हे शोध शाखेचे हे पथक मुंबईकडे रवाना झाले.
लोखंडी पंजाने उकरली जमीन- साधारण वर्षभरापूर्वी मृतदेह दफन केल्याची माहिती असल्यामुळे मानवी अस्थि नाजूकरीत्या शोधण्यास सुरुवात झाली. प्रथम इगतपुरी पोलिसांनी आठ मजुरांद्वारे जमीन उकरण्यास सुरुवात केली. लोखंडी पंजाद्वारे नाजूकरीत्या माती उकरली जात होती. तसेच चाळण्यांद्वारे माती गाळली जात होती. जेणेकरून कोणाच्याही अस्थि दुभंगणार नाहीत, याची काळजी पोलिस घेत होते. साधारण सहा फूट खोल खड्डय़ात मृतदेह पुरल्याचे परवेझ सांगत असल्यामुळे रात्री उशिरापर्यंत खोदकाम करावे लागेल, अशी शक्यता निर्माण झाली. यासाठी नगरपालिकेच्या कामगारांचीही मदत घेतली गेली.
लैला खान हत्याकांड : इगतपुरीतील दोन ड्रायव्हर ताब्यात
लैला खानचे उंटदरीतील फार्महाऊस आईच्या नावावर
बॉलिवूड अभिनेत्री लैला खानचा कुटुंबियासह खून?