आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Land Acquisition Act Is More Useful For All Said Nitin Gadkari

नवा भूसंपादन कायदा न आल्यास अनेक प्रकल्पांना खीळ बसेल - नितीन गडकरी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - केंद्र सरकारने संसदेत मांडलेला नवा भूसंपादन कायदा शेतकऱ्यांच्या विरोधात नाही, उलट आम्ही कायद्यात नव्याने प्रस्तावित केलेल्या तरतुदी या ग्रामीण विकासाला चालना देणाऱ्या आहेत, असे स्पष्टीकरण केंद्रीय वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत केला.
हा कायदा अस्तित्वात आला नाही, तर सिंचन व इतर प्रकल्पांना खीळ बसेल, त्यामुळेच या प्रस्तावित कायद्याला विरोध करणाऱ्या लोकांची आपण भेट घेऊन त्यांचे मतपरिवर्तन करण्याचा आमचा प्रयत्न राहणार असल्याचे ते म्हणाले.
नव्या भूसंपादन कायद्याला होत असलेला विरोध लक्षात घेत आता भाजपने त्याविषयी सरकारची बाजू मांडण्याची मोहीम उघडली आहे. या मोहिमेचा एक भाग म्हणून आज गडकरी यांनी भाजपच्या प्रदेश कार्यालयात पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. या वेळी त्यांनी काँग्रेसवर हल्लाबोल केला. ‘या कायद्याला विरोध करणाऱ्या काँग्रेसने सत्तेत असताना १३ तरतुदी केल्या होत्या त्याच मुळात खाणमालक, धनदांडग्या उद्योजकांच्या सोयीसाठी होत्या. याउलट प्रस्तावित कायद्यात आम्ही या १३ तरतुदींसोबत नव्याने पाच तरतुदी समाविष्ट केल्या आहेत, ज्या ग्रामीण विकासाला चालना देणाऱ्या आणि शेतकरी हिताच्या आहेत, असा दावाही गडकरींनी केला.
याशिवाय कोणत्याही परिस्थितीत आमचे सरकार शेतकरी हिताच्या आड येणार आणि शेतकऱ्यांना मिळणारा मोबदला हा सध्याच्या भूसंपादन कायद्याने मिळणाऱ्या मोबदल्याच्या चौपट असेल, अशी हमीही त्यांनी दिली.

चौपट मोबदला

प्रस्तावित कायद्याचा वटहुकूम ३१ डिसेंबर २०१४ रोजी काढला असून त्यानंतर ज्या जमिनी आमच्या सरकारने संपादित केल्या आहेत, त्या सर्व प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना आम्ही चौपट दराने मोबदला देत आहोत, असे गडकरी म्हणाले. इतकेच नव्हे, तर आपल्या आणि पीयूष गोयल यांच्या खात्यांनी तर प्रकल्पग्रस्तांना चौपट दराने मोबदला दिल्याची माहितीही त्यांनी दिली.
उद्धव ठाकरेंची भेट

या कायद्याला विरोध करणारे उद्धव ठाकरे, अण्णा हजारे आणि शरद पवार यांची आपण भेट घेऊन गैरसमज दूर करणार असल्याचे गडकरींनी पत्रकार परिषदेत सांगितले. तसेच राजू शेट्टींनाही या कायद्याचे सार समजावून दिल्याचेही गडकरी म्हणाले. दरम्यान, शुक्रवारी रात्री गडकरींनी ‘मातोश्री’वर जाऊन उद्धव ठाकरेंची भेट घेतली व या कायद्याविषयी त्यांच्या शंका दूर करण्याचा प्रयत्न केला.