आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Land Quasition Law Barrier In Project, Prithiviraj Chavan Confess

नव्या भूसंपादन कायद्यामुळे राज्यातील प्रकल्प रखडणार,पृथ्वीराज चव्हाण यांचीही कबूली

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - गेल्या आठवड्यात केंद्राने मंजूर केलेल्या भूसंपादन कायद्याचा फटका राज्यातील प्रकल्पांना बसणार आहे. पायाभूत आणि वीजनिर्मिती प्रकल्पांवर परिणाम होणार असल्याचे काँग्रेसच्या एका वरिष्ठ मंत्र्याने ‘दिव्य मराठी’शी बोलताना सांगितले. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनीही राज्यातील नवीन प्रकल्पांना या विधेयकाचा फटका बसेल, असे सांगितले.


केंद्राच्या भूसंपादन कायद्यानुसार ग्रामीण भागातील जमिनीला बाजारभावापेक्षा चौपट आणि शहरी भागात दुप्पट नुकसान भरपाई द्यावी लागणार आहे. तसेच एखाद्या प्रकल्पासाठी जमीन संपादित करायची असल्यास प्रकल्पग्रस्तांपैकी 80 टक्के लोकांची मंजुरी घेणे आवश्यक केले आहे. या कायद्याबाबत बोलताना एका वरिष्ठ काँग्रेस मंत्र्याने सांगितले की, केंद्राने केलेला कायदा जमीन मालकांना योग्य मोबदला देणारा असला तरी त्याचा परिणाम राज्यातील अनेक प्रकल्पांवर होऊ शकतो. एखादा पायाभूत वा वीजनिर्मिती प्रकल्प आता या विधेयकामुळे निर्माण होणे अवघड होणार आहे. प्रकल्प हे जनतेच्या भल्यासाठी असतात आणि त्यासाठी राज्य सरकार, केंद्र सरकार व खासगी कंपन्यांच्या मदतीने उभारत असते. मात्र, आता ग्रामीण भागात बाजारभावाच्या चौपट आणि शहरी भागात दुप्पट रक्कम द्यावी लागणार असल्याने प्रकल्पांची किंमत प्रचंड प्रमाणात वाढणार आहे. त्यामुळे असे प्रकल्प आता राज्यात उभे राहणे कठीणच होणार आहे.


जे प्रकल्प सुरू आहेत, परंतु भूसंपादन झालेले नाही असे प्रकल्प आता रखडण्याची शक्यता आहे. दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे एखाद्या प्रकल्पासाठी 80 टक्के लोकांची सहमती आवश्यक करण्यात आली आहे. एका सोसायटीत 80 टक्के लोक एकत्र येत नाहीत. एखाद्या प्रकल्पासाठी अशी मंजुरी मिळवणे अवघड असल्याचेही या मंत्र्याने सांगितले. या नव्या धोरणामुळे नवी मुंबई येथील विमानतळाचा प्रकल्प लांबणीवर पडेल, असेही सांगण्यात येत आहे.


गोसीखुर्द 53 कोटींवर
नव्या कायद्यामुळे ठाणे येथील शाई प्रकल्पाची किंमत 197 कोटींवरून 784 कोटींवर, तर पारस थर्मल पॉवर प्रोजेक्टची किंमत 8.57 वरून 31.77 आणि गोसीखुर्द प्रकल्पाची किंमत 15 कोटींवरून 53 कोटींवर जाणार आहे.


नवी मुंबई विमानतळ समुद्रात !
समुद्रात भराव टाकून नवी मुंबई विमानतळ तयार करण्याची योजना आहे. हाँगकाँग, सिंगापूर येथे समुद्रात भराव टाकून विमानतळ तयार करण्यात आले आहेत. त्याच धर्तीवर असा प्रस्ताव राज्य सरकारसमोर ठेवण्यात आला आहे. या कामासाठी जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्टच्या उत्तरेकडील समुद्रात भराव टाकून 2500 हेक्टर जमीन तयार करावी लागणार आहे; परंतु यासाठी पर्यावरण विभागाच्या परवानग्या पुन्हा घ्याव्या लागणार आहेत.