आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Language Bhavan For Marathi Language Development, Conservation

मराठी भाषेच्या विकास, संवर्धनासाठी मुंबईत भाषा भवन उभारणार; राज्याचा निर्णय

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - मराठी भाषेच्या विकास व संवर्धनासाठी 80 कोटी रुपये खर्चून भाषा भवन उभारण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या नियोजित भवनामध्ये मराठी भाषेच्या विकासाशी संबंधित असलेले सर्वच विभाग हलवण्यात येणार आहेत.


धोबी तलाव परिसरातील रंगभवन येथील खुल्या नाट्यगृहाच्या जागेवर भाषा भवन उभारण्यात येईल. या भवनात मराठीच्या संवर्धनासाठी संशोधन, विकास व सांस्कृतिक केंद्र सुरू केले जाईल. तसेच या इमारतीत सांस्कृतिक कार्य संचालनालय, भाषा संचालनालय, राज्य मराठी विकास संस्था, साहित्य व संस्कृती मंडळ, मराठी विश्वकोश निर्मिती मंडळांची कार्यालयेदेखील असतील. मराठीच्या विकासासाठी स्थापन करण्यात आलेले हे विभाग शहरात ठिकठिकाणी विखुरलेले आहेत. त्यांना मध्यवर्ती ठिकाणी आणून एकमेकांत समन्वय प्रस्थापित करण्यासाठी ही कार्यालये भाषा भवनाच्या इमारतीत आणण्याचा सरकारचा मानस आहे. तसेच या इमारतीत मराठी भाषेच्या विकासाशी संबंधित असलेल्या विभागांव्यतिरिक्त अनुवाद केंद्र, बोली अकादमी, मराठी भाषा व संशोधन प्रयोगशाळा, मराठी प्रशिक्षण केंद्र, प्रशिक्षणार्थींसाठी वसतिगृह, पुस्तक विक्री केंद्र, प्रदर्शन केंद्र आणि 198 आसनक्षमतेचे छोटे सभागृह असेल. देशातील विविध राज्यांनी आपापल्या प्रांतांतील भाषांच्या विकासासाठी यापूर्वीच भाषा भवने उभारली आहेत. महाराष्ट्रात असे स्वतंत्र भवन नव्हते. इतर राज्यांप्रमाणेच महाराष्ट्र सरकारनेही स्वतंत्र भाषा भवन उभारावे, ही साहित्यिक आणि विचारवंतांची मागणी या निमित्ताने पूर्ण झाली आहे.


यवतमाळ, कराडला कृषी महाविद्यालय
माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक आणि यशवंतराव चव्हाण यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त यवतमाळ येथे कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालय आणि कराड येथे कृषी महाविद्यालय सुरू करण्याचा निर्णय बुधवारी मंत्रिमंडळाने घेतला.
2013-14 या चालू शैक्षणिक वर्षापासून ही नवी महाविद्यालये स्थापन करण्यात येणार आहेत. तसेच ज्या जिल्ह्यात शासकीय कृषी महाविद्यालय नाही अशा 15 जिल्ह्यांमध्येदेखील दरवर्षी 5 याप्रमाणे नवी शासकीय कृषी महाविद्यालये स्थापन करण्यात येणार आहेत. यवतमाळ येथे डॉ. पंजाबराव कृषी विद्यापीठांतर्गत कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयासाठी शिक्षकांची 16 व शिक्षकेतर 17 अशी एकूण 33 पदे निर्माण करण्यात येतील. तसेच कराड येथे महात्मा फुले कृषी विद्यापीठ (राहुरी) अंतर्गत स्थापन करण्यात येणा-या कृषी महाविद्यालयासाठी शिक्षकांची 28 व शिक्षकेतर 37 अशी एकूण 65 पदे निर्माण करण्यात येतील. माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक आणि यशवंतराव चव्हाण यांनी त्यांच्या कारकीर्दीत राज्यातील कृषी विकासाला चालना दिली होती. यंदा या दोन्ही नेत्यांचे जन्मशताब्दी वर्ष शासन साजरे करत असून यानिमित्त कृषी शिक्षणाचा उत्तम प्रसार होण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.


राज्यात आणखी 3 सीबीआय न्यायालये
केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाच्या खटल्यांचा निपटारा जलद गतीने व्हावा यासाठी राज्य सरकारने आणखी 3 विशेष न्यायालयांची स्थापना करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार महिनाभरात मुंबईत एक, तर नागपूरला दोन न्यायालये स्थापन होतील. सीबीआयच्या प्रलंबित खटल्यांची दखल घेऊन सर्वोच्च न्यायालयाने देशभरात 22 विशेष न्यायालये स्थापण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार केंद्राने महाराष्ट्राला आणखी 3 न्यायालयांची स्थापना करण्यास सांगितले होते.
मुंबईत सध्या तीन, तर पुणे, नागपूर आणि अमरावती येथे प्रत्येकी 1 अशी सहा विशेष न्यायालये कार्यान्वित आहेत.