आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामुंबई- चारच महिन्यांत लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचलेला विनोदवीर कपिल शर्मा याच्या मालिकेचा आगीत जळालेला सेट उभा करण्यासाठी गानकोकिळा लता मंगेशकर, शाहरुख खान, रोहित शेट्टी यांच्यासह अनेक बॉलीवूडकरांनी मदतीचा हात पुढे केला आहे.
गोरेगाव येथील चित्रनगरीत असलेल्या ‘कॉमेडी नाइट्स विथ कपिल’ सेटला शुक्रवारी सकाळी भीषण आग लागली होती. यात संपूर्ण सेट जळून खाक झाला होता. या सेटची किंमत ही अंदाजे 22 कोटी रुपये सांगण्यात येत होती. कपिलच्या शोमध्ये अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली आहे. या वेळी कपिल म्हणाला, मला लता मंगेशकर यांचा फोन आला होता. त्यांनी आर्थिक मदतीशिवाय इतर कोणतीही मदत करण्याची तयारी दर्शवली. त्यांचा फोन मला आला हे माझे भाग्य समजतो, यापेक्षा अधिक त्यांच्याकडून मला काहीही एक अपेक्षा नाही. तसेच शाहरुख खान आणि दिग्दर्शक रोहित शेट्टी यांच्यासह अनेकांकडून मला मदतीसाठी विचारणा करण्यात आली. शाहरुख व रोहित म्हणाले, ‘हम तुम्हारे साथ है, बोलो कितने दिनो मे सेट खडा करना है’ त्यांच्या धीराने मी अतिशय गहिवरून गेलो, असे कपिलने सांगितले. सेटला आग नेमक्या कोणत्या कारणामुळे लागली हे अजूनही स्पष्ट झाले नाही. सेट ज्या दिवशी खाक झाला त्या दिवशी सोनू निगम याच्यासोबतच्या भागाचे चित्रीकरण होणार होते.
बिग बॉसच्या सेटवर चित्रीकरण
कपिलच्या यापूर्वीच्या तीन भागांचे चित्रीकरण हे सेट जळण्यापूर्वीच झाले होते. त्यामुळे हे प्रेक्षकांसाठी भाग प्रसारित करण्यात येतील. सेट उभारण्यासाठी कलर्स वाहिनीने जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत. तसेच पुढील काही भाग हे बिग बॉसच्या सेटवर चित्रित करण्यात येतील. अक्षय कुमार व हृतिक रोशन हे कपिलच्या आगामी भागात दिसतील.
कर चुकवेगिरी केली नाही
सेवा कर विभागाची दिशाभूल केली नाही. तसेच आपण कर चुकवला नसल्याचे सांगत कपिल शर्मा याने अशा बातम्या कोठून पसरवण्यात आल्या, याबाबत आश्चर्य व्यक्त केले. ‘काही दिवसांपूर्वी सेवा कर विभागाने चौकशी करून माझ्याकडे 60 लाख रुपयांचा कर बाकी असल्याचे सांगितले. मात्र, मी यापूर्वीच 35 लाख रुपये करापोटी भरले आहेत. तसेच शिल्लक असलेले 30 लाख रुपये मला पुढील महिन्यात भरणा करायचे आहेत. मात्र, कर चुकवेगिरीच्या बातम्यांमुळे आपल्याला मनस्ताप झाला,’ अशी भावना कपिलने माध्यमांकडे व्यक्त केली.
तीन दिवसांपूर्वी त्यांच्या ‘कॉमेडी नाइट विथ कपिल’ शोचा गोरेगाव चित्रनगरीतील सेट जळून खाक झाला होता.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.