मुंबई- राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमिवर संघर्ष या त्यांच्या संस्थेची दहिहंडी रद्द केली आहे. पण भाजपने त्यांच्या या निर्णयावर चांगलेच तोंडसुख घेतले आहे. आव्हाड नौटंकीबाज आहेत. कायद्याच्या चौकटीत राहून दहिहंडी उत्सव साजरा करायचा नसल्याने त्यांनी दुष्काळी परिस्थितीचा आधार घेतला असे सडकून टीका भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी केली आहे.
आशिष शेलार म्हणाले, की आव्हाडांना दुष्काळाची एवढीच काळजी होती तर गेल्या वर्षीही प्रचंड दुष्काळ पडला होता. तेव्हाच आव्हाडांनी ही दहिहंडी रद्द करायला हवी होती. आतापर्यंत आव्हाडांनी मुख्यमंत्री दुष्काळी मदत निधीला एक रुपयाही दिलेला नाही. एवढेच नव्हे तर दुष्काळग्रस्तांसाठी जराही मदत केलेली नाही. दहिहंडी रद्द करणे हे केवळ एक नाटक आहे.
मला अक्कल शिकवू नका -आव्हाड
दही आणि हंडी यांचा काहीही संबंध नसलेल्या शेलारांनी मला अक्कल शिकवू नये. त्यांनी आयुष्यात कधी दहिहंडी साजरी केली आहे का? असे प्रश्न आव्हाड यांनी विचारला आहे.