जिया खानचा गेल्या वर्षी 3 जून रोजी तिच्या राहात्या घरात पंख्याला लटकलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला होता. पाच महिन्यांपूर्वी पोलिसांनी ही आत्महत्या असल्याचे मान्य करुन आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याचा आरोप ठेवून आदित्य पांचोलीचा मुलगा सुरजला अटक केली होती.
कोर्टाने सीबीआयला फटकारले
दोन दिवसांपूर्वी राबिया खान यांच्या याचिकेवर सुनावणी करताना हायकोर्टाने मुंबई पोलिसांकडून हे प्रकरण सीबीआयकडे सोपवले होते. कोर्टाने सीबीआयला आदेश दिला, हे प्रकरण हत्येचे आहे, की आत्महत्येचे याचा तपास करा.
हायकोर्टाने सीबीआयला तपासाचे आदेश दिल्यानंतर त्यांनी तपासाला पुरेशे मनुष्यबळ नसल्याचे कारण पुढे केले. तेव्हा कोर्टाने केंद्रीय गुन्हे अन्वेषन विभागाला फटकारले. कोर्ट म्हणाले, 'जिया अमेरिकन नागरिक होती. त्यांना त्यांच्या देशातील नागरिकांची किती चिंता आहे, ते पाहा. ते लोक प्रत्येक सुनावणीला हजर राहातात आणि आमच्या तपास यंत्रणा जबाबदारीपासून दूर पळत आहे.'
जियाच्या आईने एफबीआयकडे केली मदतीची याचना
जियाची आई राबिया यांनी अमेरिकेची तपास यंत्रणा एफबीआयकडे मदतीची याचना केली आहे. त्यांच्या आग्रहानंतर एफबीआयचे या प्रकरणाकडे बारकाईने लक्ष आहे.