आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

भाजपला प्रत्युत्तर : अर्थसंकल्पापेक्षाही मोठा घोटाळा होईलच कसा?

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - ‘भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी जबाबदारीने आरोप करावेत. निवडणुका आल्या म्हणून वस्तुस्थिती सोडून बोलू नये,’ असा सज्जड इशारा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी पुण्यात पत्रकारांशी बोलताना दिला.

अमित शहा यांनी गुरुवारी मुंबईतील मेळाव्यात काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसवर जोरदार टीका केली होती. आघाडी सरकारने गेल्या पंधरा वर्षात राज्यात तब्बल ११ लाख ८८ हजार कोटींचा भ्रष्टाचार केल्याचा शहा यांचा आरोप होता. या वक्तव्याचा पवार यांनी खरपूस समाचार घेतला.

"काँग्रेस आघाडी सरकार १९९९ मध्ये महाराष्ट्रात सत्तेत आले. तेव्हापासून २०१४ पर्यंतच्या सर्व अर्थसंकल्पांची बेरीज केली तरी तो आकडा पाच लाख कोटींच्या आसपास येतो. शहा यांनी अकरा लाख कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप केल्यानंतर मी अर्थखात्याच्या अधिकाऱ्यांना माहिती घ्यायला लावली. त्यानंतर शहा यांनी सांगितलेल्या आकड्यातील फोलपणा पुढे आला,’ असे स्पष्टीकरण पवारांनी दिले.

देवेंद्र फडणवीस यांचे आरोपसुद्धा बिनबुडाचे असल्याचे पवार म्हणाले. मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील टोलवसुलीचे २०१९ चे टेंडर आताच काढल्याची माहिती पूर्णपणे चुकीची आहे. "इन्फ्रा' विभागाच्या परवानगीशिवाय रस्त्यांची कामे होत नाहीत. मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील टोलचे कोणतेही टेंडर काढण्यात आले नसल्याची माझी माहिती आहे. सिंचनाच्या बाबतीत मराठवाड्यात "बीओटी' तत्त्वावरील तीन प्रकल्पांची कामे देण्यात आली आहेत. मात्र ही कामे पूर्वनियोजित होती. निवडणूक आली म्हणून नवा निर्णय सिंचन विभागाने घेतला नसल्याचे पवार यांनी सांगितले.
निर्णय लंडनहून परतल्यावर
"काँग्रेस-राष्ट्रवादीतील जागावाटपाचा निर्णय दोन्ही पक्षांचे वरिष्ठ नेते दिल्लीत घेतील. शरद पवार शनिवारी लंडनहून भारतात परतणार आहेत. त्यानंतरच तोडगा निघेल. विधानसभेच्या जागा वाढवून घेण्याची आमची मागणी कायम आहे.
-अजित पवार
कोळसा टंचाई तर देशव्यापी
सर्वोच्च न्यायालयाने कोळसा खाणवाटपाचे करार रद्द केल्यामुळे कोळसा उपलब्धतेवर परिणाम झाला आहे. यातूनच राज्यातील ऊर्जासंकट गडद झाले आहे. कोळशाच्या अनुपलब्धतेचा प्रश्न फक्त महाराष्ट्रापुरता मर्यादित नसून संपूर्ण देशापुढचा हा प्रश्न आहे. यातून मार्ग काढण्यासाठी देशपातळीवर बैठक घेण्याची विनंती पंतप्रधान नरेंद्र मोदींना केली आहे, असेही ऊर्जामंत्री अजित पवारांनी सांगितले.
पाचपुतेंची पोकळ आरोपबाजी
राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री बबनराव पाचपुते, सूर्यकांता पाटील नुकतेच भाजपात दाखल झाले आहेत. तत्पूर्वी त्यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर जाहीर टीका केली होती. याबद्दल विचारले असता पवार म्हणाले, ‘पक्ष सोडताना होणारी ही बडबड निरर्थक असते. दुसऱ्या पक्षात जाताना लोकांना काही तरी कारणे सांगावी लागतात म्हणून अशी पोकळ आरोपबाजी होते. शरद पवार प्रत्यक्षात सर्वांनाच वेळ देतात.'