आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Latest News In Marathi NCP Leader Sharad Pawar On Congress

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

काँग्रेसच्या चुकांमुळेच पराभव, शरद पवारांनी मित्रपक्षावर फोडले खापर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - लोकसभा निवडणुकीत देशभर काँग्रेसच्या विरोधात वातावरण होते. सरकारमध्ये बसलेल्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप होत असताना ज्यांची जबाबदारी होती, त्यांनी योग्य वेळी योग्य प्रकारे उत्तरे दिली नाहीत, असे खापर शरद पवारांनी काँग्रेसवर फोडले. बुधवारी झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकारिणी सभेत पवारांच्या सुरात सूर मिसळत इतर नेत्यांनीही काँग्रेसवर तोंडसुख घेतले.
दिल्लीत गेल्या आठवड्यात मुख्यमंत्री हटाव मोहीम चालवताना शरद पवारांनी पृथ्वीराजांच्या धोरण लकव्यामुळे विधानसभेत आघाडीला मोठा फटका बसू शकतो, असे सांगितले होते. मात्र पवारांच्या या खेळीला तसेच उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी ‘मी जातो, पण त्याआधी भ्रष्टाचाराचे आरोप असलेले अजित पवार तसेच बिनकामाचे गृहमंत्री आर.आर.पाटील बदलले गेले पाहिजेत’, असा युक्तिवाद दिल्लीत पक्षश्रेष्ठींसमोर केला होता. यानंतर ‘मुख्यमंत्री हटाव’ मोहीमच थंडावली. या परिस्थितीत डावपेच अयशस्वी ठरल्याने संतापलेल्या पवारांनी राष्ट्रवादीच्या सभेत काँग्रेसच्या चुकांवर बोट ठेवले.

मोदींच्या महागाईविरुद्ध रान पेटवा : रेल्वेचे भाडे वाढले, गॅसचे दरही वाढतील. यापुढे पेट्रोल डिझेल, खतांचे भाव वाढणार आहेत. सबसिडी हळूहळू बंद होणार असल्याने त्याचे दूरगामी परिणाम होतील. देशाला महागाईचा सामना करावा लागणार असल्याची भीती पवारांनी व्यक्त केली. विधानसभेच्या तोंडावर मोदींच्या महागाईविरोधात रान पेटवा, असे आवाहनही त्यांनी केले.
राहायचे तर राहा : भुजबळ
राष्ट्रवादीने मुख्यमंत्री बदलाची मागणी कधीही केलेली नाही. आघाडीचे नेतृत्व पवारांनी करावे, अशी चर्चा आहे. मात्र मुख्यमंत्री म्हणतात ‘मला कुणी सांगितले नाही.’ तुम्हाला कोणी सांगितले नाही, याचे आम्हाला काय करायचे आहे. राहायचे असेल तर राहा, नाहीतर जा, असा टोला छगन भुजबळांनी मुख्यमंत्र्यांना लगावला.

सर्वाधिक जागांचे लक्ष्य ठेवा : अजित पवार
आॅक्टोबरमध्ये निकाल लागतील तेव्हा सर्वाधिक जागा राष्ट्रवादीच्या असतील, हे लक्ष्य आपण सर्वांनी समोर ठेवायला हवे. इतर पक्ष काय करतात, यापेक्षा आपण काय करतो, हे महत्वाचे आहे. आता मरगळ झटकण्याची वेळ आली आहे, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.

निर्णय झटपट घ्या : प्रफुल पटेल
लोकसभा निवडणुकीत काँग्रेसविरोधात लाट होती. मात्र विधानसभेवेळी ती दिसणार नाही. मागच्या वेळी शेतकर्‍यांच्या कर्जमाफीच्या निर्णयामुळे आपण सत्तेत आलो होतो. आता महत्वाचे, पण प्रलंबित निर्णय लवकर घ्यायला हवेत, असे माजी केंद्रीयमंत्री प्रफुल पटेल यांनी सांगितले.

तटकरे प्रदेशाध्यक्ष, जाधव जलसंपदामंत्री !
राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षपदी बुधवारी सुनील तटकरे यांची निवड करण्यात आली. मावळते प्रदेशाध्यक्ष भास्कर जाधव यांना तटकरे यांचे जलसंपदामंत्री पद देण्याचा निर्णयही कार्यकारिणीच्या बैठकीत घेण्यात आला. वर्षभरापूर्वी राष्ट्रवादीने जितेंद्र आव्हाडांसाठी कार्याध्यक्ष हे खास पद निर्माण केले होते. मात्र काही दिवसांपूर्वीच आव्हाड यांची मंत्रिमंडळात वर्णी लागल्यामुळे त्यांचे हे पद आता काढून घेतले आहे.