आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Latest News In Marathi Sharad Pawar Controversial Remark On Voting

बोटावरची शाई पुसा,दोनदा मतदान करा; शरद पवारांचा अजब सल्ला

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - गावाकडे मतदान करा, बोटावरची शाई पुसा आणि मुंबईत येऊन पुन्हा मतदान करा, असा अजब सल्ला केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी रविवारी माथाडी कामगारांच्या मेळाव्यात दिला आणि चांगलेच अडचणीत सापडले. त्यानंतर पवारांनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. सहज टिंगलीच्या सुरात गमतीने आपण तसे बोललो, परंतु माध्यमांनी त्याचा विपर्यास केला, अशी मखलाशी त्यांनी केली. परंतु खुद्द पवारांनीच दोनदा मतदान करण्याचे वादग्रस्त आवाहन केल्याने विरोधकांना आयतेच कोलीत मिळाले. भाजप आणि आपने निवडणूक आयोगाकडे लेखी तक्रार केली.

माथाडी कामगारांचे नेते अण्णासाहेब पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त नवी मुंबईत वाशी येथे माथाडी कामगारांचा मेळावा झाला. या वेळी पवारांनी माथाडी कामगारांना दोनदा मतदानाचा सल्ला दिला. भाषणादरम्यान पवार हे बोलून गेले आणि अनेकांच्या भुवया उंचावल्या. दिवसभर उलटसुलट प्रतिक्रिया उमटत राहिल्या. त्यापाठोपाठ सायंकाळी पक्षाच्या मुख्यालयात पवारांनी पत्रकार परिषद घेतली आणि आपल्या वक्तव्यावर सारवासारव केली.

नेमके वक्तव्य काय?
गेल्या वेळी गावाकडे व मुंबईत एकाच दिवशी मतदान होते. त्यामुळे काही लोक गावी गेले. यंदा सातार्‍यात 17 एप्रिलला घड्याळावर शिक्का हाणायचा, मग 24ला मुंबईत हाणायचा.तिथली शाई पुसून टाकायची. नाहीतर घोटाळा होईल.

पोलिसांतही तक्रार करणार : भाजप
भाजपचे ईशान्य मुंबईतील उमेदवार किरीट सोमय्या यांनी पवारांच्या वक्तव्यावरून निवडणूक आयोगाकडे लेखी तक्रार केली आहे. बोगस मतदानासाठी उद्युक्त करणार्‍या पवारांवर कारवाई करा, अशी मागणी त्यांनी केली आहे. पोलिस महासंचालकांकडेही सोमवारी तक्रार करणार असल्याचे सोमय्या म्हणाले.

मतदारांनीच सजग राहावे : आप
निवडणूक आयोगाकडे लेखी तक्रार करून आम आदमी पार्टीनेही पवारांवर कठोर कारवाईची मागणी केली. प. महाराष्ट्रात याआधीच्या निवडणुकांत बोगस मतदान झाल्याकडेही लक्ष वेधले. अशा प्रवृत्तींना आळा घालण्यासाठी मतदानाच्या वेळी लोकांनी जागरूक राहावे, असे आवाहन पार्टीने केले आहे.

सारवासारव अशी
दोनदा मतदानाबाबत बोललो, पण कार्यकर्त्यांची गंमत करण्याचा हेतू होता. मी मेळाव्यात बोललो. सभा नव्हती. पण वादंग पाहता मीच नव्हे, तर पक्षाच्या नेत्यांनीही बोलताना सजग राहिले पाहिजे.

परराज्याची सरकारी यंत्रणा तैनात करा
पवारांचे हे वक्तव्य गंभीर आहे. त्यावर निवडणूक आयोगाकडे तक्रार केली जाईल. मतदानाच्या दिवशी राज्यात परराज्यातील सरकारी यंत्रणा तैनात करण्यात यावी. तरच येथील निवडणुका नि:पक्षपातीपणे पार पडतील. ही मागणीही निवडणूक आयोगाकडे केली जाईल.’ - गोपीनाथ मुंडे, भाजप नेते (बीडमध्ये पत्रपरिषदेत)

आठ कोटींच्या वक्तव्याने गोपीनाथ मुंडेही गोत्यात
मध्यंतरी भाजप नेते गोपीनाथ मुंडेदेखील अशाच वक्तव्यामुळे अडचणीत आले होते. निवडणुका लढवणे किती खर्चिक झाले आहे हे पटवून सांगताना बोलण्याच्या ओघात ते म्हणाले होते की, गेल्या वेळी लोकसभा निवडणुकीसाठी 8 कोटी रुपये खर्च आला होता. यावरून खर्चर्मयादेचा मुद्दा उपस्थित करत विविध पक्षांनी निवडणूक आयोगाकडे तक्रार केली. त्यावर आयोगाने चौकशी सुरू केली. या प्रकरणाचा निकाल अजून लागलेला नाही.