मुंबई - शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष यांच्यातील जागा वाटपाचा तिढा सुटण्याऐवजी जटील होत चालला आहे. शिवसेना नेते मुख्यमंत्रीपदावर दावा सांगत आहेत, तर सेनेच्या या दाव्यामुळे भाजप गोटात अस्वस्थतेचे वातावरण आहे. त्यातच संजय राऊत यांच्या वक्तव्याने भाजप कार्यकर्ते दुखावले गेले आहेत.
शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी, मुख्यमंत्री शिवसेनेचाच आणि उद्धव ठाकरे होतील असा दावा करत,
नरेंद्र मोदी भारताच्या राजकारणात 'अस्पृष्य' होते तेव्हा, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी देशाचे पंतप्रधान मोदीच होतील असे वक्तव्य केले आहे. त्यांच्या या वक्तव्याने भाजप कार्यकर्ते नाराज झाले असल्याचे भाजप प्रवक्ते माधव भंडारी यांनी म्हटले आहे. शिवसेना - भारतीय जनता पक्ष युतीचे जागा वाटप अजून झालेले नाही आणि राज्याचा मुख्यमंत्री कोणाचा होईल यावरुनच दोन्ही पक्षांमध्ये वाक्-यु्ध्द सुरु आहे.
25 वर्षे जुनेच सूत्र - खडसेंचे प्रत्युत्तर
राज्यातील भाजपचे नेते एकनाथ खडसे यांनी मुख्यमंत्री कोणाचा होईल, हे 25 वर्षे जुन्या सूत्रानुसारच ठरेल असे म्हटले आहे. त्यामुळे 'ज्यांचे जास्त आमदार त्यांचाच मुख्यमंत्री' या जून्या फॉर्मूल्याची आठवण खडसेंनी करुन दिली आहे. शिवसेनेला हे प्रत्युत्तर असल्याचे मानले जात आहे. जागावाटपचा प्रश्न चर्चेतून सुटेल, असा विश्वासही खडसेंनी व्यक्त केला आहे. युतीची जागा वाटपाची चर्चा मुख्यमंत्री पदावर अडली की काय असा प्रश्न निर्माण झाला आहे. यामुळे दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे.
भाजप नेते राजीव प्रताप रुडी उद्या (सोमवार) उद्धव ठाकरेंची भेट घेणार असल्याचे वृत्त आहे. ठाकरे आणि रुडी यांच्या बैठकीतच जागावाटपाचा निर्णय होण्याची शक्यता आहे.