मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस यांच्या आघाडीवरून होणाऱ्या उलटसुलट चर्चांना खुद्द राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी विराम दिला आहे. लवकरच काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांचा संयुक्त प्रचार सुरू होईल, असा विश्वास शरद पवार यांनी शनिवारी व्यक्त केला.
राष्ट्रवादीच्या विधानसभा निवडणूक प्रचार मोहिमेचा शुभारंभ मुंबईतील यशवंतराव चव्हाण ऑिडटोरियममध्ये झाला. यात बोलताना पवार आणि पटेल यांनी आघाडीबाबत स्पष्ट भाष्य केले. पवार म्हणाले, आघाडीबद्दल चर्चा सुरू आहे. उद्या कदाचित
आपण प्रचाराला एकत्रच सुरुवात करू. प्रचाराची एकत्रित मोहीम राबवू.
प्रफुल्ल पटेल यांनी १९९९च्या स्थितीचा हवाला देत राष्ट्रवादी भाजप-सेनेसोबत जाणार नसल्याचे स्पष्ट केले. तेव्हा केंद्रात वाजपेयींचे सरकार होते. राज्यात कुणालाही बहुमत नव्हते. तेव्हा युतीने सोबत येण्याचा प्रस्ताव देत पवारसाहेबांना केंद्रात मंत्रिपद देऊ केले होते. मात्र आम्ही धर्मांध शक्तीसोबत जाणे नाकारल्याचे पटेल म्हणाले.
जागा वाढवून द्या
काँग्रेस हा मित्रपक्ष असला तरी कधी कधी मोठ्या भावासारखे वागतो. २००९ लोकसभेत काँग्रेसला जागा जादा मिळाल्या होत्या. पण त्यांनी पुढच्या विधानसभेत आमच्याकडून जादा जागा मागितल्या. लोकसभेत आता आमच्या जास्त जागा आहेत. आम्हाला जागा वाढवून द्या, असे म्हणत प्रफुल्ल पटेल यांनी काँग्रेससोबत आघाडीलाच प्राधान्य असल्याचे संकेत दिले.