मुंबई - माजी मंत्री व राष्ट्रवादीचे आमदार लक्ष्मण ढोबळे यांच्यावर लावण्यात आलेल्या बलात्काराच्या आरोपाची चौकशी सुरू असल्याचे राज्य सरकारने शुक्रवारी उच्च न्यायालयात सांगितले. न्यायमूर्ती व्ही. एस. कानडे आणि पी. डी. कोडे यांच्या खंडपीठात याप्रकरणी सुनावणी झाली. सुनावणीदरम्यान सरकारी वकील एस. एस. शिंदे यांनी हे प्रकरण मुंबई गुन्हे शाखा पोलिसांकडे हस्तांतरित करण्यात आल्याचे सांगितले.
पीडित महिलेने
आपल्याला व कुटुंबीयांना ढोबळे यांच्यापासून धोका असल्याचे पत्र न्यायालयाला लिहिले आहे. गुरुवारी झालेल्या सुनावणीत पीडित महिलेने पोलिस संरक्षण देण्याची मागणी न्यायालयात केली होती. त्यानुसार महिलेला संरक्षण देण्यात आल्याचे शिंदे यांनी न्यायालयात सांगितले.
काय आहे प्रकरण? ढोबळे यांच्या बोरिवली संस्थेत पीडित महिला कार्यरत होती. ७० लाखांचा अपहार केल्यानंतर तिला निलंबित केले होते. काही दिवसांपूर्वी महिलेला पोलिसांनी अटक केली होती. त्यानंतर जामिनावर सुटल्यानंतर तिने ढोबळे यांनी आपल्यावर दोन वर्षे अत्याचार केल्याची तक्रार पोलिसांत दिली.
पोलिसांवर विश्वास नाही : या प्रकरणाचा तपास हा बोरिवली पोलिसांकडे आहे. मात्र, येथील पोलिस हे आपला छळ करत असून आपला त्यांच्यावर विश्वास नाही. त्यामुळे मुंबई गुन्हे पोलिसांकडे हे प्रकरण हस्तांतरित करण्याची मागणी पीडित महिलने आपल्या अर्जात केली होती.
त्यानुसार न्यायालयाने ही मागणी मान्य केली.