आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • LBT Delagation Meet Cm Devendra Fadanvis Regarding Cancel To Lbt Tax From Maharashtra

LBT रद्द करण्यासाठी सरकारच्या हालचाली, सर्व पालिकांची फडणवीसांनी बोलावली बैठक

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- स्थानिक संस्था कर (एलबीटी) आणि जकात रद्द करण्यासाठी राज्य शासनाची सकारात्मक भूमिका आहे. यासंदर्भात चर्चा करण्यासाठी 20 नोव्हेंबरला राज्यातील महापालिका आयुक्त व संबंधित अधिकाऱ्यांची बैठक बोलविण्यात आली आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे दिली.
फेडरेशन ऑफ असोसिएशन ऑफ महाराष्ट्र (फॅम) च्या शिष्टमंडळाने मंत्रालयात मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन जकात आणि स्थानिक संस्था कर (एलबीटी) रद्द करण्याबाबतचे निवेदन सादर केले. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी शिष्टमंडळाला ही माहिती दिली.
मुख्यमंत्री म्हणाले की, जकात कर आणि एलबीटी हटविण्याची राज्यातील व्यापाऱ्यांची मागणी आहे. त्यावर राज्य शासनाची भूमिका सकारात्मक आहे. राज्याचे आर्थिक नुकसान न होता याबाबत योग्य पर्यायांचा विचार करून तसेच सर्व तांत्रिक बाबी तपासून हे दोन्ही कर लवकरात लवकर रद्द करण्याचा निर्णय घेतला जाईल. काही महापालिका क्षेत्रात करवसुली करतांना सक्ती केली जात आहेत, व्यापाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात येत आहेत. त्याबाबतही योग्य तो निर्णय घेतला जाईल, असे आश्वासनही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.
यावेळी फॅमचे अध्यक्ष मोहन गुरनानी यांनी एलबीटीअंतर्गत ठिकठिकाणी महापालिकांच्या माध्यमातून होत असलेल्या सक्तीच्या कारवाईबाबत माहिती दिली. श्री. गुरनानी यांच्या हस्ते मुख्यमंत्र्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी दीपेन अग्रवाल, समीर शहा, विराज कोकणे, पोपटलाल ओसवाल, प्रफुल्ल संचेती आदींसह 26 महापालिका क्षेत्रातील व्यापारी संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.