आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नेते मतांचे भिकारी : छगन भुजबळ

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- आदिवासी, अल्पसंख्याक किंवा दलितांनी तोंड उघडले की सरकार कान टवकारून ऐकते. परंतु सुमारे दहा कोटी लोकसंख्या असलेल्या भटक्या समाजाला विचारले जात नाही, हे कटू वास्तव असल्याची कबुली सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांनी शनिवारी दिली.
या लोकांकडे रेशन कार्ड, राहण्याचे ठिकाण, पत्ता नसल्यामुळे शिक्षण, रोजगार मिळत नाही, एवढेच काय तर मतदानाचा हक्कही बजावता येत नाही. नेते मतांचे भिकारी आहेत पण तुम्ही मतदारच नाहीत तर काय उपयोग? अशा शब्दांत भुजबळ यांनी नेत्यांवरच टीकास्त्र सोडले. तसेच या समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी लवकरच मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेण्यात येईल, असे आश्वासनही त्यांनी दिले.
भटक्या विमुक्त समाजाची पहिली गोलमेज परिषद एसएनडीटी महिला विद्यापीठात पार पडली. ‘भिक्षेकरी व कलाकार भटक्या जमाती समस्या : आव्हाने व उपाय’ या विषयावर व्याख्यान आणि चर्चासत्र झाले. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून छगन भुजबळ, आमदार भाई जगताप, आयोजक बाळकृष्ण रेणके, अ‍ॅड. पल्लवी रेणके, पत्रकार पद्मभूषण देशपांडे आणि प्रा. हरी नरके उपस्थित होते. भुजबळ म्हणाले की, ‘दहा कोटी लोकसंख्या असलेल्या या समाजाची अवस्था अन्य कोणत्याही समाजापेक्षा अतिशय दयनीय आहे. भिक्षा मागण्यासाठी दारोदार फिरत असल्यामुळे पत्ता नाही, कमाईचे साधन नाही तसेच त्यांच्यापर्यंत सरकारच्या योजनाही पोहोचत नाहीत. हजारो वर्षांपासून करमणूक करणा-या या समाजाची कला चोरून चित्रपटसृष्टीतील लोक लाखो रुपये कमावत आहेत. त्यामुळे भटके विमुक्तांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेऊन मार्ग काढणार असल्याचे भुजबळ यांनी सांगितले.
पैसा जातो कुठे : रेणके- भिक्षेकरी योजनांचा पैसा या लोकांसाठी खर्च होत नसल्याने हा पैसा जातो कुठे ? कागदपत्रे नसल्यामुळे 98 टक्के लोकांना बँक कर्ज देत नसल्याने रस्त्यावर नाच-गाणे करणा-या मुलांवरच या समाजाचा उदरनिर्वाह चालत असल्याची खंत या समाजाचे नेते बाळकृष्ण रेणके यांनी व्यक्त केली.