आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

विधान परिषद निवडणूक: राणे दाेनशे मतांनी विजयी हाेतील; भाजपच्या वरिष्ठ नेत्याचा दावा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- ‘काँग्रेसला सोडचिट्ठी देत विधान परिषद सदस्यत्वाचा राजीनामा देणारे नारायण राणे यांच्या रिक्त जागी पाेटनिवडणूक डिसेंबरमध्ये हाेत अाहे. या निवडणुकीत उतरल्यास राणेंना भाजपचा पाठिंबा मिळणार अाहे. या निवडणुकीत २०० मते घेऊन राणे विजयी हाेतील,’ असा दावा भाजपच्या एका वरिष्ठ नेत्याने ‘दिव्य मराठी’शी बाेलताना दिला अाहे. दुसरीकडे, काँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेना संयुक्त उमेदवार देण्याच्या तयारीत असल्यामुळे ही निवडणूक लढवावी की नाही या संभ्रमात स्वत: राणे अाहेत.


महाराष्ट्र स्वाभिमानी पक्षाची स्थापना करून राणेंनी एनडीएत सहभागी हाेण्याचा निर्णय जाहीर केला हाेता. लगेचच भाजपने त्यांना मंत्रिपद देण्याची घाेषणा केली. त्यानुसार विधान परिषदेच्या रिक्त जागेवर भाजपच्या पाठिंब्यावर त्यांना उमेदवारी दिली जाणार अाहे. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी रात्री भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्याशी चर्चा केल्याची माहिती भाजपमधील सूत्रांनी दिली. मंत्रिपद देण्यापूर्वी राणेंना अामदार करण्याचे भाजपने ठरवले अाहे.


भाजपच्या नेत्याने सांगितले, राणे पोटनिवडणुकीस उभे राहिल्यास त्यांचा विजय निश्चित आहे. आमची सर्व मते त्यांना मिळणार असून शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसमधील अनेक आमदार त्यांच्याशी संपर्कात आहेत. राणे यांच्याशी त्यांचे चांगले संबंध आहेत. त्यामुळे ते विजयी होणार यात शंका नाही.


दाेन्ही काँग्रेस नेत्यांची खलबते
‘विधान परिषदेच्या रिक्त जागेसाठी होणाऱ्या निवडणुकीसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्रितपणे उमेदवार देणार आहोत. भाजपने कोणाला उमेदवारी द्यावी, हा त्या पक्षाचा प्रश्न आहे. त्यांनी राणेंना उमेदवारी दिली किंवा नाही तरीही अाम्ही सहमतीने उमेदवार देऊन विजय मिळवू,’ असा विश्वास काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी मंगळवारी व्यक्त केला. या निवडणुकीत राणे भाजपप्रणित एनडीएचे उमेदवार असतील, मात्र शिवसेनेचा त्यांच्या नावाला पाठिंबा अाहे. ही संधी साधून दाेन्ही काँग्रेस शिवसेनेचा पाठिंबा मिळविण्याच्या प्रयत्नात अाहे.  या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस  व राष्ट्रवादीच्या नेत्यांची मंगळवारी राधाकृष्ण विखे पाटील यांच्या बंगल्यावर बैठक झाली. बैठकीनंतर चव्हाण म्हणाले, ‘उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस २९ नाेव्हेंबर अाहे. तोपर्यंत आमचा सहमतीचा उमेदवार जाहीर करू.’ दरम्यान, राणेंनी ही निवडणूक न लढविल्यास भाजपकडून प्रवक्ते माधव भंडारी, रत्नागिरीचे जिल्हाध्यक्ष बाळ माने आणि देवगडचे माजी आमदार प्रमोद जठार यांची नावे पुढे येत आहेत. त्यावरही बैठकीत सविस्तर चर्चा झाली. 


अधिवेशनावर माेर्चा
राज्यातील भाजप सरकारविराेधात काँग्रेस आणि राष्ट्रवादीतर्फे १२ डिसेंबरला नागपूरला हिवाळी विधिमंडळाच्या अधिवेशनावर संयुक्त मोर्चा काढणार असल्याची माहितीही अशाेक चव्हाण यांनी दिली. 

बातम्या आणखी आहेत...