आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विधिमंडळ अधिवेशनात इंदिरा गांधी, शरद पवारांच्या कारकीर्दीचा होणार गौरव

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सहा मार्चपासून सुरू होणार असून ते सात एप्रिलपर्यंत चालेल. शनिवार, १८ मार्च रोजी दुपारी दोन वाजता राज्याचा अर्थसंकल्प मांडण्यात येणार आहे. संसदीय कामकाज सल्लागार समितीच्या सोमवारी झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात अाला. माहिती संसदीय कामकाज मंत्री गिरीश बापट यांनी दिली. या अधिवेशनात माजी पंतप्रधान इंदिरा गांधी, माजी केंद्रीय मंत्री शरद पवार व ज्येष्ठ अामदार गणपतराव देशमुख यांच्या प्रदीर्घ संसदीय कारकीर्दीबद्दल दाेन्ही सभागृहात चर्चा हाेणार अाहे.  
 
या अधिवेशनात प्रलंबित दोन विधेयके, सहा अध्यादेश मांडण्यात येतील. मुंबई महानगरपालिका (सुधारणा) अध्यादेश २०१७, (बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारकास पालिकेची जागा देता यावी यासाठी तरतूद), महाराष्ट्र जमीन महसूल संहिता (सुधारणा) अध्यादेश, २०१७ (अंतिम विकास आराखड्यामध्ये व प्रारूप विकास आराखड्यामध्ये दर्शवलेल्या जमिनीच्या वापरानुसार जमीन महसूल संहिता यामधील जमीन वापराचे रूपांतरण करण्याबाबतच्या तरतुदीत सुधारणा, मुंबई महानगरपालिका आणि महाराष्ट्र महानगरपालिका (सुधारणा) अध्यादेश, २०१७ (अनधिकृत इमारतींवर बसवण्यात येणारी शास्तीच्या रकमेत सुधारणा करण्यासाठी अशी शास्ती मालमत्ता कराच्या दुपटीपेक्षा महानगरपालिका ठरवील अशी असेल अशी तरतूद करणे), महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोग (सुधारणा) अध्यादेश, २०१७ (राज्य मागासवर्ग आयोगाची सदस्य संख्या सहावरून आठ करणे), महाराष्ट्र ग्रामपंचायत आणि महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती (सुधारणा) अध्यादेश, २०१७ (ग्रामपंचायत व जिल्हा परिषद निवडणूक लढवणाऱ्यांना शौचालय वापराचे स्वयंप्रमाणपत्र देण्याबाबत तरतुदी) आणि मुंबई मनपा, महाराष्ट्र महानगरपालिका आणि महाराष्ट्र नगर परिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी (सुधारणा) अध्यादेश, २०१७ (मनपा, नगर परिषदा निवडणूक उमेदवारांना शौचालय वापराचे प्रमाणपत्र देण्याबाबत तरतुदी) ही विधेयके मांडण्यात येणार आहेत. 
तसेच आठ आणि नऊ मार्च रोजी राज्यपालांच्या अभिभाषणावर चर्चा घेण्यात येणार असून सहा एप्रिल रोजी विरोधी पक्षाचा अंतिम आठवडा प्रस्ताव मांडण्यात येणार आहे, असे बापट यांनी सांगितले.   
 
विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांच्या संसदीय कामकाज सल्लागार समितीची बैठक सोमवारी विधानभवनात झाली. या वेळी विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर, उपसभापती माणिकराव ठाकरे, विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, संसदीय कामकाज मंत्री गिरीश बापट, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, विधानसभा विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, महसूल मंत्री चंद्रकांत पाटील, शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे, संसदीय कार्य राज्यमंत्री विजय शिवतारे, रणजित पाटील, विधान परिषद सदस्य सुनील तटकरे, शरद रणपिसे, संजय दत्त, सतीश चव्हाण, भाई गिरकर, विधानसभा सदस्य गणपतराव देशमुख, जयंत पाटील, राज पुरोहित आदी उपस्थित होते.  

२२ मार्चला लेखानुदान  
अर्थसंकल्पीय अधिवेशन एकूण ३५ दिवसांचे असून कामकाज मात्र २३ दिवस चालणार आहे.  २० आणि २१ मार्च रोजी अर्थसंकल्पावर चर्चा होईल. २२ मार्च रोजी लेखा अनुदान सादर करण्यात येणार असून विरोधी पक्षाचा प्रस्तावही मांडण्यात येईल. ज्या सदस्यांनी ५० वर्षांपेक्षा जास्त काळ संसदीय कामकाजात भाग घेतला आहे अशा सदस्यांचा गौरव करणारा ठराव मांडण्यात येणार अाहे.  २१ मार्च रोजी या ठरावावर चर्चा होईल.
 
बातम्या आणखी आहेत...