आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Less Possibility For BJP Shiv Sena Alliance, Uddhav Mission 180

पुन्हा युतीची आशा मावळली; शिवसेनेचे आता 'मिशन १८०', उद्धव ठाकरेंचा निर्धार

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - गेल्या २५ वर्षांपासून भक्कम असलेली युती विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर तुटली. निवडणूक निकालानंतर सत्तेच्या मोहापायी पुन्हा हे एकेकाळचे मित्रपक्ष सत्तेत एकत्र येण्याची चिन्हे दिसत असतानाच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी मंगळवारी अप्रत्यक्षपणे स्वबळावरच पुढे जाण्याचा निर्धार बोलून दाखवला. ‘पुढील निवडणुकीत पक्षाच्या १८० आमदारांना घेऊन दर्शनाला येईन,’ असे त्यांनी कार्ला येथे मंगळवारी सांगितले. यावरून शिवसेना- भाजपची पुन्हा युती होण्याची शक्यता संपुष्टातच आल्याचे दिसते.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी शिवसेनेच्या सर्व ६३ आमदारांसह आपले कुलदैवत असलेल्या एकवीरा देवीचे कार्ला येथे जाऊन दर्शन घेतले. शिवसेनेने या निवडणुकीत ‘मिशन १५०’ची घोषणा केली होती. परंतु त्यांना फक्त ६३ जागांवरच विजय प्राप्त झाला. ‘विधानसभा निवडणुकीत चांगले यश मिळू दे, सर्व आमदारांना दर्शनाला घेऊन येईन,’ असे साकडे उद्धव ठाकरे यांनी निवडणुकीपूर्वी एकवीरा देवीला घातले होते. हा नवस फेडण्यासाठी उद्धव ठाकरे मंगळवारी सपत्नीक कार्ला येथे सकाळी पोहोचले. त्यापूर्वी शिवसेनेच्या नव्या आमदारांनी शिवाजी पार्क येथे जाऊन शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिस्थळाला अभिवादन केले.

कार्ला येथे उद्धव ठाकरे म्हणाले, आज ६३ आमदारांना घेऊन देवीच्या दर्शनाला आलो आहे; पण लवकरच १८० आमदारांना दर्शनाला घेऊन येईन. त्यांचे हे उद्गार म्हणजे पुन्हा भाजपशी मनोमिलन न करण्याचा इरादा असल्याचे राजकीय वर्तुळात म्हटले जात आहे.

* उपमुख्यमंत्रिपदाच्या मागणीवर अडले घोडे

अजूनही विरोधी सूर
सत्तेत योग्य वाटा मिळाला नाही तर विरोधी पक्षाची भूमिका निभावू, असेही शिवसेनेतून पक्षातून सांगितले जाते. तसेच उपमुख्यमंत्रिपदावरही चर्चेचे घाेडे अडले आहे. रविवारी शिवसेना नेत्यांची बैठक आयोजित करण्यात आली असून त्यात विधिमंडळ नेत्याची निवड केली जाणार असल्याची माहिती शिवसेनेतील सूत्रांनी दिली. दुसरीकडे अनिल देसाई यांनी मात्र, भाजपशी चर्चा सुरू असून सकारात्मक निर्णय होईल, अशी आशा व्यक्त केली.

सन्मानजनक वाट्याचा आग्रह कायम
विधानसभा निवडणुकीत भाजप आणि शिवसेनेमध्ये चांगलेच वितुष्ट आलेले आहे. विधानसभा निवडणुकीतील प्रचारात शिवसेनेकडून झालेल्या अपमानाचा बदला भाजप घेत असून शिवसेनेच्या संभ्रमावस्थेवरही टीका होत आहे. नारायण राणे यांनी शिवसेना सत्तेसाठी लाचार झाली असल्याची टीका मंगळवारी केली. दुसरीकडे काही नेते आणि शिवसैनिकही भाजपबरोबर न जाण्याच्या भूमिकेवर ठाम आहेत. भाजपने विशेष अधिवेशनापूर्वी सन्मानजनक वाटा द्यावा, अशी मागणी शिवसेनेने केलेली आहे. मात्र भाजप अडून बसलेला आहे. या स्थितीत उद्धव ठाकरे यांचे मिशन १८० आमदारांचे वक्तव्य म्हणजे, त्यांनी पुन्हा भाजपबरोबर न जाण्याचा इरादाच व्यक्त केल्याचे दिसून येत आहे. याबाबत मंगळवारी दिवसभर राजकीय वर्तुळात तर्क- वितर्क लावले जात होते.

भाजपची भूमिका ताठरच
शिवसेनेने पाठिंबा दिला नाही तरी फडणवीस सरकारला पाच वर्षे काहीही भीती नाही, असे भाजपच्या एका नेत्याने "दिव्य मराठी'शी बोलताना सांगितले. शिवसेनेने पाठिंबा दिला नसला तरी आम्ही बहुमत सिद्ध करून दाखवू आणि पाच वर्षे सत्ताही चालवून दाखवू. आम्हाला शिवसेनेची गरजच नाही. बहुमतासाठी जे काही करायचे त्याची तयारी आम्ही सुरू केल्याचेही या नेत्याने सांगितले.