आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशनाची सुरूवात 12 मोर्च्यांनी होणार

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशनास सोमवारपासून प्रारंभ होत आहे. या निमित्ताने विविध मागण्यांसाठी 12 मोर्चे पहिल्याच दिवशी अधिवेशनावर धडकणार आहेत.


मागासवर्गीय कर्मचा-यांवरील अन्याय दूर करण्यासाठी आदिम संविधान संरक्षण समितीचे कार्यकर्ते सोमवारी मैदानावर आंदोलन करणार आहेत. मासे विक्रीच्या परवान्यातील पालिका अधिका-यांची मनमानी थांबवावी या मागणीसाठी महाराष्‍ट्र मच्छिमार विकास संघाने आंदोलन छेडले आहे. मुंबईतील हजारो कोळी महिलांच्या मोर्चाचे सोमवारी आयोजन केले आहे.


महाराष्‍ट्र होमीओपॅथीक डॉक्टर्स कृती समितीचे दोनशे डॉक्टर्स आपल्या विविध मागण्यांसाठी आझाद मैदानावर दाखल होत आहेत. महाराष्‍ट्र राज्य प्राथमिक निमशिक्षक उत्कर्ष समितीचे हजारो शिक्षक प्रलंबित मागण्यांसाठी सोमवारी येत आहेत. मागासवर्गीय विद्यार्थ्यांना जातवैधता प्रमाणपत्राची केलेली सक्ती रद्द करावी, या मागणीसाठी मागासवर्गीय कृती समितीचे कार्यकर्ते सोमवारपासून उपोषणाला बसत आहेत.


पीपल्स एज्युकेशन सोसायटीमधील पोलिसांचा हस्तक्षेप थांबवावा, या मागणीसाठी रिपब्लिकन सेना आझाद आंदोलन छेडणार आहे. मालेगाव बाँबस्फोट प्रकरणी निरपराध तरुणांना गोवणा-या 18 पोलिस अधिका-यांवर कारवाई करावी, या मागणीसाठी गेले 18 दिवस आझाद मैदानावर समाजवादी पार्टीचे धरणे आंदोलन सुरू आहे. अधिवेशन काळात या आंदोलनाची तीव्रता वाढवली जाणार आहे. बोधगया येथील स्फोटाचा निषेध करण्यासाठी बौद्ध भिक्कूही आझाद मैदानावर निदर्शने करणार आहेत.


पण, लक्षात कोण घेतो?
50 एकरच्या आझाद मैदानातील केवळ एक एकर जागा निदर्शने करण्यासाठी आहे. या परिसरात मोर्चा काढता येत नाही आणि मिळमिळीत निदर्शनांना कोणी पुसतही नाही. मंत्रालयावर धडक देण्याची स्वप्ने घेवून आलेले मोर्चेकरी सरकारला शिव्याशाप देत आल्यापावली परत जातात.


सोमवारी व्यापा-यांचा बंद
अधिवेशन काळात सर्वात उग्र आंदोलन असेल ते एलबीटी विरोधी व्यापा-यांचे. मुंबई पालिका क्षेत्रात एलबीटी लागू करण्याचा अध्यादेश अधिवेशनात काढला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे मुंबईतले व्यापारी आंदोलनाच्या जय्यत तयारीत आहेत. तसेच अधिवेशन काळात दोन दिवस सोमवार व मंगळवारी व्यापा-यांनी राज्यव्यापी बंदची हाक दिली असून सांगली, सातारा, औरंगाबाद, नाशिक, पुणे येथून हजारो व्यापारी आझाद मैदानावर धडकणार आहेत.