आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

राज्यातील दारू दुकाने गावाच्या १०० मीटर दूर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - राज्यातील दारू दुकाने गावापासून १०० मीटर दूर असतील. गावात असलेल्या दारू दुकानांंमुळे महिला आणि मुलांना होत असलेल्या त्रासाच्या तक्रारी वाढल्याच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासाठी राज्य सरकारने दारूबंदी कायदा-२००८ मध्ये दुरुस्ती केली असल्याची माहिती उत्पादन शुल्क मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मंगळवारी दिली.

दारूची दुकाने गावाबाहेर हलवण्याचा निर्णय आधी ग्रामसभेत घेतला जाईल. असा निर्णय झालेल्या गावातील दारूचे दुकान हलवण्यासाठी उत्पादन शुल्क विभागाकडून कोणतेही स्थलांतर शुल्क आकारले जाणार नाही. ग्रामसभेच्या निर्णयानंतर एक वर्षाच्या आत जर दारू दुकान गावाबाहेर हलवले नाही तर त्याचा परवाना रद्द केला जाईल, अशी तरतूद मुंबई दारूबंदी (ग्रामसभा ठराव पारित केल्यामुळे अथवा नगर परिषद /महानगरपालिकेच्या वॉर्डातील मतदारांनी निवेदन दिल्यामुळे अनुज्ञप्ती बंद करणे) आदेश-२००८ मध्ये दुरुस्ती केली आहे.

गावात दारूचे दुकानच नको, अशा मागण्या राज्यातील अनेक गावांतील महिलांकडून अनेक वर्षांपासून केल्या जात होत्या. तळीरामाच्या उच्छादाचा सर्वाधिक त्रास महिलांनाच होत होता, असे बावनकुळे यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले. दारू पिण्याच्या परवान्यावर आधी १२ बाटल्या दारू विकत घेता येऊ शकत होती. मात्र आता फक्त दोनच बाटल्या खरेदी करता येऊ शकतील.

५० टक्के मतदार उपस्थितीची अट
ग्रामपंचायत हद्दीतील एकूण मतदारांपैकी ५० टक्क्यांपेक्षा कमी नसलेल्या मतदारांनी ग्रामसभेला उपस्थित राहून साध्या बहुमताने ठराव मंजूर केला तर गावातील दारू दुकाने जेथे १० पेक्षा कमी राहती घरे असतील अशा लोकवस्तीपासून १०० मीटर अंतरावर स्थलांतरित करणे बंधनकारक राहील.
बातम्या आणखी आहेत...