आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राजभवनातील दिमाखदार सोहळ्यात बाबासाहेब पुरंदरेंना \'महाराष्ट्र भूषण\' प्रदान

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - संपूर्ण महाराष्ट्रात चर्चेचा आणि वादाचा विषय ठरलेला महाराष्ट्र भूषण पुरस्कार शिवशाहिर बाबासाहेब पुरंदरे यांना राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्या हस्ते आज (बुधवार) अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आला. बाबासाहेब पुरंदेर यांचा आज 94 वा वाढदिवस आहे. त्याच दिवशी राज्य शासनाच्या वतीने त्यांचा राज्याच्या सर्वोच्च सन्मानाने गौरव करण्यात आला.
यावेळी मुख्येमंत्री देवेंद्र फडणवीस, सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे, उद्योग मंत्री सुभाष देसाई, मुंबईच्या महापौर स्नेहल आंबेकर, अरविंद सावंत आणि मंगल प्रभात लोढा उपस्थित आहेत. मराठी भाषा ख-या अर्थाने पुरंदरे यांच्यामुळे समृद्ध होईल, असे राज्यपाल सी विद्यासागर राव यांनी सांगितले.
कोणाच्या भीतीने कार्यक्रम राजभवनात नाही - मुख्यमंत्री
कोणाच्या भीतीने हा कार्यक्रम राजभवनात घेण्यात आलेला नाही, असे सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, देशाचे सर्वोच्च सन्मान हे राष्ट्रपतींच्या हस्ते राष्ट्रपती भवनातील सोहळ्यात प्रदान केले जातात. तिच प्रथा राज्यात असावी यासाठी राज्याचा सर्वोच्च सन्मान राज्यपालांच्या हस्ते दिला जातो, त्यामुळे तो राजभवनात घेण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे फडणवीस म्हणाले. छत्रपतींच्या खऱ्या सेवकाला सन्मानित करण्याचे काम राज्य शासनाच्या वतीने झाले आहे, असेही ते म्हणाले.
शिवाजी महाराजांवरील नाटक-चित्रपटाला करणार मदत
शिवाजी महाराज हे आजच्या भाषेत सांगायचे झाले तर मॅनेजमेंट गुरु होते. त्यांचा प्रभाव आजच्या तरुणांवर असला पाहिजे यासाठी राज्य सरकार त्यांच्या जीवनावर नाटक, चित्रपट तयार करेल त्यांना मदत केली जाईल.
सत्काराला उत्तर देताना बाबासाहेब पुरंदरे म्हणाले...
संशोधन, चिकित्सा आणि मूल्यमापन करुन मी शिवाजी महाराजांवरील पुस्तक लिहिले आहे.
मला मार्गदर्शक आणि गुरु म्हणून बुध्‍दीमान असे गणेश हरी खरे हे संशोधक लाभले. मी नऊ लेख लिहिले. पण त्यावर कोणीही प्रतिक्रिया पाठवल्या नाही. खूप दिवस वाट पाहिली.
मला ज्ञानेश्‍वर माउली आणि तुकाराम महाराज यांच्या सारखे सोपे लिहिता यावे यासाठी प्रयत्न केले. मेहनत घेऊनही महाराजांचे कार्य लोकांपर्यंत पोहोचत नसेल, तर त्याचा उपयोग काय... लोकांना सोप्या भाषेत इतिहास वाचायला मिळाला पाहिजे.
तळागाळातील लोकांना शिवरायांचा इतिहास समजावा यासाठी सोप्या भाषेत लिहण्यासाठी मी सहा महिने विचार केला. त्यानंतर लिहायला लागतो. हे अगदी सहज घडले असे नाही. त्याच्या मागे एक मोठी प्रक्रिया आहे. इतिहास लिहिताना सर्व बाजूंचा विचार करुनच लिहायला हवे. त्यातही काही चुका झाल्या तर त्या लगेच दुरुस्त करायला हव्यात. केवळ मी महाराष्ट्र भूषण नाही तर महाराष्ट्र घडविणारा प्रत्येक व्यक्ती हा महाराष्ट्र भूषण आहे. त्याचा हा सन्मान आहे.