आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पंकजांचा ‘राजीनामा’ फेटाळला, लातूरसह 3 जि.प.त BJP; चव्हाण, दानवे यांनी राखला गड

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
परळीमधील पराभव जिव्हारी लागल्याने पंकजा मुंडे यांनी राजीनाम्याची घोषणा केली. - Divya Marathi
परळीमधील पराभव जिव्हारी लागल्याने पंकजा मुंडे यांनी राजीनाम्याची घोषणा केली.
अाैरंगाबाद-  ग्रामीण भागातील निष्प्रभ पक्ष अशी अापली अाेळख पुसून काढत मिनी मंत्रालय मानल्या जाणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांमध्ये भाजपने मराठवाड्यात जाेरदार मुसंडी मारली. मराठवाड्यातील ८ जिल्हा परिषदांमध्ये भाजप क्रमांक एकचा पक्ष ठरला. भाजपने ४६० पैकी १३२ जागी विजय संपादन करत विराेधकांना अाश्चर्याचा धक्का दिला.
 
भाजपपाठाेपाठ राष्ट्रवादी क्रमांक दाेनवर असून राष्ट्रवादीने मराठवाड्यात ११८ जागा मिळवल्या. ९८ सदस्य निवडून आलेली काँग्रेस तिसऱ्या स्थानावर आहे. शिवसेनेची मात्र पीछेहाट असून, सेनेचे ८५ उमेदवार निवडून अाल्याने सेना चाैथ्या क्रमांकावर फेकली गेली. परभणीत राष्ट्रवादीचा प्रभाव अद्यापही कायम असल्याचे या निकालांवरून दिसून येते.
 
मराठवाड्यातील परळी अाणि लातूरच्या निकालाने साऱ्यांनाच अवाक केले. बीड जिल्हा परिषद व परळी पंचायत समितीमध्ये धनंजय मुंडे यांचा करिष्मा दिसून अाला. संपूर्ण मतदारसंघांत धनंजय मुंडे यांनी प्रतिष्ठा पणाला लावल्याने ६ पैकी ४ जागी राष्ट्रवादी काँग्रेसचा विजय झाला. २ जागा काँग्रेसने पटकावल्या. ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांना मतदारांनी दणका दिला.
 
दरम्यान, परळीसह बीड जिल्ह्यात झालेल्या पराभवाची जबाबदारी स्वीकारत पंकजा यांनी आपल्या मंत्रिपदाच्या राजीनाम्याची घोषणा केली. मात्र, मुख्यमंत्र्यांनी ताे फेटाळला. दरम्यान, भाजपला एकही जागा मिळाली नाही.  लातूरमध्ये मतदारांनी प्रथमच भाजपवर विश्वास दाखवत काँग्रेसची सत्ता उलथवून टाकली.
 
उस्मानाबादमध्ये काँग्रेसला मागे टाकत राष्ट्रवादी क्रमांक एकचा पक्ष ठरला अाहे. हिंगाेलीत सेनेने सर्वाधिक १५ जागी विजय मिळवला असला तरी मागील १० वर्षात एकही जागा न मिळवणाऱ्या भाजपने हिंगाेलीत १० जागा घेत माेठे यश मिळवले. नांदेडमध्ये काँग्रेसने गड राखला. तर जालन्यात भाजपने चांगली कामगिरी केली असली तरी सत्ता स्थापनेसाठी अाणखी ७ सदस्यांची पक्षाला गरज अाहे. अाैरंगाबाद जिल्ह्यात भाजपच्या जागांत तिप्पट वाढ झाली असून पक्षाने ७ वरून २३ जागांवर मजल मारली अाहे.
 
जबाबदारी स्वीकारून पंकजांची राजीनाम्याची घोषणा   
बीड जिल्ह्यात धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसने पंकजा मुंडे यांना शह देण्यात यश मिळवले. परळी पंचायत समितीतही पंकजा यांना भारतीय जनता पक्षाची सत्ता टिकवता आली नाही. या पराभवाची जबाबारी स्वीकारून त्यांनी मंत्रिपदाच्या राजीनाम्याची घोषणा केली. मात्र, राजीनामा स्वीकारणार नसल्याचे भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे व मुख्यमंत्री फडणवीस यांनीही स्पष्ट केले. 

जालन्यात भाजप
जालना जि.प.त ५६ पैकी २२ जागा जिंकून भाजपने वर्चस्व मिळवले. तर ८ पैकी ४ पंचायत समित्यांमध्ये भाजपने स्पष्ट बहुमत मिळवले. दुसरीकडे राष्ट्रवादीच्या ४ जागा कमी झाल्या. शिवसेनेच्या वाट्याला १४ जागा आल्या आहेत. जिल्हा परिषदेत सत्ता स्थापन करण्यासाठी २९ सदस्यांची आवश्यकता असून त्यासाठी भाजपला आणखी ७ जागा कमी आहेत. या स्थितीत भाजप-शिवसेना युती होणार का याकडे लक्ष लागले आहे. 
 
लातुरात सत्तापालट
लातूरमध्ये जिल्हा परिषदेत ५८ पैकी ३६ जागा मिळवत भाजपने काँग्रेसची सद्दी संपवली. निलंगा तालुक्यात ९ पैकी ८ जागा मिळवत भाजपने जोरदार सलामी दिली. तालुक्यातील १० पैकी ४ जागांवर काँग्रेस, ३ जागांवर भाजप व  एका जागेवर राष्ट्रवादीला विजय मिळाला. एकुरगा गटात विलासरावांचे पुत्र धीरज देशमुख विजयी झाले, तर निवळीत काँग्रेसच्या विद्यमान जि. प. अध्यक्षा प्रतिभा पाटील कव्हेकर यांना नवख्या प्रीती शिंदे यांनी हरवले. 
 
उस्मानाबादेत राष्ट्रवादीला २ जागांची गरज 
उस्मानाबाद जिल्हा परिषदेत एकाही पक्षाला बहुमत मिळाले नसले तरी राष्ट्रवादी सत्तेजवळ पोहोचली आहे. सत्तेसाठी केवळ २ जागांची गरज राष्ट्रवादीला आहे. सत्ताधारी शिवसेना-काँग्रेसला पराभव चाखावा लागला आहे. शिवसेना व काँग्रेसच्या जागा घटल्या असून, दाेन जागांवर असलेल्या भाजपला ४ जागा मिळाल्या.  २० जागांवरून काँग्रेस १३ वर तर १५ जागांवरून शिवसेना ११ जागांवर आली. राष्ट्रवादीने २६ जागा जिंकल्या. तर भाजप ४ जागांवर विजयी झाला. गरजेनुसार जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीला भाजप पाठिंबा देऊ शकते. असे झाल्यास राष्ट्रवादी आणि भाजप सत्तेत असेल. दरम्यान, ८ पैकी ४ पंचायत समित्यांमध्ये राष्ट्रवादी, तीनमध्ये काँग्रेस तर एका पंचायत समितीमध्ये त्रिशंकू स्थिती आहे. पंचायत समितीच्या एकूण ११० गणांपैकी ५२ गणांत राष्ट्रवादी, ३० ठिकाणी काँग्रेस, १८ ठिकाणी सेना तर १० ठिकाणी भाजपचे उमेदवार निवडूण आलेत.
 
हिंगाेलीत तीन अपक्षांवर सारी मदार 
हिंगाेलीत ५२ पैकी सेनेला सर्वाधिक १५, काँग्रेस व राष्ट्रवादीला प्रत्येकी १२ तर भाजपला १० जागी विजय मिळाला. १० जागा मिळवत भाजपने दमदार एन्ट्री केली. मागील १० वर्षात भाजपचा एकही सदस्य नव्हता.  या स्थितीत बहुमतासाठी लागणारा २७ चा आकडा कोणतेही तीन पक्ष किंवा अपक्षांना सोबत घेतल्याशिवाय जुळवता येणार नाही. शिवसेना-भाजपला २ सदस्यांची गरज आहे. तर कॉंग्रेस आघाडीला ३ सदस्यांची गरज आहे. त्यामुळे अपक्ष ३ सदस्यांना पदे मिळण्याची संधी निर्माण झाली आहे. अपक्षांमधील २ सदस्य शिवसेनेचे बंडखोर तर १ सदस्य राष्ट्रवादीचा आहे.
 
नांदेडमध्ये सत्तास्थापनेसाठी काँग्रेसला हवेत चार सदस्य
जिल्हा परिषदेत गेल्या निवडणुकीच्या तुलनेत काँग्रेसने ३ जागा जास्त जिंकून आपले वर्चस्व सिद्ध केले. ६३ सदस्यसंख्या असलेल्या जि.प.त काँग्रेसने सर्वाधिक २८ जागांवर विजय मिळवला. त्याखालोखाल भाजपने ४ जागांवरून थेट १३ वर मजल मारली. शिवसेनेचे बळ केवळ एकने वाढून दहावर गेले. भाजपच्या वाढलेल्या जागा या राष्ट्रवादीकडून खेचून घेतलेल्या आहेत. मागील निवडणुकांमध्ये १८ सदस्य असलेल्या राष्ट्रवादीचे बळ ८ ने कमी होवून ते १० वर आले. केवळ दोन अपक्ष निवडून आले.  सत्ता स्थापनेसाठी काँग्रेसला ४ सदस्यांची आवश्यकता आहे.
 
औरंगाबादेत जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद भाजपकडे
औरंगाबाद जि.प.त ६२ पैकी २३ जागा जिंकून भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला. २० वर्षांनंतर जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद भाजपकडे जाणार हे स्पष्ट अाहे. पुढील अडीच वर्षासाठी जि.प.चे अध्यक्षपद महिलांसाठी  राखीव असल्याने हा मानही महिलेकडेच जाणार आहे. गतवेळी या सभागृहात भाजपच्या फक्त ७ जागा होत्या. त्यांनी तिप्पट झेप घेत २३ जागांपर्यंत मजल मारली. मावळत्या सभागृहात शिवसेनेच्या १९ जागा होत्या. ते आता १८ वर आले आहेत. काँग्रेसचे पाच जागांचे नुकसान झाले. त्यांची सदस्य संख्या आता १४ झाली. राष्ट्रवादीचे गतवेळी ११ सदस्य होते. त्यांचे ५ सदस्य निवडून येऊ शकले.  गतवेळी मनसेचे ८ सदस्य होते, यावेळी फक्त एक सदस्य सभागृहात पोहचला. रिपाइंचाही (डी) एक सदस्य विजयी झाला.
 
परभणीत भाजप, अपक्ष, रासप ठरणार निर्णायक 
सत्तेचा गड कायम राखतांना राष्ट्रवादीला जिल्ह्यात बहुमताच्या काठावर पोहोचण्यात यश आले. मात्र, विजयाचा वारु २४ वरच अडल्याने राष्ट्रवादीला मागचीच पुनरावृत्ती करण्याची वेळ आली. ४ जागांसाठी पक्षाला अपक्ष, रासप वा भाजपशी समीकरणे जुळवावी लागणार आहेत. जिल्हा परिषदेवर मागील १० वर्षापासून राष्ट्रवादीची सत्ता असून यावेळी प्रतिकूल परिस्थिती असतांनाही २४ चा आकडा कायम राखण्यात त्यांनी यश मिळवले. काँग्रेसला या निवडणूकीत मोठा धक्का बसला. विद्यमान जिल्हाध्यक्ष सुरेश वरपुडकर, माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर यांना मोठया पराभवाला सामोरे जावे लागले. ५ जागांवर काँग्रेसची पिछेहाट होवून केवळ ५ जागा पदरात पडल्या. शिवसेनेला १३ जागा मिळाल्याने शिवसेना दुसऱ्या क्रमांकावर आहे. भाजपनेही ५ जागा मिळवत यावेळी प्रथमच चांगले यश संपादन करीत नव्या तालुक्यांत प्रवेश केला आहे.
 
बीड जिल्ह्यात राष्ट्रवादी सत्तेजवळ  
जिल्ह्यात यंदा राष्ट्रवादीने ६० पैकी २५ जागांवर विजय मिळवला. सत्ता स्थापन करण्यासाठी राष्ट्रवादीला काँग्रेसचे ३, अपक्ष २ सदस्यांसह अन्य एका सदस्याची गरज भासेल.  जिल्ह्यात भाजपचे एक मंत्री, चार आमदार असतानाही केवळ १९ जागांवर भाजपला यश आले.
 
 भाजपला ३१ हा बहुमताचा आकडा गाठण्यासाठी आणखी १२ सदस्यांची गरज आहे.  गेवराईत  राष्ट्रवादीचे माजी मंत्री बदामराव पंडित शिवसेनेत गेले. त्यांनी गेवराई तालुक्यात शिवसेनेच्या ४ जागा खेचून आणल्या.

 तर  बीड येथील राष्ट्रवादीच्या  आमदारांचे पुतणे संदीप क्षीरसागर यांनी  काकू नाना विकास आघाडी स्थापन करून  राष्ट्रवादीलाच आव्हान दिले होते. त्यांनी ३ जागांवर विजय मिळवला.
 
धनंजय यांचे ट्विट.. 
- बीडमधील विजयानंतर धनंजय मुंडे यांनी ट्विट केले आहे. चुलत बहिण आणि कट्टर प्रतिस्पर्धी पंकजा यांच्या राजीनाम्यावर  त्यांनी टिवपन्नी केली आहे. ते म्हणाले,  'पराभवामुळे कोणी राजीनामा द्यावा की न द्यावा हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. सत्ता,पैसा असूनही पराभव का झाला याचे आत्मचिंतन मात्र नक्की करावे.'
- मी जनतेच्या मनातील मुख्यमंत्री असल्याचे पंकजा नेहमी म्हणतात, त्यावरुनही धनंजय यांनी ट्विटरच्या माध्यमातून त्यांना टोला लगावला आहे. ते म्हणाले, 'जनतेच्या मनात स्वतःसाठी एखादे पद निर्माण करण्यापेक्षा त्यांच्या मनात विश्वासाचे स्थान निर्माण केले म्हणूनच आमचा विजय झाला.'
 
राष्ट्रवादीच्या कामगिरीवर सुप्रिया सुळे काय म्हणाल्या
- 2014 लोकसभेपेक्षा चांगला परफॉर्मन्स राहिला आहे. ग्रामीण भागातून चांगली साथ मिळाली. शहरी भागात सेटबॅक बसला आहे.
- मुंबईत 2012 मध्ये 14 जागा होत्या आता 9 जागा आहे. त्यामुळे फारकाही फरक नाही.
- राष्ट्रवादीला आत्मचिंतनाची गरज आहे, हे मान्य आहे. 
- एका निवडणुकीत पराभव झाला म्हणून हताश होणाऱ्यांपैकी आम्ही नाही. पवारसाहेब सत्तेपेक्षा विरोधीपक्षात सर्वाधिक काळ राहिले आहेत. त्यामुळे पराभवाने आम्ही खचून जाणार नाही. त्याचे आत्मचिंतन नक्की करु.
 
मुंबई,  ठाण्यामध्ये शिवसेना पुढे असली तरी राज्यातील इतर महानगरपालिकांमध्ये भारतीय जनता पक्ष मोठा पक्ष म्हणून पुढे येत आहे. नागपूरमध्ये शिवसेनेला खातेही उघडता आलेले नाही. पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. येथे सायंकाळी 6 पर्यंत भाजपला 77 जागांवर यश मिळाले आहे. नाशिकमध्येही भाजपची घोडदौड सुरु आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये भाजप 38 जागांवर आघाडीवर आहे, तर राष्ट्रवादी 22 जागांसह क्रमांक दोनवर आहे.  
 
महापालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीच्या माध्यमातून 29 हजार 320 उमेदवार आपले भवितव्य आजमावत आहेत. त्यांच्या राजकीय भवितव्याचा हा निकाल आहे. 2019 मधील विधानसभा निवडणुकीची ही सेमीफायनल असल्याचे मानले जाते त्यामुळे या निवडणुकीला महत्त आहे. 
 
LIVE UPDATE
- लातूर जिल्हा परिषदेतही भाजपने मुसंडी मारली आहे. काँग्रेसचे दिवंगत नेते विलासराव देशमुखांनी येथे एकहाती सत्ता राखली होती. आता येथे काँग्रेस पिछाडीवर गेली असून भाजपने आतापर्यंत 58 पैकी 11 जागांवर आघाडी घेतली आहे. 
- उस्मानाबाद जिल्हा परिषद एकूण जागा 55 
निकाल
राष्ट्रवादी 25
बीजेपी 4
काँग्रेस 13
शिवसेना 11
भारतीय परिवर्तन सेना 1
यावल तालुक्यात भाजपच प्रमुख पक्ष ठरला आहे. आमदार हरिभाऊ जावळेंचे वर्चस्व सिद्ध झाले. पाचपैकी तीन गटात भाजप, दोन गटात काँग्रेसचा विजय झाला आहे. गेल्या वेळेपेक्षा भाजपच्या दोन जागा वाढल्या. 
- चंद्रपूर - जिल्हा परिषद एकूण जागा - 56.
भाजप - 13, शिवसेना - 00, काँग्रेस - 10, अपक्ष  -01 
- महिला आणि बाल कल्याण मंत्री पंकजा मुंडे यांना परळीमध्ये धक्का बसला आहे. 
- चुरशीची लढत म्हणून पाहिल्या जाणाऱ्या परळीमधील 9 जिल्हा परिषद गटापैकी 8 गटांमध्ये राष्ट्रवादी आघाडीवर आहे.
- सोलापूर मधील प्रभाग क्रमांक 8 मध्ये भाजपचे चारही उमेदवार विजयी : 
- अमर पुदाले, शोभा बनशेट्टी, सोनाली मुटकिरी,  नागेश भोगडे. 
- नागपूर, पुणे, नाशिकमध्ये भाजप आघाडीवर. 
- मुंबईत 72 जागांवर शिवसेना आघाडीवर.
- राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांचा मुलगा सागर खोत सांगलीमध्ये पराभूत. 
- मुंबईत 23 केंद्रावर मतमोजणी सुरु आहे.
- सोलापूर जिल्हा परिषदेत बार्शीमध्ये कमळ फुलले आहे.
- मुंबईमध्ये पहिला कल भाजपच्या बाजूने आला. भाजपची ओपनिंग चांगली झाली.
- कोल्हापूर जिल्हा परिषदेत स्वाभिमानी शेतकरी संघटनेला यश मिळाले आहे.
 
विश्लेषण 
मागील निवडणुकीत शिवसेनेने भावनिक प्रचार केला होता. बाळासाहेब ठाकरेंची शेवटची निवडणूक असे म्हणून प्रचार केला गेला होता. हा भावनिक मुद्दा उपस्थित करुन शिवसेनेने विजय मिळवला होता. यावेळी बाळासाहेबांच्या अनुपस्थितीतील निवडणुक असे सांगून मराठी माणसाच्या भावनेला हात घातला गेला, असे विश्लेषकांचे मत आहे. 
दादर हा शिवसेनेचा बालेकिल्ला मागीलवेळी मनसेने हिसकावून घेतला होता. तो यंदा त्यांनी परत मिळवला आहे. दुसरीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 'शिवसेनेला औकात दाखवू' असे म्हटले होते. त्याचा राग मुंबईकरांनी व्यक्त केल्याचे विश्लेषकांचे मत आहे. 
 
बातम्या आणखी आहेत...