आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

साखर कारखान्यांना दोन हजार कोटी कर्ज

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - ऊस उत्पादक शेतकर्‍यांना योग्य आधारभूत किंमत (एफआरपी) देता यावा यासाठी साखर कारखान्यांना दोन हजार कोटी रुपयांचे बिनव्याजी कर्ज देण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी विधान परिषदेत केली. अर्थसंकल्पीय अधिवेशन संपण्याच्या काही मिनिटे अगोदर मुख्यमंत्र्यांनी निवेदन केले. त्यात साखर कारखाने, ऊसतोड कामगार, ऊस आणि धान उत्पादकांसाठी निर्णय घेऊन अधिवेशनाचा गोड समारोप केला.

साखरेची निर्यात वाढण्यासाठी कच्चा साखरेच्या निर्यातीला प्रोत्साहन अनुदान म्हणून प्रतिटन एक हजार रुपयांची मदत राज्य सरकारकडून दिली जाईल. ऊस उत्पादक शेतकर्‍यांना एफआरपीनुसार दर देण्याबाबत सरकार आग्रही आहे. साखरेचा बफर स्टॉक करण्याची विनंती केंद्र सरकारला करण्यात आली आहे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

ऊसतोड मजुरीत वाढ
ऊसतोड मजुरीत वीस टक्के अंतरिम वाढ करण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली. तसेच कापूस उत्पादकांना हमीभाव देण्यासाठी बाजारातील दर आणि हमीभाव यातील फरकापोटी आठशे कोटी रुपयांचा आर्थिक भार राज्याने सहन केला आहे. कापसाच्या भाव वाढीमुळे कापूस महामंडळाला (सीसीआय) जो फायदा होईल त्यामधील वाटा शेतकर्‍यांना मिळावा यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील आहे. तसेच धान उत्पादकांना लवकरच पॅकेज देणार असल्याचे ते म्हणाले.