Home »Maharashtra »Mumbai» Loan Waiver Not Valid; Sukanu Samitee

शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी सुकाणू समितीच्यावतीने आज राज्यभर चक्का जाम आंदोलन

विशेष प्रतिनिधी | Aug 14, 2017, 07:53 AM IST

  • (फाईल)
मुंबई -सरकारने दिलेली कर्जमाफी मान्य नसल्याचे सांगत आंदोलक शेतकऱ्यांच्या सुकाणू समितीने पुन्हा एकदा आंदोलनाचा इशारा दिला आहे. सोमवार 14 ऑगस्टला राज्यभरात चक्का जाम आंदोलनाची घोषणा सुकाणू समितीचे नेते आमदार बच्चू कडू, डॉ. अजित नवले व रघुनाथदादा पाटील यांनी पत्रकार परिषदेत बोलताना केली. तसेच शेतकऱ्यांचा सातबारा कोरा न करणाऱ्या एकाही मंत्र्याला स्वातंत्र्यदिनी ध्वजारोहण करू देणार नाही असा इशारा सुद्धा त्यांनी दिला आहे. काश्मिरात अकोल्याचे सुपूत्र सुमेध गवई यांना वीरमरण आल्याने सुकाणूचे अकोल्यातील आंदोलन स्थगित करण्यात आले आहे.
यवतमाळच्या शेतकऱ्यांचा पाठिंबा
कर्जमाफीसाठी सुकाणू समितीच्या रास्ता रोको आंदोलनाला यवतमाळच्या शेतकऱ्यांनी जाहीर पाठिंबा दर्शवला आहे. त्या निमित्त यवतमाळचे शेतकरी तालुकानिहाय आंदोलन करून महामार्ग अडवणार आहेत. समस्त जिल्ह्यातील ट्रॅफिक अडवण्याचा संकल्प जिल्हा शेतकरी न्याय हक्क आंदोलन समितीने घेतला आहे.
अर्ज भरण्याच्या रांगांमध्ये शेतकरी मरतोय...
कर्जमाफीसाठी अनेक जाचक अटी लादण्यात आल्या आहेत. शेतकरी कर्जमाफीचे अर्ज भरण्याच्या रांगेत मरत आहेत. नोटाबंदी व पीक विम्याच्या रांगेत लोक मेले आता कर्जमाफीसाठी असलेल्या रांगांचा नंबर लागल्याचे सांगून त्यांनी केवळ जाचक अटींमुळे राज्यातील 40 टक्के शेतकरी हे पीक विम्यापासून वंचित राहिल्याचे सांगितले. सरकारने ऑनलाईनचा दुराग्रह धरला आहे. यातून शेतकर्‍यांची कोंडी केली जात असल्याचे ते म्हणाले.
फक्त घोषणाच, अंमलबजावणी कधी...
महाराष्ट्रातील सर्व शेतकरी संघटनांच्या सुकाणू समितीने यापूर्वी पुकारलेल्या राज्यव्यापी आंदोलनाला वाढता प्रतिसाद मिळाल्याने, कर्जमाफीबाबत ताठर भूमिका घेणाऱ्या फडणवीस सरकारला कर्जमाफीची घोषणा करावी लागली. मात्र, कर्जमाफी निर्णयाची अंमलबजावणी होऊ शकलेली नाही. छत्रपती शिवाजी महाराज सन्मान कर्ज योजनेचे ऑनलाइन फॉर्म भरून घेण्याची प्रक्रिया संथगतीने सुरू आहे. त्यामुळेच सुकाणू समितीने पुन्हा तीव्र आंदोलनाचे हत्यार उपसल्याची माहिती समितीचे नेते कॉ. अजित नवले, रघुनाथदादा पाटील, आ. बच्चू कडू, किशोर ढमाले आदींनी दिली.

Next Article

Recommended