आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Lok Sabha Election Candidates Of MNS Latest News In Divya Marathi

मनसेचे अजूनही तळ्यात-मळ्यातच,‘लोकसभे’बाबत संभ्रम

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्याची वेळ येऊन ठेपली असताना आणि इतर सर्व पक्ष आपल्या उमेदवारांच्या नावांवरून अखेरचा हात फिरवत असताना मनसेमध्ये मात्र अद्यापही शांतताच आहे. लोकसभा निवडणूक लढवायची की नाही याबद्दलच पक्षात अजूनही विचारच सुरू असून राज ठाकरेंचेही तळ्यात-मळ्यात असल्याने इतर नेते व कार्यकर्तेही संभ्रमात आहेत.
दरम्यान, मनसे महापालिकेतर्फे नाशिकमध्ये उभारण्यात येत असलेल्या गोदा पार्कचे भूमिपूजन शनिवारी होत आहे. या कार्यक्रमात राज ठाकरे काय बोलतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. विशेष म्हणजे मनसेने या कार्यक्रमासाठी भाजपचे माजी अध्यक्ष नितीन गडकरी यांनी प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित केले आहे. काही दिवसांपूर्वी राज यांनी नरेंद्र मोदींवर टीका केली होती. त्या पार्श्वभूमीवर आता ते पुन्हा गडकरींशी जवळीक साधत आहेत. या कार्यक्रमात गडकरी मनसेला काही अप्रत्यक्ष आॅफर देतात काय? याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे.
सत्ताधार्‍यांशी जवळीक
नुकत्याच झालेल्या टोलविरोधी आंदोलनात मनसे आणि सत्ताधार्‍ यांनी हातमिळवणी केली असल्याची टीका करण्यात आली होती. आपण स्वतंत्र लढलो की आपल्यावर काँग्रेस आघाडीला मदत केल्याचा आरोप होतो. त्यामुळे यापुढे हा आरोप टाळण्यासाठी किमान एकदा आपल्याकडून महायुतीला मैत्रीचा संकेत द्यावा आणि तो महायुतीच्या घटक पक्षांकडून झिडकारला गेला तर काँग्रेसला मदत करत असल्याच्या आरोपाला भविष्यात चोख उत्तर देता येईल, असा विचारही प्रमुख नेत्यांच्या बैठकीत झाल्याचे कळते. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीनेही मनसेसाठी ते खूपच सोयीचे असेल.
तीन पर्यायांवर मनसे नेत्यांमध्ये खल
पहिला : लोकसभा’ न लढवणे. परंतु त्यामुळे कार्यकर्ते नाराज होतील. इतर पक्षांच्या आमिषांना बळी पडल्याचा अपप्रचार होईल. विधानसभेसाठीही घातक ठरेल.लोकांमध्ये चुकीचा संदेश जाईल.
दुसरा :महायुतीसोबत जाणे. मात्र, आता ही वेळ टळून गेली असल्याची काही नेत्यांची भावना. तरीही महायुतीकडून काही ऑफर आली तर विचार करायला हरकत नसल्याचे काहींचे मत.
तिसरा : महायुतीकडून ऑफर न आल्यास स्वबळावर लढण्याचा मनसेकडे पर्याय आहेच. याच पर्यायाला आता प्रमुख नेत्यांनी सकारात्मक मत दिल्याची माहिती सूत्रांनी दिली.