आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Lok Sabha Polls Possible In November, Says Rajnath In Mumbai

नोव्हेंबरमध्ये मध्यावधी होणे शक्य - राजनाथ

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - केंद्रातील सरकारला अस्थिर करायचे नसल्याचे सांगतानाच येत्या ऑक्टोबर, नोव्हेंबरमध्ये लोकसभेच्या मध्यावधी निवडणुका होऊ शकतात, असे संकेत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष राजनाथसिंह यांनी मंगळवारी दिले. राज्य सरकार दुष्काळाच्या मुद्द्यावर असंवेदनशील आहे, असा आरोप त्यांनी केला.
मराठवाड्यात दुष्काळाची पाहणी केल्यानंतर राजनाथ यांनी राज्यातील आमदार, खासदारांशी चर्चा केली. ते म्हणाले, दुष्काळाची परिस्थिती भयंकर आहे. या भागातील शेतकर्‍यांचे कर्ज पूर्णपणे माफ करावे. तसेच यापुढे त्यांना भाजपशासित कर्नाटक व मध्य प्रदेशप्रमाणे शून्य टक्के व्याजावर कर्ज देण्यात यावे. राज्यात सिंचनावर 70 हजार कोटी खर्च झाले, पण दहा वर्षात केवळ 0.1 टक्का सिंचन झाल्याबद्दल त्यांनी आश्चर्य व्यक्त केले. यासाठी जबाबदार कोण असा सवालही राजनाथ यांनी केला. केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी राज्यासाठी जास्तीत जास्त मदत आणावी, असे आवाहनही त्यांनी केले. प्रदेशाध्यक्षपदाबाबत कोणतेही मतभेद नसल्याचे सांगून यावर अधिक काही बोलणे त्यांनी टाळले. मनसेप्रमुख राज ठाकरे यांना भाजप सोबत घेणार काय, अशी विचारणा केली असता याबाबत आपल्याला माहिती नसल्याचे ते म्हणाले.
दुष्काळग्रस्तांना मदत
दुष्काळग्रस्तांसाठी भाजपच्या आमदार, खासदारांनी एक महिन्याचे मानधन दिल्याचे पक्षाचे नेते गोपीनाथ मुंडे यांनी जाहीर केले. महाराष्ट्र व मुंबई भाजपतर्फे 50 लाखांचा चेकही या वेळी सिंह यांना सुपूर्द करण्यात आला. त्यांनी तो विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांच्याकडे दिला.

एका जागेमुळे मोदी
एकच जागा असल्याने नरेंद्र मोदी यांना संसदीय समितीत घेतले व मंत्री अमित शाह यांच्यावर आरोप अद्याप सिद्ध झाले नसल्याचे ते म्हणाले.