आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टिळकांना शिक्षा ठोठावणार्‍या जजचे तैलचित्र हटवा; जनहित याचिका दाखल

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- 'केसरी' या आपल्या वृत्तपत्रात ब्रिटिश सरकारविरोधात सडेतोड लिखाण केल्याबद्दल लोकमान्य टिळकांना राजद्रोहाच्या आरोपाखाली सहा वर्षांची शिक्षा ठोठावणार्‍या न्यायाधीशाचे तैलचित्र उच्च न्यायालयातून हटवण्याची मागणी एका जनहित याचिकेद्वारे करण्यात आली आहे. हे तैलचित्र न्यायालयाऐवजी नुकत्याच उद्घाटन करण्यात आलेल्या छोटेखानी संग्रहालयात ठेवावे, अशी विनंतीही याचिकेत करण्यात आली आहे.
नितीन देशपांडे यांनी ही याचिका दाखल केली असून न्यायमूर्ती शरद बोबडे व न्यायमूर्ती मृदुला भाटकर यांच्या खंडपीठापुढे तिची सुनावणी झाली. मुझफ्फरपूर येथे झालेल्या दोन स्त्रियांच्या हत्येसंदर्भात टिळक यांनी वृत्तपत्रातून लिहिले होते. हे लिखाण म्हणजे ब्रिटिश सरकारविरोधात राजद्रोह असल्याचे मत नोंदवत तत्कालीन न्यायाधीश दिनशॉ डावर यांनी टिळकांना 22 जुलै 1908 रोजी सहा वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली होती. लोकमान्य टिळकांनी आपल्या सडेतोड लिखाणाच्या बळावर ब्रिटिश सत्तेविरोधात झुंज दिली होती. त्यामुळे स्वातंत्र्य मिळाल्यानंतर लगेचच डावर यांचे तैलचित्र न्यायालयातून हटवले जाणे गरजेचे होते. न्यायालयातील त्यांचे तैलचित्र लोकमान्य टिळकांच्या प्रतिष्ठेला आणि देशभक्तीला कमीपणा आणणारे आहे. हे तैलचित्र न्यायालयातून हटवून संग्रहालयात हलवल्यास आपण याचिका मागे घेऊ, असे देशपांडे यांनी आपल्या याचिकेत म्हटले आहे. न्यायालयाच्या आवारातील सर्व ब्रिटिश न्यायमूर्तींचे पुतळे, छायाचित्रे आणि तैलचित्रे नव्याने तयार करण्यात आलेल्या संग्रहालयात हलवावेत, अशी मागणीही या याचिकेत करण्यात आली आहे.