आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Loksabha Election : Munde, Gadkari, Danve Contesters Of BJP

लोकसभा निवडणूकीचे पडघम:मुंडे, गडकरी, दानवेंसह भाजपचे दहा उमेदवार ठरले

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - पक्षाचे माजी अध्यक्ष नितीन गडकरी व लोकसभेतील उपनेते गोपीनाथ मुंडे यांच्यासह लोकसभेचे 10 उमेदवार भाजपने मंगळवारी निश्चित केले. राज्य निवडणूक समितीच्या बैठकीत चर्चेअंती नावांवर शिक्कामोर्तब झाले. हा अहवाल दिल्लीला पाठविण्यात आल्याची माहिती प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
गडचिरोलीमधून अशोक नेते, तर भंडार्‍यातून नाना पटोले यांच्याही नावावर जवळपास शिक्कामोर्तब झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. दिल्लीत पाठवण्यात आलेल्या दहा जणांच्या यादीत गडकरी हेच नवीन नाव आहे. निवडणूक समितीच्या बैठकीला प्रदेश भाजपचे अध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांच्यासह विधानसभा विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे, विधान परिषद विरोधी पक्षनेते विनोद तावडे, राज्य संघटक रवींद्र भुसारी उपस्थित होते.
भाजप राज्यातील लोकसभेच्या 48 पैकी 26 जागा लढवणार आहे. वरील दहा जागा निश्चित झाल्या असून उरलेल्या 16 जागा या महायुतीमधील पक्षांबरोबर चर्चा केल्यानंतर निश्चित होतील. शिवसेना, रिपाइं, स्वाभिमानी शेतकरी संघटना, राष्ट्रीय समाज पार्टी हे महायुतीमधील पक्ष असून या पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चा होईल, असे फडणवीस यांनी सांगितले.
एकापेक्षा जास्त उमेदवार असलेल्या मतदारसंघात एकनाथ खडसे, विनोद तावडे व सुधीर मुनगंटीवार यांच्या तीन स्वतंत्र समित्या जातील. स्थानिक स्वराज्य संस्थांचे सदस्य, पदाधिकारी यांच्याबरोबर चर्चा करून या समित्या 6 फेब्रुवारीला अहवाल देतील आणि 7 फेब्रुवारीला केंद्रीय समितीकडे नावे कळवण्यात येतील आणि तेथून मग अंतिम यादी जाहीर करण्यात येईल, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले.
संभाव्य उमेदवार
बीड : गोपीनाथ मुंडे, नागपूर : नितीन गडकरी, जालना : रावसाहेब दानवे, चंद्रपूर : हंसराज अहिर, अकोला : संजय धोत्रे, जळगाव : ए.टी.पाटील, दिंडोरी : हरिश्चंद्र चव्हाण, धुळे : प्रतापराव सोनावणे, रावेर : हरिभाऊ जावळे, नगर : दिलीप गांधी.
महायुती 1996 चा विक्रम मोडेल
1996 मधील लोकसभा निवडणुकीत शिवसेना-भाजप युतीने लोकसभेच्या 33 जागा जिंकून विक्रम केला होता. या वेळी हा विक्रम मोडीत काढला जाईल. रिपाइंचे रामदास आठवले, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी, रासपचे महादेव जानकर यांच्यामुळे युतीत चैतन्य आहे. काँग्रेस आघाडीच्या भ्रष्टाचाराला कंटाळलेले लोक युतीला भरभरून मतदान करतील, असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला.